पराक्रम दिवस 2024निमित्त, दिल्लीत लाल किल्ला येथे ऐतिहासिक प्रतिबिंब आणि प्रकाशमान सांस्कृतिक अभिव्यक्तीचे एकत्रीकरण करत, एक बहुआयामी उत्सव उलगडून दाखवला जाणार आहे. उद्या, 23 जानेवारीला संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून 31 जानेवारीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, साहित्य अकादमी आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांसारख्या आपल्या सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक मंत्रालयाने हा सर्वसमावेशक उत्सव आयोजित केला आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांच्या गहन वारशाचा शोध घेणाऱ्या अनेक उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाईल.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांच्या गाथेत लाल किल्ल्याची भूमिका महत्त्वपूर्ण होती. लाल किल्ल्यातील एक संग्रहालय बोस आणि INA भारतीय राष्ट्रीय आर्मीच्या वारशाचे जतन आणि सन्मान करण्यासाठी समर्पित वास्तू आहे, याचे उद्घाटन सुद्धा 2019मध्ये नेताजींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरबक्ष सिंग धिल्लन आणि कर्नल शाहनवाज खान यांची नावे लाल किल्ल्यावरील सुनावण्यांमधील प्रमुख व्यक्ती म्हणून इतिहासात कोरली गेली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेमुळे आझाद हिंद फौजेच्या अटल संकल्पाचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक लाल किल्ल्यातील कुप्रसिद्ध बॅरेक्स खटला स्मरणात राहतो.
कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD) कलाकारांच्या व्यासपीठावरील सादरीकरणासह पार्श्वभूमीला प्रोजेक्शन मॅपिंग तंत्रज्ञानाद्वारे प्रतिष्ठित लाल किल्ल्याचे रूपांतर कॅनव्हासमध्ये केले जाईल, किल्ल्याच्या भिंतींवर शौर्य आणि बलिदानाच्या कथांनी इतिहास आणि चमत्कृतीपूर्ण कला यांचे संमिश्र सादरीकरण केले जाईल. भारतीय राष्ट्रीय लष्करातील दिग्गजांचा यावेळी विशेष सन्मान केला जाईल. लाल किल्ल्यावरील नेताजी आणि आझाद हिंद फौज यांच्या उल्लेखनीय प्रवासाचे वर्णन करणारी दुर्मिळ छायाचित्रे आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन आणि अभिलेखागारांच्या प्रदर्शनाद्वारे अभ्यागतांना एक अवर्णनीय अनुभव घेता येईल. याशिवाय, चित्रकला आणि शिल्पकला कार्यशाळांचा थेट अनुभव, प्रत्यक्ष आणि आभासी प्रदर्शनासह केंद्रस्थानी असलेले आधुनिक तंत्रज्ञान, ऐतिहासिक घटनांबाबत एक अद्वितीय आणि परस्परसंवादी दृष्टीकोन प्रदान करेल. कार्यक्रमादरम्यान अभ्यागतांना विनामूल्य प्रवेश असेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ 2021पासून दरवर्षी पराक्रम दिवस साजरा केला जातो. याचा उद्घाटन कार्यक्रम 2021 मध्ये कोलकात्यात व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथे झाला होता. 2022 मध्ये इंडिया गेट इथे नेताजींच्या त्रिमितीय पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर 2023 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या निनावी बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात आली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपवर बांधणे आवश्यक असलेल्या नेताजींना समर्पित अशा प्रारूप राष्ट्रीय स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
पराक्रम दिवस 2024 कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचे भव्य चित्रमय दर्शन आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची विविधता प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘भारत पर्व’ चा डिजिटली प्रारंभ करतील. 23 ते 31 जानेवारी या नऊ दिवसांच्या कार्यक्रमात 26 मंत्रालये आणि विभागांचा समावेश असून ते नागरिक केंद्रित उपक्रम, व्होकल फॉर लोकल आणि विविध पर्यटन आकर्षणे ठळकपणे सादर करणार आहेत. जगभरातील लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाची भावना प्रतिबिंबित करत ती साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम लाल किल्ल्यासमोरील राम लीला मैदान आणि माधव दास उद्यान इथे होणार आहे.