Wednesday, October 23, 2024
Homeटॉप स्टोरीमुकेश अंबानी इस्टोनियाचे...

मुकेश अंबानी इस्टोनियाचे इ-निवासी!

इस्टोनियाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडेंसी दिली जाते. मुकेश अंबानी याच इस्टोनियाचे इ-निवासी असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातल्या नवनियुक्त राजदूत मार्जे लूप यांनी आज दिली. इस्टोनियाचे इ-रहिवासी होऊन तेथे उद्योग/कंपनी सुरु करता येते असेही त्यांनी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या मुंबई भेटीवर आलेल्या इस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतल्या राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. इस्टोनिया देशाचा ५० टक्के भूभाग जंगलाने व्याप्त असून मोठा भाग निर्मनुष्य परंतु जैवविविधतेने नटलेला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशातील मध्ययुगीन शहरे व बंगले पर्यटकांना आवडतील. भारतीय पर्यटकांनी इस्टोनियाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सांस्कृतिक सहकार्य परस्परांना जोडण्यास मदत करते. इस्टोनिया आपले कॉयर समूह भारतात पाठवेल तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक पथक इस्टोनियाला बोलावणार असल्याचे राजदूतांनी सांगितले. पूर्वीच्या सोव्हिएत युनिअनमधून स्वतंत्र झालेला इस्टोनिया हा देश सायबरसुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटासुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो व्यवस्थापन अशा उच्च तंत्रज्ञानाच्या जगात अग्रस्थानी असून या क्षेत्रात भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी सहकार्य करण्याबाबत उत्सुक असल्याचेही इस्टोनियाच्या भारतातल्या नवनियुक्त राजदूत मार्जे लूप यांनी सांगितले.

इस्टोनियाने डेटासुरक्षेच्या दृष्टीने लक्झेम्बर्ग येथे स्वतःचा ‘माहिती दूतावास’ (डेटा एम्बसी) सुरु केली असून क्लाऊड तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवला जातो. डेटासुरक्षा क्षेत्रात इस्टोनिया भारताला व महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करू शकेल, असे त्या म्हणाल्या. भारतातील जिओ व टीसीएस कंपन्यांशीदेखील सहकार्य करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्टोनियाचे स्वतःचे प्रतिष्ठित आणि जुने ‘टॅलीन तंत्रज्ञान विद्यापीठ’ असून या विद्यापीठात इ-गव्हर्नन्स, सायबरसुरक्षा, उपयोजित अभियांत्रिकी, जहाजबांधणी व इतर उच्च कौशल्ये शिकविली जातात. या विद्यापीठाशी महाराष्ट्राने सहकार्य प्रस्थापित केल्यास ते उपयुक्त ठरेल, असे राजदूतांनी सांगितले.

काही देशांची अर्थव्यवस्था जगातील युद्धजन्य स्थितीमुळे मंदावत असली तरीही भारताची अर्थव्यवस्था उत्तम गतीने वाढत आहे. भारताशी व्यापार, वाणिज्य व सांस्कृतिक संबंध वाढविण्याची सध्याची वेळ योग्य असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी राजदूत लूप यांना सांगितले.

इस्टोनियाच्या टारटू विद्यापीठात १८३७पासून संस्कृत भाषा शिकवीत असत. परंतु कालांतराने संस्कृत भाषेचे वर्ग बंद झाले. या विद्यापीठाला संस्कृत अध्यापक उपलब्ध करून संस्कृत भाषेटे वर्ग पुन्हा सुरु करण्यास महाराष्ट्रातील संस्कृत विद्यापीठ मदत करेल अशी ग्वाही राज्यपालांनी दिली. यावेळी इस्टोनियाचे भारतातील दूतावासाचे उपप्रमुख मार्गस सोलसन व मुंबईतील मानद वाणिज्यदूत सुनील खन्ना हेदेखील उपस्थित होते.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content