Homeन्यूज अँड व्ह्यूज'ब्रँड एकनाथ'ला मान्यता!...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीत महाराष्ट्रासाठीची खलबतं याबरोबरच पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंना दिलेला मुबलक वेळ, हाच मुद्दा चर्चेत आला आहे. आजच्या भेटीतून ‘ब्रँड एकनाथ’ला दिल्लीचे पाठबळ असल्याचा संदेश भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे. या भेटीनंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील बुधवारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

या भेटीचे स्वरूप अधिकृतपणे ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यामागे अनेक राजकीय पैलू दडलेले असल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांकडून सहकार्य मिळत नसल्याने सध्या शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. काही मतदारसंघांत शिवसेनेला अपेक्षित साथ मिळाली नसल्याचा अहवाल शिंदेंनी मोदींसमोर मांडल्याचे समजते. नंतर शिंदेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली.

ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने, महायुतीत सर्व काही आलबेल नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेषतः निधीवाटप आणि काही स्थानिक वादांवरून शिंदे गट काहीसा आक्रमक असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि संसदेत शिवसेनेच्या खासदारांची भूमिका यावरही या दौऱ्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली. या बैठकीत बजेट सत्रातील पक्षाची भूमिका, केंद्र सरकारला समर्थन आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली.

मोदी

आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंना मदत?

पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मदत मागितली तर त्यांना मदत करणार का?,” या प्रश्नावर शिंदे हसत-हसतच म्हणाले की, “आताच कुठे राज्यसभेची निवडणूक झाली. पुढे येईल विधान परिषद निवडणूक, तेव्हा बघू!”

संसदेच्या अधिवेशन काळात दरवेळी दिल्लीत येऊन खासदारांना भेटत असल्याचे यावेळी शिंदेंनी स्पष्ट केले. “विरोधक काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही, मी माझ्या कामातून उत्तर देतो. राज्याच्या हितासाठी ही सकारात्मक चर्चा होती, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा विकास, महायुतीमधील समन्वय आणि आगामी पाच राज्यातील निवडणूक रणनीती तसेच सध्याची युद्धजन्य परिस्थिती यावर बैठकीत चर्चा झाल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले.

काही खासदारांच्या कामगिरीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली, आपले सर्वांवर लक्ष असून पक्षासाठी काम न करणाऱ्या खासदारांचा हिशेब केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, शिंदेंनी सायंकाळी मंत्री उदय सामंत यांनाही दिल्लीत बोलावून घेतल्याचे समजते.

राजकीय वजन अन् नाराजीचे निवारण

एकनाथ शिंदेंनी या भेटीतून आपली ‘दिल्लीतील पोहोच’ दाखवून विरोधक आणि मित्रपक्ष दोघांनाही इशारा दिला आहे. त्यांना पंतप्रधानांचा दोन तासाचा वेळ मिळणे, याचा अर्थ मोदींनी शिंदेंच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आहेत, ज्यामुळे लवकरच काही मोठे निर्णय होऊ शकतात.

संसदेतील ‘ती’ खास भेट

पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे संसदेत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेदेखील उपस्थित होते. संसदेच्या आवारात त्यांची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली. यावेळी रिजिजू यांनी अत्यंत आत्मीयतेने एकनाथ शिंदेंचे स्वागत केले आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाहत उद्गारले, “श्रीकांत मेरा छोटा भाई है!” (श्रीकांत माझा धाकटा भाऊ आहे).
या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत:

  1. कौटुंबिक जवळीक:: भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे शिंदे कुटुंबाशी असलेले घनिष्ट संबंध यातून स्पष्ट होतात.
  2. भावनिक राजकारण: दिल्लीतील नेते सहसा शिष्टाचाराने वागतात, पण रिजिजू यांचे विधान हे शिंदे कुटुंबाला दिल्लीत किती सन्मान मिळतो, हे दर्शवते.
  3. राजकीय संदेश: विरोधकांकडून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न होत असताना, दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी दिलेली ही प्रेमळ साद युती भक्कम असल्याचे संकेत देते.
  4. उद्धव ठाकरेंना उत्तर: एकीकडे उद्धव ठाकरे दिल्लीवर टीका करत असताना, शिंदे गट हा दिल्लीच्या किती जवळ आहे आणि त्यांना तिथे ‘घरच्यासारखे’ वागवले जाते, हे चित्र जनतेसमोर उभे करण्याचा हा प्रयत्न आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content