Friday, October 18, 2024
Homeडेली पल्सकोरोना काळात अशी...

कोरोना काळात अशी साजरी करा नागपंचमी!

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. यावर्षी उद्या म्हणजेच 13 ऑगस्टला नागपंचमी आहे.

या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते.

सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागपंचमी नेहमीप्रमाणे साजरी करण्यास काही ठिकाणी मर्यादा असू शकतात. आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये जेथे घराबाहेर पडून वारूळाचे पूजन करणे शक्य नाही, त्यांनी ‘आपद्धर्मा’चा भाग म्हणून घरी राहूनच हा सण कशा प्रकारे साजरा करावा, याविषयीचे धर्मशास्त्रीय विवेचन या लेखात करण्यात आले आहे.

1. नागपंचमीचा इतिहास: सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.

शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली. श्रीविष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्यावेळी शेष बलराम झाला.

श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्यादिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

2. नागपूजनाचे महत्त्व- नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (10.29) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकंकालियं तथा।।

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

3. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व- सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.

4. निषेध- नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत. या दिवशी भूमीखनन करू नये.

5. आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे?

नागदेवतेचे चित्र काढणेहळदमिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे (अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत.) आणि त्याठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे. ‘अनंतादिनागदेवताभ्यो नमः।’ हा नाममंत्र म्हणत गंध, पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे.

षोडशोपचार पूजन: ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी षोडशोपचार पूजा करावी.

पंचोपचार पूजनज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी आणि दूध, साखर, लाह्या यांचा, तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (पंचोपचार पूजा: गंध, हळद-कुंकू, पुष्प (उपलब्ध असल्यास दूर्वा, तुळशी, बेल) धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)

6. पूजनानंतर नागदेवतेला करावयाची प्रार्थना! 

‘हे नागदेवतांनो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे, या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणार्‍या होवोत. हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे, त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

उद्या परशुराम जयंती!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील. भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र...

नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे!

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय देवीच्या 9 रूपांविषयी आज आपण या लेखातून जाणून...
Skip to content