पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप या स्पर्धेत नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे, दिनेश पवारने अनुक्रमे आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला.
रॉयल गार्डन, मुद्रे, कर्जत येथे सदर स्पर्धा पार पडली. सुधाकर परशुराम घारे (माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले.
या स्पर्धेच्या क्लासिक सबज्युनिअर मुलींच्या गटात नंदिनी उपर (बॉडी लाईन जिम खोपोली), ज्युनियर मुलींच्या गटात अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब, खोपोली) ह्या किताब विजेत्या झाल्या. सबज्युनिअर क्लासिक मुलांच्या गटात श्रेयश जाधव (आयर्न मॅट जिम, खोपोली), ज्युनियर मुलांच्या गटात तन्मय पाटील (संसार जिम, पेण), सीनियर क्लासिक पुरुष गटात गणेश तोटे (फिट ऑन जिम, पनवेल) आणि मास्टर्स (४९, ५०, ६०, आणि ७० वर्षांवरील स्पर्धक) स्पर्धेत दिनेश पवार (स्पार्टन जिम, लौजी खोपोली) हे किताब विजेते ठरले.
सांघिक विजेतेपद जी व्ही आर जिम, कर्जत यांना मिळाले. उपविजेतेपद हनुमान व्यायाम शाळा, पेण यांनी पटकावले तर तृतीय क्रमांक बॉडी लाईन जिम, खोपोली यांना मिळाला. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि सचिव अरुण पाटकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेत मुंबईचे गोपीनाथ पवार, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, अंकुश सावंत, प्रशांत सरदेसाई, साहिल उतेकर, पुण्याचे विजय पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.