Homeमाय व्हॉईसकित्येकांचे गॉडफादर, नारायण...

कित्येकांचे गॉडफादर, नारायण राणेंचे आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

दहा एप्रिल, हा अनेकांचे गॉडफादर राहिलेले नारायण राणे यांचा जन्मदिवस. वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करणाऱ्या या नेत्याचा एक शिवसैनिक, शाखाप्रमुख, बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ते केंद्रीयमंत्री असा सारा जीवनप्रवास अदभूत व आश्चर्यकारक आहे. सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत काढली. ९ वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्यातील संघटनकौशल्य आणि कार्यकर्तृत्त्वाची पारख करून भाजपामध्ये सन्मानाने घेतले व केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिले. भारतीय जनता पक्षाचे अगोदर राज्यसभेत खासदार आणि आता लोकसभेत खासदार अशी त्यांची वाटचाल चालू आहे. सतत संघर्ष आणि लढाऊ बाणा हा त्यांचा स्थायीभाव आहे.

नारायण राणे हे मुंबईचे नगरसेवक असल्यापासून मी त्यांच्या राजकीय प्रवासाचा एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील त्यांच्या कार्यालयात नुकतीच त्यांची भेट झाली. वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करताना मागे वळून पाहताना मनात कोणते विचार येतात, असे मी त्यांना उत्सुकतेने विचारले. ते सहज म्हणाले- मी मागे वळून कधी बघितलेच नाही. नेहमी पुढे बघूनच चालत राहिलो. मी वयाच्या १५व्या वर्षापासून सार्वजनिक कामाला सुरूवात केली. विधानसभेत सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो. विधिमंडळात सहा वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. राजकारणात ज्या-ज्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली, त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. १९९०मध्ये मी नगरसेवक व बेस्ट कमिटीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पाठवले. या निर्णयामुळे माझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडले. सार्वजनिक जीवनात मला जी सत्तेची पदे मिळाली, मानसन्मान मिळाला, नावलौकीक प्राप्त झाला, त्यामागे शिवसेनाप्रमुखांचा हा निर्णय होता, हे सांगताना मला आजही अभिमान वाटतो. मला पद मिळाल्यानंतर माझ्या कुटुंबियांइतकाच कोकणी माणूस बेहोश होऊन मोठा आनंदी होत आला आहे. माझे संपूर्ण आयुष्य कोकणी माणसाच्या सेवेसाठी खर्च केले, तरीही या जन्मी त्यांचे ऋण फेडू शकणार नाही.

नारायण राणे यांनी त्यांच्या असंख्य सहकारी व कार्यकर्त्यांना मोठे केले. अनेकजण सधन व संपन्न झाले. राणे यांचे नेतृत्त्व मानणाऱ्या शेकडो निष्ठावंतांची फळी उभी राहिली. मग राणे यांच्या राजकीय प्रवासात त्यांचे मार्गदर्शक कोण? याचे उत्तरही त्यांनी दिलखुलासपणे दिले. ते म्हणाले- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी आजही दैवत मानतो. माझ्या आयुष्यात मला ते भेटले नसते तर महाराष्ट्राला नारायण राणे दिसला नसता. माझ्या गुणांची पारख करूनच त्यांनी मला सर्व काही दिले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता ही पदे शिवसेनाप्रमुखांमुळेच मिळाली. त्यांनी मला दिलेले प्रेम, आदर व केलेले मार्गदर्शन मी कधीच विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुखांनंतर माझ्या आयुष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यांनी भारतीय जनता पक्षात मला जो मानसन्मान व आदर दिला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असेही राणेंनी आवर्जून सांगितले.

राणे

नारायण राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदूर्ग हा पर्यंटनजिल्हा झाला. रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसुविधा, नागरी सेवा सर्वच बाबतीत कोकण आघाडीवर आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज, लाइफटाइम हॉस्पिटल, गोशाळा, महिला भवन, अशी त्यांच्या कामाची मोठी यादीच देता येईल. कोकणात भव्य, अत्याधुनिक दर्जेदार शिक्षण देणारे विद्यापीठ व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोकणातील तरूणांना कोकणातच उद्योग-व्यवसायात रोजगार म्हणून विविध उद्योग यावेत यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे. नारायण राणे व त्यांच्या परिवाराचे अनेक उद्योग व व्यवसाय आहेत. पण दैनिक प्रहारमधे ते स्वत: बारकाईने लक्ष घालतात. ते प्रहारचे सल्लागार संपादक आहेत. प्रहारमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, अग्रलेख, मथळे यावर त्यांचा कटाक्ष असतो. ते उत्तम वाचक आणि उत्तम संपादक आहेत. तेवीस जानेवारी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती. त्यादिवशी प्रहारच्या अंकात पहिल्या पानावर त्यांचा फोटो देऊन अभिवादन केले आहे ना, अशी आदल्या रात्री संपादकाना फोन करून विचारणा करणारे हे सल्लागार संपादक आहेत.

ते मंत्री असताना मंत्रालयात मी भेटायला गेलो होतो. त्यांच्या कार्यालयात एक महिला व तिची मुलगी बसली होती. राणेसाहेब त्यांची आस्थेने चौकशी करीत होते. नंतर मला समजले की, चेंबूरमधील त्याच्या दिवंगत कार्यकर्त्याची विधवा पत्नी तिच्या मुलीसह त्यांना भेटायला आली होती. राणेसाहेबांनी मुलीच्या नावावर विमा काढून दिला. त्यातून तिचे शिक्षण व लग्न होईल अशी व्यवस्था करून दिली. आपल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारा नेता कसा असावा, त्याचे हे उदाहरण आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सभागृहात संबंधित मंत्री नाहीत म्हणून कामकाज तहकूब करण्याची अनेकदा पाळी आली. बजेटवर चर्चा होताना गॅलरीत अधिकारी नाहीत, सभागृहात आमदारांची संख्या पुरेशी नाही असे अनेकदा घडले. नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना त्यांचे बजेटवरील भाषण ऐकणे ही मोठी पर्वणी असायची. अधिकारी व पत्रकार तसेच प्रेक्षकगॅलरी खचाखच भरलेली असे. राणेसाहेब बजेटची चिरफाड करीत. त्यांनी केलेल्या धारदार टीकेने सरकारला घाम फुटत असे. अभ्यासपूर्ण विेवेचन, घणाघाती टीका आणि पुराव्यानिशी टोकदार हल्ले हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असे.  सभागृहात येताना चांगला अभ्यास व गृहपाठ करून ते येत असत.

राणेसाहेबांनी आजवर बरेच काही मिळवले. त्यांचे चिरंजीव नितेश, हे मंत्री आहेत व दुसरे पुत्र निलेश, हे आमदार आहेत. दोघांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. राणेसाहेब म्हणजे श्रीमंतीबद्दल गर्व नाही आणि अहंकाराचा लवलेश नसलेले नेते आहेत. कोणाच्या वाट्याला जाणार नाहीत. पण कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ते कधीच शांत बसत नाहीत. सतत काही नवे करायचे हा त्यांचा पिंड आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी बोलताना आजही नारायण राणे भावूक होतात. शिवसेनाप्रमुखांचा चर्चेत उल्लेख होताच, ते म्हणाले, बाळासाहेब हे मला सदैव गुरूस्थानी आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. ते आज हवे होते. ते असते तर हिंदुत्वाशी यांची गद्दारी झाली नसती. शेवटच्या दिवसात त्यांना भेटता आले नाही, त्याची खंत आजही माझ्या मनात आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत प्रेम व आदर होता आणि त्यांचा माझ्यावर विश्वास होता. साहेब, मी आपल्याला शेवटचा नमस्कार करू शकलो नाही, मला क्षमा करा…

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या नारायण राणे यांच्या मनातील सारे संकल्प पूर्ण होवोत व जनसेवेसाठी आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, याच त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बोजड शब्दजंजाळात अडकलेल्या भाजपला तारले राम रथयात्रेने!

सहा एप्रिल १९८०, हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) स्थापना दिवस. मुंबईत समता नगरमध्ये या पक्षाची स्थापना झाली. पूर्वाश्रमीचे जनसंघी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या पक्षात एकत्र आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून वाढलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून...

आसाममध्ये होणार भाजपाची हॅटट्रीक?

 इशान्येकडील राज्यात आसाममधील सत्तासंघर्ष  नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. आसामध्ये येत्या नऊ एप्रिल या एकाच दिवशी १२६ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी अटतटीची लढत बघायला मिळेल असे वातावरण आहे.  हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातून भाजपा पुन्हा एकदा सत्ता संपादन...

विधिमंडळाच्या अधिवेशनाचे फलित- खचलेले विरोधक तर हतबल मित्रपक्ष!

राज्याच्या पाच आठवडे चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्यक्षात वीस दिवसच कामकाज झाले. अधिवेशनात विरोधी पक्षाकडून एकाही विषयावर सरकारला धारेवर धरले गेले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यtच्या घटनेवर चर्चा घडवावी यासाठी विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले नाही. कलंकीत मंत्र्यांना...
Skip to content