मान्सून मुंबईतून पाय काढण्यास नकार का देत आहे आणि रिटर्न मान्सून सुरू न झाल्याने यंदा ऑक्टोबर महिनाही पावसाळीच राहणार का, याबाबत पर्यावरणतज्ज्ञ चिंतित आहेत. गेल्या काही वर्षांतील मान्सूनचा बदलता पॅटर्न आणि रिटर्न मान्सूनला होणारा विलंब आता नियमित होत चालला आहे. मुंबईत सलग सहा वर्षांपासून मान्सूनची उशिरा माघार होत आहे. रिटर्न मान्सूनचा यावर्षीचा विलंब असामान्य वाटू शकतो, परंतु शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अशा उशिरा माघारीचे प्रमाण आता सामान्य झाले आहे. यंदा 75 वर्षांत सर्वात आधी, 26 मे रोजी पावसाळा सुरू झाला. राज्यभरात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पूर्णपणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे मुंबईसह राज्यातून मान्सून परतण्यास पुन्हा विलंब होईल.
मुंबईत आठवडाभर अधूनमधून पाऊस
आयएमडीने मंगळवारी ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये वादळासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही आठवडाभर अधूनमधून पाऊस पडण्याची आणि ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे, नैऋत्य मान्सून 8 ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईतून माघार घेण्यास सुरुवात करतो, परंतु यावर्षी, रिटर्न मान्सून मागे पडल्याचे दिसून येते.

ऑक्टोबरमध्येही पाऊस का पडत आहे?
आयएमडी शास्त्रज्ञांच्या मते, सतत सुरू असलेल्या पावसाचे कारण पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) आहे. ही एक हवामान प्रणाली आहे, जी हिवाळ्यात उत्तर भारतात पाऊस आणते. ही वादळे भूमध्यसागरीय प्रदेशाजवळ निर्माण होतात. अफगाणिस्तान आणि इराणमधून पूर्वेकडे प्रवास करतात आणि भूमध्यसागरीय, काळा, कॅस्पियन आणि अरबी समुद्रातून ओलावा गोळा करतात. जेव्हा ते भारतात पोहोचतात, तेव्हा ते अनेकदा अवकाळी पाऊस पाडतात. या प्रणालीमुळे मुंबईनजीक मान्सून ट्रफ तयार झाला आहे, म्हणजेच पाकिस्तानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला एक लांब, कमी दाबाचा पट्टा! जेव्हा हा ट्रफ दक्षिणेकडे खाली जातो, तेव्हा मुंबईसह पश्चिम किनाऱ्यावर पावसाचा जोर वाढतो.
अरबी समुद्रावर मान्सूनचा प्रवाह अजूनही बळकट
आयएमडीच्या चार्टनुसार, सध्या दक्षिण कर्नाटकच्या आतील भागातून कोमोरिन प्रदेशापर्यंत एक ट्रफ रेषा पसरली आहे, ज्यामुळे मध्य अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सूनचा प्रवाह बळकट होत आहे. सध्या उष्ण आणि उन्हाळी दिवस आहेत. परंतु 6 आणि 7 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते आणि पाऊस वाढू शकतो. कारण पुढील काही दिवसांत पश्चिमी विक्षोभाचा परिणाम राज्यावर होणार आहे. हा पश्चिमी विक्षोभ सध्या कमी होत आहे आणि त्यामुळे ओलावा वाढेल. या ओलाव्याच्या उपलब्धतेमुळे पाऊस वाढेल. तीव्रता मात्र मध्यम राहण्याची शक्यता आहे.

मान्सून परतण्यास अनेकदा विलंब का होतो?
विशिष्ट हवामान परिस्थिती, सलग पाच दिवस सतत कोरडे वातावरण, वाऱ्याच्या दिशेत बदल, हवेतील आर्द्रता कमी होणे आणि हवामानाच्या प्रणाली पद्धतींमध्ये स्पष्ट बदल झाल्यानंतरच आयएमडी अधिकृतपणे मान्सून माघारीची घोषणा करते. मुंबईत सलग सहा वर्षांपासून मान्सून उशिरा माघारी गेला आहे. 2024मध्ये, 15 ऑक्टोबर रोजी मान्सून माघारी गेला. 2023 आणि 2022मध्ये, तो उशिरा म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत परतला. 2021मध्ये, 14 ऑक्टोबर रोजी मान्सून संपला. 2020मध्ये, 28 ऑक्टोबरपर्यंत मान्सून मुक्कामी होता. 2019मध्येही, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून सक्रीय राहिला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही स्थिती व्यापक हवामान बदल आणि या प्रदेशात ओलावा ओढणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालींच्या वाढत्या सातत्याचे संकेत देते.