Homeपब्लिक फिगरवृक्षलागवडीच्या चौकशी समितीत...

वृक्षलागवडीच्या चौकशी समितीत नितेश राणे!

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. येत्या चार महिन्यांत ही समिती आपला अहवाल सभागृहाला सादर करेल.

२०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या मोहिमेअंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधानसभेत मान्य केले होते. राज्यातील अनेक भागातील वृक्ष नष्ट झाले असून, जी झाडे आहेत त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर भरणे यांनी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी सभागृहाला दिली होती. त्यानुसार, आता भरणे यांनी विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्यांच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी घोषणा केली.

अशी आहे सर्वपक्षीय १६ आमदारांची समिती

दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पुढील सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी किणीवर (सर्व शिवसेना), अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम (सर्व राष्ट्रवादी), नाना पटोले, सुभाष धोटे,  अमित झनक, संग्राम थोपटे (सर्व काँग्रेस), आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर (सर्व भारतीय जनता पार्टी) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content