Homeमाय व्हॉईसकोरोनाग्रस्ताच्या बिलासाठी पोलीसवारी!...

कोरोनाग्रस्ताच्या बिलासाठी पोलीसवारी! अंगावरील सोनेही घेतले!!

राज्यात सर्वत्र सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचार मोफत असताना रत्नागिरीतील एपेक्स रुग्णालयात कोरोना रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी लाखो रुपयांचे बिल रुग्णाच्या नातेवाईकांना देण्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याहीपेक्षा संताप आणणारी घटना म्हणजे ‘बिल भरायला पैसे नसतील तर अंगावरील सोने येथे जमा करा’ असा निर्लज्ज सल्ला तेथील मुळे नामक डॉक्टरांनी दिल्याचे खळबळजनक वृत्त आहे. यासंबंधात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्यापि काहीच कारवाई केली गेली नाही, असे चौकशीअंती समजते.

गुहागर तालुक्यातील तवसाळ गावच्या स्वप्नील कृष्णा सुर्वे (36) यांना रत्नागिरी येथील एपेक्स रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 एप्रिल रोजी त्याला दाखल केल्यानंतर 5 मे रोजी रुग्णाच्या नातेवाईकांना एक लाख 80 हजाराचे बिल देण्यात आले व ते भरण्यास सांगितले गेले. तुम्हाला इतके पैसे भरणे शक्य नसेल तर तुमचा रुग्ण तुम्ही दुसरीकडे हलवू शकता, असे काहीशा गुर्मीत सांगितले गेले. इतकेच नाही तर तुमचा रुग्ण दिवसाला 10 ते 12 ऑक्सिजन सिलिंडर घेतो, म्हणून तुम्हाला पैसे भरणे जमत नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे पठाणी गुर्मीत सुनावलेही गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वजण रुग्णांशी सौजन्याने वागा असे जाहीररित्या सांगत असतानाही जर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अरेरावी करत असेल तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच त्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे धडे घेण्याची गरज आहे. बिलाचा भरणा केल्यानंतर तुमचा रुग्ण ओके आहे, अतिदक्षता विभागातून आता त्याला हलवीत आहोत असेही सांगितले गेले. त्यानंतर त्या रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणारी हिणकस वागणूक पाहून आमचे धाबे दणाणलेच. आम्ही आमच्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबाबत विचार केला. डॉ. मुळे यांनी त्याला संमतीही दिली.

अंगावरील सोने

खरी मजा की संतापाचा कडेलोट पुढेच आहे.. रुग्णालयाचे बिल मी उद्या आणून देतो असे डॉक्टरना सांगितले. त्यांनीही मान डोलावली आणि आमची मान पोलिसांच्या हवाली करायचे ठरवले. काहीही संबंध नसताना आम्हाला पोलीसठाण्याला चक्कर मारायला पाठवले. आमच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यापर्यंत रुग्णालयाची मजल गेली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे, आता तुम्हीच सांगा.. कोरोनासारख्या साथीच्या काळात रुग्णालये अशी वागूच कशी शकतात? या संपूर्ण प्रकारात पोलिसांना खेचण्याची गरजच काय होती?

अखेर बिलाच्या पोटी राहिलेल्या रकमेसाठी डॉ. मुळे यांना काहीतरी हमी हवी होती आणि लगेच त्यांना अंगावरील सोन्याची आठवण झाली. पोलिसांचा मुद्दा ताणायचा झाल्यास हे अंगावरील सोने घेणे कुठल्या कायद्यात बसते? हे विचारायला हवे होते. परंतु परिस्थिती नाजूक असल्याने नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला घेऊन दुसरे रुग्णालय गाठले. अखेर तो अभागी रुग्ण जग सोडून गेलाच..

“मोठ्यांसाठी खोटे हासू

तळागाळासाठी आसू

जरा भेटीला माणूस

तसे सोंग आम्ही फासू

खोटे-नाटेच मुखोटे

आत-बाहेरचे खोटे

खरा माणूस मनाच्या

खोल अंतरंगी भेटे..”

हे ना.धों.चे शब्द आठवले आणि अंगावर शहारे आले. दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याधिकाऱ्यांचे काही कारनामे पेश केले होते. पण आजचा हा कारनामा क्रूरतेचा नमुना ठरावा. पाहूया.. सरकार आपली यंत्रणा कशी हलवते ते.. आणि हो.. त्या रुग्णाचे घेतलेले बिल त्याच्या नातेवाईकांना परत जरी मिळाले तर या प्रकरणात थोडेतरी पापक्षालन झाले म्हणायचे!

1 COMMENT

  1. सर धन्यवाद या प्रकाराला न्याय मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय
    मयत स्वप्नील सुर्वे हा माझा ऑफिस सहकारी होता .. या दरिद्री डॉक्टर मुळे काही चांगल्या डॉक्टर वर देखील विश्वास राहत नाही आहे आता

    स्वप्नील … याला वाचवण्यासाठी त्याचा मामा अमर किर ..आमचे ऑफिस चे सहकारी मयुर आग्रे , ललित आयरे.तसेच आमचे सर पराग गोडबोले आणि इतर मित्र मंडळीनी खूप प्रयत्न केले .. पण शेवटी सगळे व्यर्थ गेले

    यात जास्त खचला तो आमचा मयुर .. मैत्री पेक्षाही जास्त नाते असलेला हा .. याच्या डोळ्या देखत प्राण सोडले त्याने ..काय वाटले असेल त्याला

    असो .. तो गेला आम्हाला सोडून अशा नालायक डॉक्टर मुळे .. पण मृत्यू पश्चात थोडा तरी न्याय मिळाला तर त्या ईश्वराचे धन्यवाद

Comments are closed.

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content