Homeमाय व्हॉईसआतातरी एकनाथरावांना पडली...

आतातरी एकनाथरावांना पडली ठाण्याची चिंता! हेही नसे थोडके!!

एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते ‘चिंता करतो राज्याची..’ या भूमिकेत होते. उपमुख्यमंत्री झाल्यापासून ‘चिंता करतो पक्षाची!’, या भूमिकेत आल्यासारखे वाटते. आणि कालपरवा त्यांना चक्क ‘चिंता वाटते ठाण्याची..’ या भूमिकेपर्यंत बदल झाल्यासारखे दिसत आहे. ठाणेकरांना त्याचा प्रत्यय येईल तेव्हा खरे!! टिकेचा भाव नाही, परंतु मुख्यमंत्रीपदावर काम करताना स्वतःवर अनेक मर्यादा घालून काम करायला लागते. कारण विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांच्या व मित्रपक्षांच्या असंख्य दुर्बिणी लागलेल्या असतात. स्वतःच्या भागाचा किंवा मतदारसंघाचाच विकास करतोय, बाकीच्यांना पाहतच नाही, अशी टिका होत असतेच! या टिकेपासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या विभागाचा विषय विषयपत्रिकेवर शेवटचाच ठेवावा लागतो. आणि मुख्य म्हणजे जेमतेम अडीच वर्षांत कुणाकुणावर लक्ष ठेवायचे? विरोधकांवर, स्वकीयांवर, मित्रपक्षांवर की काड्या घालणाऱ्या आमदारांवर.. हाही प्रश्न उरतोच. म्हणून आम्ही पहिल्या अडीच वर्षांत आमच्या ठाणे शहराबाबतीत झालेल्या अन्यायाकडे काहीसा ‘काणाडोळा’ करत आहोत.

उपमुख्यमंत्री झाल्यापासून मित्रपक्ष असलेल्या भाजपने एकनाथरावांना स्वस्थ झोप मिळू दिली नाही असं दिसतेय. काही मंत्र्यांची अडचणीत टाकणारी विधाने, काही ठिकाणी पडलेले छापे, काहींनी केलेली ‘ब चा बा’ केलेली विधाने यांनी अगदी डोकं भडभडून गेलं होतं. हे कमी म्हणून की काय दिल्लीची आमंत्रणे… काही काही म्हणू नका. डोकं अगदी भणभणून गेलं होतं रावांचं!! त्यात एक झुळूक आली परवा आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळ काढून (कुणाचा फोन आला तरी देऊ नका अशी तंबी देत) त्यांनी ठाणे शहराशी संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांशी शहरातील वाहतूककोंडी व खड्डे यावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते. या चर्चेच्यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. वाहतूककोंडीबाबत चर्चेच्यावेळी फिल्डवर दररोज काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून एकनाथरावांनी एक नवीन पायंडा पाडला व तो चांगला आहे. नाहीतर अनेकदा चर्चेच्यावेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे अनुभव ऐकलेच जात नाहीत. केवळ कागद-पेन्सिल समोर ठेवून चर्चा होते.. नाही, ते म्हणजे फक्त ‘रुबरू’ होणं असतं.

एकनाथराव

एकनाथराव मुख्यमंत्रीपदावर असल्यापासून ठाणे पोलीस आयुक्तालयाची एक मागणी प्रलंबित आहे. ती अजूनही पूर्ण झालेली नाही, असे खात्रीलायकरित्या समजते. ठाणे पोलीस दलात मनुष्यबळाची कमी आहे. हवालदार ते अधिकारी श्रेणीपर्यंतच्या अनेक जागा रिकाम्या असून त्या गेली अनेक वर्षे भरल्याच गेलेल्या नाहीत. अधिकारी श्रेणीचे आपण बाजूला ठेवूया. सध्या पोलीस दलाने हवालदारपदासाठी (पोलीस ठाण्यातील) 150 व वाहतूक हवालदारपदासाठी सुमारे 150 अशा एकूण 300 हवालदारांची मागणी केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत याबाबत वायदे करण्यात आले. परंतु त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. शहरात वाहतूककोंडी झाल्यावर सर्वांना प्रथम आठवतो तो वाहतूक हवालदारच! आणि काही मोजके चौक सोडले तर हा हवालदार औषधालासुद्धा मिळत नाही. माजिवाडा सोडला तर मानपाडा, पाटलीपाडा, कासारवडवली, गायमुख तसेच बाळकूम, राबोडी (आतील बाजू), वागळे इस्टेट ते सर्व नवीन आयटी हब, वर्तक नगर, काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिर परिसर अशा अनेक भागात हवालदार पाहणे दुर्मिळ झाले आहे. पोलीस दलाशी संबंधित वाहने- जिप्स वगैरे, हीही अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरात पोलीस दिसले पाहिजेत हे सूत्र अंमलात नाही. गाड्या नाहीत म्हणून पोलिसिंग नाही.

खरंतर ठाणे महापालिकेबाबत स्वतंत्रच लिहावे लागेल. परंतु या बैठकीत रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भातही चर्चा झाल्याने थोडक्यात याचाही विचार करणार आहे. पालिकेच्या ताब्यातील रस्ते असोत वा रस्ते महामंडळाकडील रस्ते असोत, सर्वांचे बांधकाम बकवास आहे. मागे एका वृत्तांतात लुईसवाडी परिसरातील चांगल्या रस्त्याबाबत लिहिले होते. तसेच चांगले रस्ते इतरत्र का नाहीत, असे विचारले होते. उड्डाणपुलांवरील रस्ते तर खतरनाकच आहेत. त्यातच आता कोपरी उड्डाणपुलावर नवीन बांधकामाची सुरुवात होणार आहे (मुंबईकडे जाताना). म्हणजे दोन्ही बाजूंनी एकेक लेन कमी. याचाच अर्थ पुन्हा वाहतूककोंडी.. “A traffic jam is collision between free enterprises and socialism. Free enterprises produces automobile faster than socialism can build roads and its capacity” असं सर्वत्र दिसत असताना नेत्याने समाजाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना योग्य दिशा दाखवणे गरजेचे असते व हीच अपेक्षा एकनाथरावांकडून आहे. “Leadership with the art of giving people a platform for speeding ideas that works”. असं करताना एकनाथरावांनी ठाणे शहरातील आपली कोअर टीम आता बदलावी असे सांगणार नाही. पण या टीममध्ये नवीन तरुणांना वाव द्यावा, जुन्यांना विसरू नका. परंतु त्यांची प्रत्येक कृती ग्रामोफोनमधील सुई अटकते, अशी झाल्यासारखे वाटत आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की, वागळे इस्टेटचे प्राबल्य कमी करून बाळकूम, कासारवडवली, गायमुख पाटलीपाडा, राबोडी, कोपरी आदी भागातील तरुणांना संधी द्यावी. चूकभूल द्यावीघ्यावी. एक मात्र नक्की. आपण ठाणे शहराच्या समस्यांना हात घालण्याचे ठरवलेत हेही नसे थोडके…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...
Skip to content