Sunday, March 16, 2025
Homeचिट चॅटकोमसाप दादरचा मराठी भाषा...

कोमसाप दादरचा मराठी भाषा पंधरवडा संपन्न

अनुयोग विद्यालय, खार व कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने बाल साहित्यावरील कार्यक्रमाचे आयोजन मुंबई अनुयोग विद्यालय, जवाहर नगर, खार (पूर्व) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य सतिशचंद्र (भाई) चिंदरकर, संस्थापक, अनुयोग विद्यालय  यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कोमसापच्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी फरझाना इक्बाल उपस्थित होत्या. तसेच दादर शाखा अध्यक्षा विद्याताई प्रभू, कार्यवाह मनोज धुरंधर, ज्येष्ठ सभासद अशोक मोहिले व अनुयोग शाळेचे मुख्याध्यापक परब यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे निवेदन दादर शाखा कोषाध्यक्ष समीर बने यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुलांनीच हस्तकलेने बनविलेल्या कागदी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमात प्रथम अनुयोग विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे छान सादरीकरण केले. तदनंतर कोमसाप शाखांच्या पदाधिकाऱ्यांपैकी विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाडे, बोरिवली शाखेचे विजय तारी, दादर शाखेचे अशोक मोहिले यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

मान्यवरांपैकी प्रमुख पाहुण्या कवयित्री फरझाना इक्बाल यांनी मुलांना काव्यासंदर्भात व प्रसंगानुरूप कविता कशी लिहावी याचे मार्गदर्शन केले व आपली “खारुताई” या कवितेचे सादरीकरण केले. ते मुलांना खूप आवडले. तदनंतर दादर शाखा कार्यवाह मनोज धुरंधर यांनी मराठी भाषा आणि तिची महती सांगणाऱ्या महापुरूषांवरील एक सुंदर गीत गायले. मुलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नंतर दादर शाखा अध्यक्षा विद्या प्रभू यांनी सर्वप्रथम मुलांना शाळेसाठी, शिक्षकांसाठी टाळ्या वाजवायला सांगितले. अनुयोग विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात ही फार मोलाची संधी आहे असे प्रतिपादन केले. शाळेत जे साहित्यिक, सांस्कृतिक, संस्कारक्षम असे वातावरण आहे हे तुमच्या जडणघडणीसाठी मौलिक, उपयुक्त असे आहे. कदाचित आज याचे मोल तुम्हाला कमी वाटत असेल. पण भविष्यात तुम्हाला अभिमान वाटेल की आपण अनुयोगचे विद्यार्थी आहोत.

पुढे त्यांनी महात्मा गांधीजींच्या शिष्याची ‘नेहमी खरे का बोलावे’ ही गोष्ट सांगितली. यात आपल्या खरे बोलण्याने खोटे बोलणाऱ्यांची संख्या एकाने कमी होईल व स्वत:बद्दल अभिमानाची भावना वाढेल की मी नेहमी खरं बोलतो. नंतर ‘चिमणीची गोष्ट ‘सांगितली. यातून साने गुरुजींच्या जगाला प्रेम अर्पावे या भावनेची, संदेशाची आज गरज आहे हा प्रेमाचा संदेश देऊन आपलं छोटेखानी भाषण संपवलं.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश चिंदरकर सरांनी मुलांना जुन्या सेवा दलाच्या, साने गुरुजींच्या व आपल्याला कविता गोडी लावणाऱ्या त्यांच्या शिक्षकांच्या हृद्य आठवणी सांगितल्या. मुले खूप भावूक होऊन सारं ऐकत होती. त्यांनी आपल्या बालपणीच्या काही कविता ही सादर केल्या. निवेदक कवी समीर बने यांनी सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित शाखांच्या अध्यक्ष, पदाधिकारी सभासद व अनुयोगच्या सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content