Homeमाय व्हॉईसएमडी ते इस्टसी.....

एमडी ते इस्टसी.. चाचा चखेगा तो.. क्या चखेगा??

गेल्या आठवड्यातच मी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सर्वच राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत ठाण मांडून बसल्या असतानाही अंमली पदार्थ मुंबईत मिळतातच कसे?? असा प्रश्न विचारला होता. परंतु, गेले चारपाच दिवस मुंबई, ठाण्यात बऱ्याच ठिकाणी फेरफटका मारला असता अजूनही क्रॉफर्ड मार्केट ते कुलाबा, काळबादेवी ते डोंगरी व्हाया पायधुनी, नागपाडा-माझगाव, सांताक्रूज, बांद्रा, जुहू, पी डिमेलो रोड, चेंबूरच्या हायफाय हॉटेल्सनजीक, कुर्ला, हिरानंदानी तसेच पवईच्या अनेक भागात, साकी नाका, मरोळ मरोशी रोड, आरे कॉलनी ते थेट कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड ठाण्यातील चकाचक बार-हॉटेल्सचे परिसर, ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील काही डान्स क्लब, अनेक हुक्का पार्लर आदी हजारो ठिकाणी पाहिजे तो अंमली पदार्थ, पाहिजे तितक्या वजनाचा मिळू शकतो. नव्हे तो मिळतो.. हे उघडया डोळ्यांनी पाहिले आणि धन्य झालो.

एकीकडे शाहरुख खानचा मुलगा, आर्यन खानला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक केल्यानंतर सर्वच सेक्शन गरम असताना सर्व अंमली पदार्थ मिळू शकतात हे पाहिल्यावर सर्व तपासयंत्रणांना सरकारनेच अरबी समुद्रात बुडवून टाकावे असेच मनोमन वाटले. इतकी हवा गरम असताना सर्व अंमली पदार्थ मिळतात, याचाच अर्थ अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याचा ‘गॉड फादर’ खरोखरच शक्तिमान असला पाहिजे, असे वाटून धन्य जाहलो!!

गेल्या 20 /25 वर्षांत किंवा त्या आधीपासूनच तरुण पिढी आणि श्रीमंत, अति श्रीमंत वर्गात तसेच चित्रपट सृष्टीत अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण 200/300 पटीत वाढलेले दिसत आहे. या अंमली पदार्थांच्या विळख्याने भारतीय उपखंडाला जवळजवळ गिळून टाकले आहे. एमडीची साधी 150/200 रुपयांत मिळणारी गोळी आताच्या घडीला सहज 700 रुपयांच्या पुढे गेली आहे. हे घेण्याचं कारण काय, तर म्हणे कुल वाटते.. हे कुल म्हणजे काय, विचारले असता एक तरुण म्हणाला- चाचा हे शब्दात नाही सांगता येणार. चाचा, यह तो चखने बादही आप फिल करेंगे..

तशीच एक दुसरी गोळी इस्टसी ही गोळी घेतली तर म्हणे आनंदाचा ज्वर चढतो. म्हणजे सोप्या शब्दात उन्माद चढतो. मग या उन्मादात दारू ढोसली जाते आणि नंतर शेवटची पायरी सेक्समध्ये!! अंमली पदार्थ हमखास मिळण्याचे एकच ठिकाण ते म्हणजे डोंगरी परिसर.. त्याच्यानजीक असलेल्या वाडीबंदर परिसरातही हा फोफावलेला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थ प्रतिबंधक राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाडीबंदर डोंगरी परिसरातील चिंकू पठाणला जेरबंद केले. त्याच्या तपासात अंमली पदार्थ विक्रीचा ‘पेंडोरा बॉक्स’च उघडला. अनेक सेलीब्रिटींची नावे आणि विशेष म्हणजे काही आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांची नावे तसेच पोलीस निरीक्षक, हवालदारांची नावे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही बातमीही पातळ करून माध्यमांना देण्यात आली. हिंदी चित्रपट सृष्टीतील एका विनोदी अभिनेत्याच्या जवळच्या नातेवाईकाचे नावही पुढे आले होते.

एमडी

चिंकू पठानच्या जबाबानंतर डोंगरी पोलीस कामाला लागले आणि त्यांनी आपला परिसर पिंजून काढला. पोलिसांची धडक कारवाई सुरू होताच अनेक छोट्यामोठ्या पंटरनी सुबाल्या केले. ही मंडळी दुसऱ्या भागात जाऊन धंदा करू लागली. अनेक ठिकाणी फिरत असताना एक मजेशीर घटना कानावर आली. ही घटना वानखेडे साहेब आणि शाहरुखच्या संबंधी आहे. काही वर्षांपूर्वी असाच एकदा शाहरुख परदेशी वारीहून सांताक्रूज विमानतळावर उतरला. कस्टम तपासणीत शाहरुखकडे एक परदेश बनावटीचे भारी घड्याळ सापडले. शाहरुखने सांगितले की, या घड्याळ कंपनीचा मी अँबसेडर आहे. कस्टम ऑफिसर वानखेडे होते. त्यांनी ते अमान्य केले व सांगितले की, हे घड्याळ परदेशी बनावटीचे आहे. तुम्हाला ड्युटी भरावीच लागेल. दोघांमध्ये काहीशी मचमच झाली. दिल्लीला फोन करण्यापर्यंत वादावादी वाढली. अखेर शाहरुखला ड्युटी भरावीच लागली. यानंतर मात्र शाहरुख आणि वानखडे यांचे संबंध चांगले झाले.

काहींनी तर सांगितले की, त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचे दिसत होते. असो. मैत्री असतानाही जहाजावरील धाडीचे गूढ काही इतक्यात उलगडणार नाही. काही दिवसांनी ते आपोआप पुढे येईल. अंमली पदार्थांचा दरही अवास्तव वाढल्याने नफ्याची टक्केवारीही आसमानको छु गयी है.. वर एमडी गोळीचा उल्लेख आलाच आहे. हेरॉईनचे असेच आहे. तीन हजारांचा भाव आता 15/20 हजारांवर आरामात गेला आहे. दक्षिण मुंबई, बांद्रा आणि जुहू परिसरात हेरॉईन जादा प्रमाणात विकले जाते. काही ठिकाणी तर अंमली पदार्थ कचऱ्याच्या पेटीत ठेवले जातात. या पेटीवर नजर ठेवणारी माणसे असतात. फोनवर सर्व सांगितले जाते. तो माल उचलेपर्यंत नजर ठेवली जाते. नजर हटी.. तो दुर्घटना घटी.., असा प्रकार असतो.

अंधेरी पूर्वच्या मापखान नगर, विजयनगर, संकस्ट पाडा आदी परिसरात चरस, गांजा, अफीम राजरोसपणे मिळते. फोन करून हा माल मागवला जातो व पहाटे तीन वाजेपर्यंत या सर्वांचा त्रास या परिसरातील नागरिकांना गेले अनेक वर्षं होतोय असे अनेकांनी मला सांगितले. यासंबंधी एमआयडीसी पोलीसठाण्यात तक्रारही करण्यात आलेली आहे. याच परिसरातील चर्च रोड, पालिकेचे उद्यान, हसन स्कूल झरीना वाल आणि मंगू म्हात्रे चाळ, पुढे मरोशी मार्गावरील देवधर सेंटर आदी अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असते. आरे कॉलनीमधील फिल्टर पाडा परिसरातही काही व्यक्ती आणि एक दोन औषधांच्या दुकानांत अंमली पदार्थांच्या गोळ्या मिळतात. मुंबई, ठाण्यातील ही यादी आणखी बरीच वाढवता येईल.

अंमली पदार्थांची विक्री वाढत असताना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडे अंमलदारांसहित अवघी 120 माणसे, ठाणे पोलिसांकडे हा आकडा 40च्या पुढेही जात नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय मुंबई पोलिसांच्या या विभागास नवीन प्रशस्त जागेची गरज आहे. आता आहे ती जागा आझाद मैदान पोलीसठाण्याच्या परिसरातील एक जुनी हवेली आहे. त्यांचा जुना लोखंडी जिनाही कधी लटपटू लागेल सांगता येत नाही. आणखी ही बऱ्याच गोष्टी आहेत. त्या पुन्हा कधीतरी साविस्तर..

Continue reading

अमेरिकेचे दुर्मिळ ‘अवाक्स’ विमान इराणकडून नष्ट

पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला असून इराणने सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान एअर बेस'वर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या कारवाईत अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत दुर्मिळ आणि मोक्याचे 'ई-३ सेंट्री अवाक्स' विमान पूर्णपणे नष्ट झाले. संपूर्ण अमेरिकन ताफ्यात केवळ १६...

अमित शाहंपर्यंत भोंदूबाबा खरात पोहोचलाच कसा?

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले आहेत. खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांची थेट नावे वाचत राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "हा भोंदूबाबा तर...

रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी!

जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे भारतीय रुपयाला मोठा धक्का बसला असून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो प्रथमच ९५ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात रुपयामध्ये सुमारे ५% घसरण झाली आहे. प्रामुख्याने मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल...
Skip to content