अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥
अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील.
भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते.
श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता म्हणून पुजले जातात. परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती उत्सव म्हणून साजरी केली जाते. परशुरामांच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. भगवान परशुराम हे शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण आहे. उद्या परशुराम जयंती. भगवान परशुरामाची गुणवैशिष्ट्ये विशद करणारा सनातन संस्थेद्वारा संकलित लेख त्यांच्या चरणी सविनय अर्पण!
१. सप्तचिरंजिवांपैकी एक
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण:।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः॥
अर्थ: अश्वत्थामा, बळी, महर्षि व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत.
परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.
२. श्रीविष्णूचा सहावा अवतार
सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगु यांच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार घेतला. त्याचे नाव परशुराम होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास भार्गवराम असेही संबोधले जात असे.
३. अपराजेय योद्धा असलेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा विनाश
करण्यासाठी परशुरामाने केलेला अद्वितीय पराक्रम!
परशुरामाने तपश्चर्या करून सहस्रार्जुन कार्तविर्यापेक्षा अधिक तपोबल अर्जित केल्याने सूक्ष्म स्तरावर कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या पराभवाचा आरंभ होणे- हैैहय वंशातील अधर्मी राजा महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने सहस्रो वर्षे कठोर तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि असीम बलशाली बनून सहस्रो भुजा धारण करण्याचे वरदान प्राप्त केले होते. अशा कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा नाश करता यावा, यासाठी त्याच्या तपोबलापेक्षा अधिक तपोबल अर्जित करण्यासाठी परशुरामाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. कार्तविर्याचे तपोबल परास्त करण्यासाठी परशुरामाने त्याहून कठोर तपश्चर्या करून ब्राह्मतेजाच्या शस्त्राने कार्तविर्याच्या पुण्यबळावर एकप्रकारे प्रहार करून त्याला क्षीण केले. त्यामुळे कार्तविर्याच्या सहस्रावधी भुजांद्वारे कार्यरत असणार्या सूक्ष्म कर्मेंद्रियांची दिव्य शक्ती निष्प्रभ होऊ लागली आणि अधर्माचे प्रतीक असणार्या कार्तविर्याच्या पराभवाचा सूक्ष्मातून आरंभ झाला. कार्तविर्याला पराभूत करण्यासाठी भगवान परशुरामाने दिलेला हा आध्यात्मिक स्तरावरील लढा अद्वितीय आहे.
गोधन चोरणार्यांचा विनाश होवो, असा संकल्प करून तो पूर्णत्वास नेणे- कार्तवीर्य सहस्रार्जुनाने ऋषी दांपत्याच्या विरोधाला न जुमानता जमदग्नी आश्रमातून कामधेनूला बलपूर्वक स्वतःसमवेत नेऊन गोमातेचे अपहरण केले. ही घटना घडली, त्या वेळी परशुराम आश्रमात नव्हता. तो घनघोर अरण्यात कठोर तपश्चर्या करण्यात मग्न होता. जेव्हा तो जमदग्नींच्या आश्रमात पोचला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार समजला. कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या कह्यात असणार्या कामधेनूची मुक्तता करून गोमाता आणि गोधन यांचे संरक्षण करण्यासाठी त्याने गोधन चोरणार्यांचा विनाश होवो, असा संकल्प केला. त्याची शापवाणी खरी ठरली; कारण गोधन चोरल्याचा अपराध केल्यामुळे कार्तविर्याचा पुण्यक्षय झाला. जमदग्नीऋषींवर प्राणघातक आक्रमण केल्यामुळे कार्तविर्याच्या पुत्रांनाही पातक लागले. परशुरामाने कार्तविर्याच्या कुळाचा विनाश करण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास नेऊन गोमातेची मुक्तता करून तिला पुन्हा जमदग्नींच्या आश्रमात आदराने आणले.
कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा अंतःकाळ जवळ येताच त्याच्यावर परशूने स्थुलातून वार करणे आणि शिवाने दिलेल्या परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ करणे- कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा पुण्यक्षय झाल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर सपशेल पराभव झाल्यामुळे स्थुलातून त्याचा विनाश काळ समीप आला. त्याच्या अंतःकाळ जवळ येताच भगवान परशुरामाने सहस्रार्जुनावर स्थुलातून परशूने वार करून त्याच्या सहस्र भुजा छाटून टाकल्या आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला. अशाप्रकारे भगवान परशुरामाने क्षत्रियांचे निर्दालन करण्यासाठी महाकालेश्वर शिवाने दिलेल्या परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ केला.
४. भगवान परशुरामाने केलेले अपूर्व अवतारी कार्य आणि पराक्रम यांची ठळक उदाहरणे-
२१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करणे- भगवान परशुरामाने एकट्याने संपूर्ण पृथ्वीला २१ वेळा प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर माजलेल्या अहंकारी आणि अधर्मी क्षत्रियांचा निःपात केला. अशाप्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्याने पृथ्वीचा भार हलका केला आणि त्याचसमवेत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचे परम पुण्यही प्राप्त केले.
सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य असणे- प्रजेचा छळ करून संपूर्ण पृथ्वीवर उपद्रव माजवणार्या क्षत्रियांची संख्या सहस्रो होती. त्यांच्याजवळ लक्षावधी अक्षौहिणी सैन्यबळ होते. भगवान परशुराम हा नरदेह धारण केलेला साक्षात् श्रीमन्नारायणच होता. त्यामुळे त्याच्यात सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य होते.
दानशूर- एकछत्र सम्राटाप्रमाणे अखिल भूमीचा अधिपती असूनही अश्वमेध यज्ञाच्या वेळी परशुरामाने यज्ञाचे अध्वर्यू महर्षि कश्यप यांना संपूर्ण पृथ्वीचे दान दिले. यावरून परशुराम किती दानशूर होता, हे दिसून येते.
नवसृष्टीची निर्मिती करणे- भगवान परशुरामाने अवघ्या तीन पावलांत समुद्र मागे हटवून क्षणार्धात परशुराम भूमीची निर्मिती केली आणि चितेतून चित्तपावन ब्राह्मणांची निर्मिती करून परशुराम क्षेत्रात नवीन सृष्टीच साकार केली.
क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित करणे- परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित केली.
५. तेज रामात संक्रमित करणे: एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी) भूमीवरची गती निरुद्ध कर’, असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
६. धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक- एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्रतेज यांचा उत्कृष्ट उपयोग
करणारे योद्धावतार भगवान परशुरामाच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार!
संपर्क क्र.: 9920015949