मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज शासनाला दिले.
आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत केलेल्या टीकेचा विषय उपस्थित करत जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे, याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. जरांगे कोणाच्या कारखान्यात राहत होते, त्यांना पैसा कोण पुरवत होते, कोण त्यांच्या संपर्कात होते, कोण बैठका घेत होते, हे कळलेच पाहिजे. ज्या पद्धतीने जरांगेंनी भाषा वापरली आहे ती पाहता त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणीही शेलार यांनी केली.
काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी यावर बोलताना जरांगेंच्या भावनांचा विचार करावा, अशी सूचना केली तर तशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले.

जरांगेंचा बोलविता धनी शोधलाच पाहिजे -फडणवीस
या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे आहे. सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एसआयटी गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टातसुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होत आहे, असे फडणवीस म्हणाले.
मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? पण संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देत आहे? हे सारे समोर येत आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की.. हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल!, असेही थ्यांनी सांगितले.