Thursday, November 21, 2024
Homeमुंबई स्पेशलश्री गणेशोत्सवासाठी मुंबई...

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.

पालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०९७ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

मुंबई

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व श्री मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

‘क्यूआर कोड’वरही मिळणार कृत्रिम तलावांची माहिती

‘क्यू आर कोड’द्वारेदेखील भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. अनंत चतुर्दशी दिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. पालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

मुंबई

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

२. मूर्ती विसर्जनाकरीता पालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

३. अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी घ्यावयाची काळजी

मुंबई

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (१७ सप्टेंबर २०२४) समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती,  सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५.२७ मिनिटांनी ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच ‘१०८’ रूग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content