पारंपरिक औषधांमधील संशोधनासाठीचे सहयोग केंद्र म्हणून हैदराबादच्या सीसीआरएएस-एनआयआयएमएचला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पारंपरिक औषधांमधील मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी एनआयआयएमएच हे जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले सहयोग केंद्र ठरले आहे. ही प्रतिष्ठेची मान्यता 3 जून 2024पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज (एनआयआयएमएच), अर्थात राष्ट्रीय भारतीय वैद्यकीय वारसा संस्थेला आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेअंतर्गत (सीसीआरएएस) एक केंद्र म्हणून “पारंपरिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठीचे” जागतिक आरोग्य संघटनेचे सहयोग केंद्र म्हणून नुकतेच नियुक्त केले आहे.
1956मध्ये स्थापन झालेली एनआयआयएमएच, हैदराबाद ही संस्था, भारतातील आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी,बायोमेडिसिन (जैव-वैद्यकशास्त्र) आणि इतर संबंधित आरोग्यसेवा शाखांमधील वैद्यकीय-ऐतिहासिक संशोधनाचे दस्तऐवजीकरण आणि प्रदर्शन करण्यासाठी समर्पित असलेली एकमेवाद्वितीय संस्था आहे. सीसीआरएएस, एनआयआयएमएचचे महासंचालक आणि डब्ल्यूएचओ-सीसीचे प्रमुख प्रा. वैद्य रवीनारायण आचार्य यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांनी संस्थेने हा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
भारतात बायोमेडिसिन आणि संबंधित विज्ञानांच्या विविध शाखांमध्ये सुमारे 58 डब्ल्यूएचओ सहयोग केंद्रे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद, जामनगर आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, नवी दिल्ली, या संस्थांच्या पाठोपाठ पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील तिसरे डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र म्हणून सीसीआरएएस-एनआयआयएमएच, हैदराबाद, या केंद्राची भर पडली आहे.
“पारंपरिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधना”साठीचे पहिले डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र म्हणून एनआयआयएमएच, आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा शाखेमधील शब्दावलीचे मानकीकरण तसेच रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या अकराव्या आवृत्तीसाठी पारंपरिक औषध मॉड्यूल-IIचे अद्ययावतीकरण करण्यासाठी, डब्ल्यूएचओला सहाय्य करेल. याव्यतिरिक्त, डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र पारंपरिक औषधांसाठी संशोधनपद्धती विकसित करण्यामध्ये सदस्य देशांना सहाय्य करेल.
“पारंपारिक औषधांबाबत मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी” डब्ल्यूएचओ सहयोग केंद्राचे संचालन सीसीआरएएसचे महासंचालक प्रा. वैद्य रवीनारायण आचार्य यांच्या नेतृत्त्वाखालील समर्पित पथक करेल. यामध्ये डॉ. जी. पी. प्रसाद, सहायक संचालक I/c आणि युनिट प्रमुख, वैद्य साकेत राम त्रिगुल्ला, संशोधन अधिकारी (आयुर्वेद) आणि डॉ. संतोष माने, संशोधन अधिकारी (आयुर्वेद), एनआयआयएमएच, हैदराबाद यांचा तसेच सीसीआरएएस मुख्यालयाच्या साहित्यिक आणि मूलभूत संशोधन पथकाचा समावेश असेल.