Homeडेली पल्सआपला मोहन गेला..

आपला मोहन गेला..

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्त थोडेसे..
“गावातला शेवटचा जागा माणूस

नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं

निघताना मूर्ख असावं तर्क शोधू नये

साखरझोपेतच सोडावं शहर वाटेतलं”

सौमित्रने शहर सोडण्याबद्दल लिहिले आहे. पण आमच्या मोहनने शहर सोडण्याऐवजी जगच सोडणे पसंत केले. सकाळी सकाळी जेव्हा मोहन रावले गेल्याचे वृत्त समजले तेव्हा सुन्नच झालो. गेल्या 35/40 वर्षांतील आमच्या मैत्रीतील विविध प्रसंग, खटके, विद्यार्थी सेनेचे यश, बेस्ट समितीच्या बैठकीतील यशस्वी वादविवाद, लागोपाठच्या पाच लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यश हे सर्व प्रसंग झर्रकन डोळ्यासमोरून गेले. त्याच्या लग्नात रात्री उशिरापर्यंत थिरकलेले पाय.. सर्व आठवले. विजयकुमार एक बातमी आहे, कुठे भेटायचे? की तुम्ही आणि वसंतराव (वसंत शिंदे : मुंबई मराठी पत्रकार संघाचे तेव्हाचे अध्यक्ष व लोकसत्ताचे तेव्हाचे मुख्य वार्ताहर) परळला माझ्या घरीच येताय! असा फोन आला की समजायचे काहीतरी खास ब्रेकिंग न्यूज असणारच!! आणि दिलेली माहिती म्हणजे एक नंबर असायची!!

शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेपासून मोहनने आपला राजकीय प्रवास सुरू केला. विद्यार्थी सेना, बेस्ट समितीचे बिगर नगरसेवकपद आणि नंतर लोकसभा खासदार तेही तब्बल पाच वेळा, 1991 ते 2004पर्यंत दक्षिणमध्य मुंबईतून सलग निवडून येणे सोपे नव्हते. पहिल्या निवडणुकीत तर लढवय्ये कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांना हा कामगार पुत्र भिडलाच आणि दणदणीत विजयी झाला. प्रचाराचे सूत्रच मुळी कामगार नेता विरुद्ध कामगाराचा मुलगा असे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास हेच मोहनचे ATM कार्ड होते. बाळासाहेबांसाठी वाट्टेल ते! हा त्याचा एक सूत्री कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम मधली दीड वर्षे वगळता त्याने नेटाने पार पाडला.

मोहन विद्यार्थी सेनेचे काम पाहत असताना दिलीप करंडेबरोबर त्याची पहिली भेट झाली दिलीप मला आधीपासून ओळखत होता (बँक ऑफ इंडिया). विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष असताना मोहनने आपल्या संघटनकौशल्याने सतत पाच वेळा मुंबई विद्यापीठावर विद्यार्थी सेनेचा झेंडा फडकवला होता. सर्व राजकीय पक्षात त्याचे मैत्रीचे संबंध असल्याने विद्यापीठाच्या निवडणुका तो लीलया सांभाळायचा. नंतर बाळासाहेबांनी विद्यार्थी सेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे सोपवली. मोहन थोडासा दुखावला गेलाच. पण, त्याने परिस्थितीशी हसतमुखाने समझोता केला आणि खासदारकीचे तिकीट खेचून आणले. नंतर त्याने मागे पाहिलेच नाही. लालबाग-परळ ही मोहनची कर्मभूमी..

“मुंबईच्या धमन्या मुठीत घेऊन
वेशीवर येती रणगाडे घेऊन
पर्वतासम खडा ठाकतोस घेऊन
विजेची पोलादी समशेर घेऊन
कैक शहिदांची कर्मभू लालबाग
सदैव सज्ज बॅरिकेड लालबाग
यंत्राशी जोडलेला असे जरी हात
दर्द घेऊन झुंजणारा लालबाग”

अशी काहीशी प्रतिमा झाली होती मोहनची. आपल्या विभागात काम करताना मोहन काहीसा रावडी वागायचा. परंतु हाच गरम डोक्याचा मोहन आपल्या विभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यासंमोर मात्र मऊ मेणाहून विष्णुदास बनून उभा राहत असे तेव्हा अधिकाऱ्यांना प्रश्न पडत असे ‘तोच हा रावले ना रे?’ बेस्ट समितीमध्येसुद्धा तो तावातावाने बोले. पण मुद्दे कधी सुटत नसत. बेस्ट समिती किंवा प्रशासन भाडेवाढ हा शब्द वापरतच नसे. भाड्याचे सुसूत्रीकरण असा भन्नाट शब्द प्रशासनाने शोधून काढला होता. या शब्दाबद्दलही मोहन नेहमी नाराजी व्यक्त करत असे. एखादी गोष्ट किंवा प्रस्ताव समजला नाही तर तो अधिकाऱ्यांसमोर बसून तो विषय समजून घेत असे.
त्याचे परळचे घर म्हणजे शिवसैनिकांचा अड्डाच होता. त्या जमान्यात हॉटेल्स, बारचा आजच्याइतका सुळसुळाट नव्हता. त्यावेळी मोहन परळच्या गच्चीवर पार्टी आयोजित करायचा. जसजसा त्याचा औरा वाढत गेला तशी मोठी हॉटेल्सही आली. अगदी पंचतारांकितसुद्धा.. पण आमच्या या मित्राने जमीन कधी सोडली नाही.

“when we are sick, we want an uncommon doctor, when we have constriction job, we want an uncommon engineer and when we are at war, we want an uncommon general, it is only when we get into politics we are satisfied with common man”

आजच्या राजकारणाला हे मुळीच लागू नाही. पण मोहन नेहमी सामान्य माणसाला केंद्रीभूत मानत असे. दीड वर्षाचे बालंट सोडून देऊया. नरसिंह राव यांचे सरकार वाचवण्यात मोहनने हातभार लावला. त्यानिमित्ताने मोठी देवाणघेवाण झाली असे बरेच प्रवाद उठले. अगदी काही काळ बाळासाहेबांचा हा शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावला. पण लगेच राष्ट्रवादीत मन रमले नाही असे सांगत बाळासाहेबांच्या चरणी लीन झाला. ‘वेडा वाकुडा गाईन परी तुझाच म्हणविन!’ यापरते दुसरे उदाहरण ते कुठले? मोहन तू फार घाई केलीस रे.. नाहीतरी तू नेहमी घाईतच यायचास. थोडं थांबायचं होतस मित्रा.. तुला आदरांजली!

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content