Homeन्यूज अँड व्ह्यूजनवे फुटबाॅल प्रशिक्षक...

नवे फुटबाॅल प्रशिक्षक खलीद जमील यांची कसोटी!

अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने नुकतीच भारतीय फुटबाॅल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी बुजूर्ग खेळाडू खलीद जमील यांची निवड केली आहे. गेली अनेक वर्षं हे प्रशिक्षकपद विदेशी खेळाडूंकडेच सोपवले जात होते. पण त्याचे फारसे चांगले निकाल मात्र मिळाले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर‌‌ विविध स्पर्धांत भारतीय फुटबाल संघाची कामगिरी अधिकच खराब होत चालली. जागतिक आणि आशियाई‌ देशांच्या क्रमवारीतदेखील भारतीय फुटबाॅल संघाची कमालीची घसरण सुरु झाली. एका जमान्यात फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबाॅल संघ अव्वल शंभर देशात असायचा. तो इतिहास झाला. आता गेली काही दशके भारतीय फुटबाॅल संघ या क्रमवारीतून‌ही बाहेर फेकला गेलाय. एका जमान्यात आशिया खंडात बऱ्यापैकी लौकिक‌ संपादन करणाऱ्या भारतीय फुटबाॅल संघाला आता नवखे संघदेखील पराभूत करु लागले आहेत. आशिया क्रमवारीत सध्या २४व्या स्थानावर असलेला भारतीय संघ काही वर्षांपूर्वी अव्वल दहा संघांत होता. त्यामुळे या विदेशी प्रशिक्षकांवर भरमसाठ पैसा‌‌ खर्च करण्यापेक्षा आता देशी प्रशिक्षकाकडे‌‌ भारतीय फुटबाॅल संघाचे सुकाणू देण्याचे धोरण बहुधा अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने अवंलबिले आहे, असे दिसतेय.

तब्बल १३ वर्षांंच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा भारतीय फुटबाॅल संघाला देशी प्रशिक्षक मिळत आहे. २००५नंतर भारतीय फुटबाॅल संघाला पूर्णवेळ भारतीय प्रशिक्षक मिळणार आहे. २००५मध्ये भारतीय फुटबॉल संघाचे माजी कप्तान सुखविंदर यांच्याकडे पूर्णवेळ भारतीय फुटबाल संघाची जबाबदारी‌ देण्यात आली होती. २०११मध्ये विदेशी प्रशिक्षक असलेल्या बॉब हॉग्टन यांची भारतीय फुटबाॅल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर मध्येच हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हा सॅव्हियो मेडेएरा यांच्याकडे एक वर्षासाठी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली गेली होती. ते भारतीय फुटबाॅल संघाचे शेवटचे भारतीय प्रशिक्षक होते. जून २०२४मध्ये स्पेनचे मानालो मार्क्केझ यांची दोन वर्षांसाठी भारतीय फुटबाॅल संघाचे नवे ‌प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. परंतु ते आपला फारसा प्रभाव‌ पाडू शकले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत ८पैकी केवळ १ आंतरराष्ट्रीय सामना भारताला जिंकता आला. आघाडी फळीतील नवे चांगले खेळाडू त्यांना तयार करता आले नाहीत. माजी ‌ भारतीय कर्णधार सुनील छेत्रीला त्यांनी निवृत्ती मागे घेण्यास सांगितले. छेत्रीने भारतीय संघात कमबॅक केले. पण तो‌ आपल्या खेळातील जुनी जादू पेश करु शकला नाही. त्यामुळे मार्क्केझ चांगलेच दणपणाखाली होते. त्यामुळे भारतीय फुटबाॅल महासंघाने हटवण्यापेक्षा त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देऊन ते परत स्पेनला रवाना झाले. त्यांच्या रिक्त जागी‌ नव्या प्रशिक्षकाची शोधमोहीम पुन्हा सुरु झाली. तब्बल दिडशेपेक्षा जास्त अर्ज या ‌पदासाठी आले होते. आर. एम. विजयन प्रमुख असलेल्या तांत्रिक समितीने जमील, माजी प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन, स्लोव्हाकियाचे स्टीफन टार्कोविच या तिघांची शिफारस केली होती. अंतिम मुलाखतीनंतर जमील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. विजयन यांनी भारतीय प्रशिक्षकासाठी आग्रह धरल्यामुळे जमील यांना शेवटी झुकते माप मिळाले. त्यांचा कालावधी, मानधन मात्र अद्याप ठरलेले नाही. त्याबाबतचा निर्णय जमील यांच्याशी चर्चा करून घेणार असल्याचे अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी सांगितले.

जमील यांचा जन्म कुवेत सिटीमध्ये झाला. त्यांचे आई, वडील पंजाबी आहेत. कुवेत मधील १४ वर्षांखालील शिबिरात फ्रांसचे दिग्गज फुटबाॅल खेळाडू मायकल प्लॅटिनी यांच्याशी जमील यांची भेट झाली होती. भारतात आल्यानंतर त्यांना करारबद्ध करण्यासाठी इस्ट बंगाल, मोहन बागान या दोन बलाढय़ संघात चुरस होती. परंतु जमील यांनी कोलकात्याचा रस्ता न धरता त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मग तेव्हाच्या मुबईतील बलाढ्य महिंद्र युनाटेड, एअर इंडिया, मुंबई एफसी या संघाचे प्रतिनिधित्व जमील यांनी केले. भक्कम बचावासाठी त्यांची खासियत होती. संघाच्या आघाडी आणि मधला फळीतील ते प्रमुख दुवा म्हणुन कामगिरी बजावत होते. त्यामुळे भारतीय फुटबाॅल संघात त्यांची निवड झाली नसती तर आश्चर्य‌ म्हणावे लागले असते. ४० आंतरराष्ट्रीय सामन्यात जमील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पण दुर्देवाने दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकर संपली. २००८मध्ये त्यांनी आपल्या खेळाला विराम दिला. निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून या खेळाची सेवा करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले. निवृत्तीनंतर त्यांना मुंबई एफसी या नव्या संघाच्या १९ वर्षांखालील युवा फुटबाॅल संघाची प्रशिक्षकपदाची जबाबदारी अचानक मिळाली. मग जमील यांची दुसरी नवी इनिंग सुरु झाली. त्यानंतर बड्या ऐझवाल संघाच्या प्रशिक्षकपदी जमील यांना मोठी संधी मिळाली. या संघाला प्रतिष्ठेच्या आय लीग स्पर्धेचे ऐतिहासीक जेतेपद जमील यांनी‌‌ २०१६-१७च्या मोसमात मिळवून दिले. ईशान्य राज्यातील फुटबाॅल संघाने ही स्पर्धा जिंकण्याची पहिलीच वेळ होती. त्यावेळीं अवघ्या एका गुणाच्या फरकाने ऐझवाल संघाने बलवान मोहन बागानला गुणतालिकेत मागे‌‌ टाकून बाजी मारली होती.

२०२०-२१मध्ये नाॅर्थ‌‌ इस्ट युनाटेड या संघाला आणि नंतर जमशेदपूर संघाला जमील यांनी आय.एस.एल.च्या स्पर्धेत प्ले ऑफमध्ये नेण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी या स्पर्धेत करुन दाखवणारे ते पहिले भारतीय प्रशिक्षक ठरले होते. इस्ट बंगाल, मोहन बागान या कोलकात्याचा दादा संघांनादेखील जमील यांनी काही काळ मार्गदर्शन केले होते. तसेच सुपर कप स्पर्धेत इस्ट बंगाल, जमशेदपूर हे दोन संघ त्यांच्या मागदर्शनाखाली स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले होते. आय लीग स्पर्धा जिंकून देणारे ते सर्वात तरुण भारतीय प्रशिक्षक होते. अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने जमील यांना दोन वेळा सर्वोत्तम प्रशिक्षकाचा‌‌ पुरस्कार दिला होता. निवृत्तीनंतर गेली १७ वर्षे जमील यांनी भारतीय फुटबाॅलमधील चढउतार जवळून बघितले आहेत. खडतर मेहनतीला पर्याय नाही, या मताचे‌ जमील असून त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. खेळाडूंशी त्यांचे चांगले सूर जुळतात. खेळाडूंना ते ‌ पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यांची खेळण्याची शैली ते बदलत नाहीत. खेळाडूंचा खेळ आणि आत्मविश्वास‌ उंचावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रतिस्पर्धी संघांचा‌ अभ्यास‌ करुन त्यांचे कच्चे‌ दुवे‌ हेरुन त्याप्रमाणें व्यूहरचना आखण्यात जमील यांची खासियत आहे. नवी आव्हाने स्वीकारायला त्यांना आवडतात आणि म्हणूनच हे आव्हान त्यांनी स्वीकारले. आता लवकर सुरु होणाऱ्या नेशन्स चषक फुटबाॅल स्पर्धेपासून जमील यांची नवी इनिंग सुरु होईल. भारतीय फुटबॉल संघाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यात‌ जमील कितपत यशस्वी ठरतात‌ का, ते येणारा काळच ठरवेल. जमील यांना त्यांचा नव्या इनिंगसाठी ऑल दि बेस्ट!

Continue reading

पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची भारताकडे वानवा

बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई‌ चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताने पुढील वर्षी हॉलंड, बेल्जियम येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम...

टी-२० क्रिकेटच्या जमान्यात दुसरा पुजारा तूर्ततरी कठिण!

राहुल द्रवीड याच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतर त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेचा प्रश्न चेतेश्वर पुजाराने आपल्या चिवट, संयमी फलंदाजीने सोडवला. त्यामुळे तेव्हाच्या बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी सुस्कारा टाकला असेल. जणूकाही मग राहुल द्रवीडचाच भक्कम वसा पुजाराने १३ वर्षे पुढे नेला. सौराष्ट्राच्या...

युरोपमध्ये व्यवसायिक स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू अदिती

भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम‌ देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची खरी शान होती. उत्तम गोलरक्षक असलेल्या अदितीने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉलला‌‌ एका...
Skip to content