Monday, March 10, 2025
Homeमाय व्हॉईसकेवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने...

केवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने नाही मिळणार मते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर मेळावे झाले. दोन्ही सभांना साधारण तितकीच गर्दी जमली होती आणि दोघेही एकमेकांना दूषणे देत होते, हे मुंबईकरांनी पाहिले, अनुभवले. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी १९६०च्या दशकात स्थापन केलेल्या मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणाऱ्या आक्रमक संघटनेने ८०च्या दशकात राजकीय आखाड्यात प्रवेश केला. सुरुवातीला ठाकरेंची भूमिका होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण. पण बघताबघता हे गणित उलटे झाले. नंतर नंतर ऐंशी टक्के राजकारण सुरु झाले. अर्थातच शिवसेनेच्या शाखा हा सळसळत्या तरूणांना एकत्रित करणारा आणि सातत्याने परिसरातील लोकांच्या उपयोगी पडणारा असा आगळावेगळा आविष्कार होता व आजही काही प्रमाणात आहे. तीच शिवसेनेची ताकद होती. शरद पवारांसारख्या नेत्यांना शिवेसनेचे आकर्षण वाटत होते ते याच शाखांच्या जिवंत जाळ्यामुळे. पण आताच्या शिवेसनेनच्या शाखा या निराळ्या पद्धतीने सुरु असतात असे दिसते.

बाळासाहेब

बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेचे वैशिष्ट्य या शाखा होते तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील पक्षाचे वैशिष्ट्य शिवसेना भवनातून घेतले जाणारे निर्णय ठरले. शिवसेनेमधील शाखांचे महत्त्व अलिकडच्या वीस-पंचवीस वर्षांत क्रमश: कमी झालेले दिसते. बाळासाहेब ठाकरेंचे निधन हा शिवसेनेमधील बदलाचा मोठा टप्पा मानावा लागेल. तोवर जे लहानमोठे शिवसेनेमधून बाहेर पडले होते त्यांचे राजकीय महत्त्व तितके राहिले नव्हते. १९९१मध्ये शिवेसनेमधून प्रथमच मोठ्या प्रमाणात आमदारांचा गट बाहेर पडला. पण छगन भुजबळांचे ते बंड शिवेसनेत दुभंग घडवू शकले नाही. त्यांच्यासोबत सुरुवातीला दिसलेले छत्तीस आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश न करता तसेच माघारी फिरले होते. त्या प्रसंगातील नाट्यमयता आपल्याला अलिकडेच २०१९मध्ये दुसऱ्या एक पक्षात दिसली होती. ज्यांना २०१९मधली राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित फुटीचे नाट्य आठवते त्यांना १९९१मधील सेना फुटीचा प्रसंग सहजच मनात पाहता येईल..!

बाळासाहेब

ज्या पद्धतीने अजित पवारांबरोबर राजभवनावर पहाटेच्या शपथेच्या वेळी दिसलेले आमदार आणि नंतर त्यांच्यासोबत अज्ञात ठिकाणी निघून गेलेले आमदार पुढच्या तीन दिवसांतच शरद पवारांसमोर यशवंतराव चव्हाण केंद्रात हजर झाले वा हजर केले गेले. तसाच प्रकार भुजबळांच्या बंडावेळी झाला होता. अर्थात त्यावेळेचा तणाव अधिक ऊग्र होता. आनंद दिघेंसारखे सेना नेते नागपुरात हजर झाले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार हादरले होते कारण सैनिकांच्या हातात नंग्या तलवारी दिसत होत्या. भुजबळांबरोबर फक्त तीन-चार आमदार अंतिमतः काँग्रेसमध्ये गेले आणि भुजबळांसह ते सारेच पुढच्या १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पडले. भुजबळांसारख्या बड्या नेत्याला आणि काँग्रेसमधील एक ताकदवान मंत्र्याला पाडणारा उमेदवार बाळा नांदगावकरांसारखा साधा शिवसैनिक होता. अर्थात नांदगावकरही तेव्हा नगरसेवक होते व विभागप्रमुखही होते. पण साध्या सैनिकाला जायंट किलर बनवणे ही तेव्हाच्या शिवसेनेची ताकद होती.

बाळासाहेब

२००५मध्ये शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडले व त्यांनी विलासरावांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा भुजबळांइतका तीव्र विरोध त्यांना झाला नाही. राणेंच्या वेळी बदललेल्या पक्षांतर कायद्याला बगल देण्यासाठी एकेका आमदाराने पाठोपाठ राजीनामे दिले व त्यांच्या पोटनिवडणुका लागल्या. त्यात ते सारे काँग्रेसचे आमदार बनले. सहा लोकांनी राणेंच्या त्या पोटनिवडणुका बंडात भाग घेतला. त्यातील शाम सावंत वगळता सारेच निवडून आले. म्हणजे भुजबळांवेळेची शिवसेना आता आणखी बदललेली दिसली. राणेंनी तर तेव्हा शिवेसनेच्या विरोधात भांडूपपासून परळपर्यंत मुंबईत अनेक आव्हानसभा घेतल्या होत्या.

बाळासाहेब

राणेंच्या पाठोपाठ राज ठाकरे बाहेर पडले. पण त्यांचे बंड शिवसेनेसाठी आणखी घातक ठरले. खरेतर शिवसेनेत खऱ्या अर्थाने तेव्हा प्रथमच मोठ्या प्रमाणात उभी फूट पडली. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शिवेसना सोडून गेलेलेच सारे सैनिक होते. तेव्हाही शिवसेनेतील काही लोकांनी राज यांच्याविरोधात सेनेची ऊग्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.. अशी स्थिती असल्याने ती शिवसेना स्टाईल प्रभावी ठरली नाही. भुजबळांचे बंड हा पहिला सेनेला हादरवणारा अध्याय होता तर राणेंची बंडाळी व पाठोपाठ सेनेमधून फुटून मनसेची स्थापना हा शिवसेनेतील बंडाचा दुसरा अध्याय मानावा लागेल.

बाळासाहेब

त्या न्यायाने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांचे व त्यापाठोपाठ सर्व स्तरावरील शिवसेनैकांचे झालेले बंड हा तिसरा अध्याय ठरतो. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर त्या बंडाची व सेनेअंतर्गत संघर्षाची कथा आणखी नाट्यपूर्ण वळणावर पोहोचलेली दिसते. मुंबईच्या रस्त्यांवर व सभांच्या मैदानात ते नाट्य परवा आणखी दिसून आले. निमित्त होते ते बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाचे. २३ जानेवारी हा साहेबांचा जन्मदिवस त्यांच्या हयातीतही सैनिकांसाठी मोठा उत्सव होता आणि आताही तो तितक्याच मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शिवसेनेची जाहीर सभा या दिवशी होते आणि ती पंरपरा शिवसेना नाव, अधिकृत निवडणूक चिन्ह मिळालेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील पक्षानेही सुरु ठेवली आहे. शिवसेनेचे पंरपरागत दसरा मेळावा, २३ जानेवारीची सभा हे उपक्रम एकनाथ शिंदेंनीही त्याच जोमाने सुरु ठेवले आहेत. २०२२च्या जूनमध्ये ते बाहेर पडले तेव्हापासून गेले अडीच-तीन वर्षे हा प्रकार मुंबई व महाराष्ट्र अनुभवतो आहे.

बाळासाहेब

एकाच दिवशी दोन-दोन दसरा मेळावे आणि ठाकरेंचे दोन-दोन जन्मोत्सव आपण पाहतो. दसऱ्याला तिसराही मोठा मेळावा राज ठाकरेंच्या मनसेचा होतो. २०२५ची ठाकरे जयंती सभाही याला अपवाद नव्हती. मातोश्रीशी संलग्न ठाकरे सेनेची सभा अंधेरीत पार पडली तर एकनाथ शिंदेंनी बीकेसीत सभा घेतली. शिंदे व ठाकरे, दोन्ही सभांना साधारण तितकीच गर्दी जमली होती आणि दोघेही एकमेकांना दूषणे देत होते हे मुंबईकरांनी पाहिले, अनुभवले. पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणसाला यांच्या अंतर्गत भांडणात का व किती रस असावा याचा विचार आता दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. तुमच्या पक्षाचा विकासाचा अजेंडा काय, तुम्ही मुंबईसाठी व महाराष्ट्रासाठी काय करू इच्छिता, तुमचा कार्यक्रम काय असेल, हे आता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी महाराष्ट्राला सांगायला हवे. शिंदेंनी मातोश्रीला शिव्या देण्याचे आणि मला अमित शाहांचा सूड घ्यायचा आहे, अशा पोकळ गर्जना करणे ठाकरेंनी थांबवावे. जनतेला तुम्ही काय देणार आहात हे आता शिंदे व ठाकरेंनी बोलायला हवे. येणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह २७ महानगरपालिका, २५३ नगरपालिका, ३५ जिल्हा परिषदा आणि साडेतीनशे तालुका पंचायत समित्या अशा महाप्रचंड स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात पुन्हा एकदा सारेच राजकीय पक्ष उतरणार आहेत. केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या नामस्मरणाने आता ना ठाकरेंना मते मिळू शकतील ना एकनाथ शिंदेंना! दोन्ही बाजूंना, त्यांचे अंगचे खरे सामर्थ्य जनतेला दाखवावेच लागणार!!

Continue reading

पंगा घेणं नीलमताईंसाठी नवं नाही!

पूर्वी मातोश्रीवर दोन मर्सिडीज गाड्या पोहोचल्या की एक पद मिळत होते, हे मी पाहिलेले आहे, माझा स्वतःचा अनुभव नाही, अशा अर्थाचे उद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले. ज्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्या हे बोलल्या,...

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!, असे म्हणतात ते उगाच नाही. प्रयागराज क्षेत्राच्या नैनी तटावरील अरैल घाटावर पहाटे साडेपाच-सहा वाजता आम्ही चाललो होतो, तेव्हाही तिथे आमच्या आजुबाजूने किमान दोन-तीन हजार लोकं चालत होते. काही घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते....

अमेरिकेतले बेकायदेशीर नागरीक हे भारतातल्या बांगलादेशींसारखेच!

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवायला सुरुवात केली आहे. जगभरातील जे लोक अमेरिकेत बेकायदा राहतात त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे वचन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. सत्तेवर येताच त्याच्या पूर्ततेची पावले टाकायला त्यांनी सुरूवात...
Skip to content