मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त सुरू झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुद्धीबळ स्पर्धेत आरव जतानिया, समीर नाडकर्णी, अनंत काब्रा, आस्य चव्हाण, खुश मोकारीया, मल्हार कोटे आदींनी विजयी दौड केली.
मुंबई बुद्धीबळ असोसिएशन मान्यतेच्या स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील ६४ सबज्युनियर खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते झाले.
मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आरव जतानियाने मितांश टोलीयाच्या राजाला १६व्या चालीअखेर नमविले. समीर नाडकर्णीने अक्षय काब्राला तर अनंत काब्राने समीर थोरातला पराभूत केले. १२ वर्षांखालील गटात आस्य चव्हाणने जश मोकारीयावर, खुश मोकारीयाने अब्दुल हादीवर तर मल्हार कोटेने आदित्य पालकरवर विजय मिळवून सलामीचा पहिला साखळी गुण वसूल केला.
उदघाटनप्रसंगी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हशम धामस्कर, प्रकाश वाघमारे, भार्गव धारगळकर, जनार्दन मोरे, अशोक नवले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.