यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. आय.पी.एल.च्या इतिहासात पंत आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तेव्हाच क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या होत्या. मग साहजिकच आय.पी.एल. स्पर्धेत पंतची कामगिरी कशी होते याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते. मात्र, याअगोदर दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतने सर्वांची निराशा केली. यंदाच्या आय.पी.एल. स्पर्धेत त्याची कामगिरी अत्यंत सुमार झाली. १३ लढतीत अवघ्या १५१ धावा, १३.००च्या सरासरीने पंतला करता आल्या. त्यामध्ये एकमेव अर्धशतकाचा सामावेश होता. हे अर्धशतक त्याने चेन्नई संघाविरुद्ध काढले, तेदेखील यंदाच्या आय.पी.एल.मधील पाचव्या लढतीत. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १८, मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ४, दिल्लीविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत त्याला भोपळादेखील फोडता आला नाही तर राजस्थानविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पंत ३ धावा काढून बाद झाला. चेन्नईविरुद्ध अर्धशतक काढल्यानंतर त्याला पुन्हा सूर गवसला अशी आशा संघाला वाटू लागली. परंतु ती फोलच ठरली. त्यानंतर आठ सामन्यात तो पुन्हा अर्धशतकी खेळी करू शकला नाही.
पंतकडे संघाच्या कर्णधारपदाचीदेखील जबाबदारी देण्यात आली होती. परंतु त्यातदेखील तो आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी लखनऊ संघ प्ले ऑफपासून दूरच राहिला. एवढी मोठी रक्कम पंतसाठी खर्च केल्यानंतर त्याच्याकडून म्हणावा तसा परतावा न मिळाल्यामुळे संघाचे मालक संजीव गोएंका निश्चितच चिंताग्रस्त असतील. त्यामुळे २०२६च्या या स्पर्धेत पंतला कायम ठेवायचे की नाही हा मोठा पेच गोएंका यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यंदा फक्त एकमेव अर्धशतक मारणारा पंत तो अपवाद वगळता १२ लढतीत अर्धशतकापर्यंत कधीच मजल मारू शकला नाही. गतवर्षी भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. भारतीय विजयात पंतचा मोठा हातभार होता. या स्पर्धेनंतर त्याने आय.पी.एल.मध्ये आपल्या जुन्या दिल्ली संघाला “गुडबाय” करण्याचा निर्णय घेतला. मग स्पर्धेसाठी लागलेल्या बोलीत सुरुवातीला पंजाबने पंतसाठी बोली लावली. परंतु लखनऊने मोठी बोली लावल्याने पंजाबने त्याला घेण्याचा विचार सोडून दिला. मग त्यांनी २०२४मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला आपल्या संघात दाखल केले.

पंतची यंदाची ९वी आय.पी.एल. स्पर्धा आहे. परंतु एवढी खराब कामगिरी पंतकडून प्रथम झाली. २०२२मध्ये पंतच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला होता. त्यातून सुदैवाने तो वाचला. त्यामुळे २०२२ आणि २०२३ या दोन आय.पी.एल. स्पर्धा पंत खेळू शकला नव्हता. २०२४च्या स्पर्धेत त्याने जोरदार कमबॅक केले. त्यामुळे भारतीय संघात टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी जागा मिळाली. मिळालेल्या संधीचे पंतने सोने केले. लखनऊचा अगोदरचा कर्णधार के एल. राहुलने संघमालक गोएंका यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे २०२४च्या आय.पी.एल. स्पर्धेनंतर लखनऊ संघ सोडला. यंदा तो दिल्ली संघातर्फे खेळत आहे. पंतने फलंदाजीत आपल्या क्रमावारीत सातत्य राखले नाही. १ ते ७ क्रमांकापर्यंत पंतने फलंदाजी केली. याच क्रमवारीचा फटका पंतला बसला असेच म्हणावे लागेल. फलंदाजीतील एकच क्रमांक पंतने निश्चित केला नसल्यामुळे तो आपल्या फलंदाजीला न्याय देऊ शकला नाही. त्यामुळे मग तो प्रचंड दबावाखाली फलंदाजी करताना दिसायचा. नक्की आक्रमण करायचे का बचाव करायचा असा दुहेरी पेच पंतसमोर असायचा. त्यामुळेच दडपणाखाली चुकीचे खराब फटके मारुन तो बऱ्याचदा बाद झाला.
कर्णधार म्हणूनदेखील आपल्या खेळाडूंमध्ये आणि संघात चांगले वातावरण निर्माण करण्यात पंत अपयशी ठरला. संघातील ज्येष्ठ खेळाडूंशी त्याने फारशी सल्लामसलत केली नाही. त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. आपली नक्की भूमिका काय आणि जबाबदारी काय याचा विसर पंतला पडला. गोलंदाजीतदेखील केलेले चुकीचे बदल लखनऊ संघासाठी चांगलेच महाग ठरले. बऱ्याच सामन्यांत संघाची केलेली चुकीची निवड लखनऊ संघासाठी त्रासदायक ठरली. मिचेल मार्श, निकोलस पुरण, डेविड मिलर, राशिद खान या अनुभवी खेळाडूंची मदत पंतने फारशी घेतली नाही. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे एक आठवडा आय.पी.एल. स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु झाल्यानंतर लखनऊचे तीन सामने बाकी होते. हे तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकले असते तर लखनऊला प्ले ऑफची संधी होती. परंतु १२व्या महत्त्वपूर्ण लढतीत हैद्राबादविरुद्ध लखनऊला हार खावी लागली. तिथेच त्यांच्या प्ले ऑफच्या आशा मावळल्या.

हा सामना लखनऊसाठी “करो अथवा मरो” असाच होता. या सामन्यात लखनऊने हैद्राबादसमोर विजयासाठी २०६ धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. सलामीवीर अभिषेक शर्मा केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे हैद्राबाद संघाने बाजी मारली. त्याने किशानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करून हैद्राबादच्या विजयाचा पाया रचला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊतर्फे सलामीतीर मार्श ६५. पुरण ४५, माक्रम ६१ यांच्या सुरेख फटकेबाजीमुळे लखनऊने २०० धावांचा टप्पा पार केला होता. या महत्त्वपूर्ण सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतला अवघ्या ७ धावा करता आल्या. २०२२मध्ये लखनऊ संघ आय.पी.एल.मध्ये दाखल झाला. २०२२ आणि २०२३मध्ये त्यांनी प्ले ऑफपर्यंत मजल मारली. परंतु एलीमिनेटरच्या लढतीत लखनऊ संघाला पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांची अंतिम फेरी हुकली. यंदाच्या या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात लखनऊ संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सहापैकी चार लढतीत त्याने विजय मिळवला होता. परंतु दुसऱ्या टप्यात मात्र लखनऊ संघाची कामगिरी काहीशी ढेपाळली. सात सामन्यात अवघे दोन सामने लखनऊला जिंकता आले. त्यामुळे प्ले ऑफचे त्यांचे दरवाजे बंद झाले. त्यातच काही प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. त्याचाही फटका लखनऊ संघाला बसला. पंतला जरी लखनऊ संघाने २७ कोटी रुपये देऊ केले असले तरी ही पूर्ण रक्कम त्याला मिळणार नाही असे वृत्त आहे. त्याला ११.४८ कोटी रुपये कर भरावा लागणार आहे. त्यामुळे पंतला १५.५२ कोटी रुपये मिळणार असल्याच्या बातम्या आहेत. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी पंतची निवड करण्यात आली आहे. आय.पी.एल.मधील अपयश तो इग्लंड दौऱ्यात पुसून काढतो का हे बघायचे..