दसऱ्याच्या आदल्यादिवशी जोरशोरसे सांगून ५० लाख रुपयांच्या लाचेच्या आरोपाखाली ठाण्याचे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना केलेली अटक वा कारवाई ही एक ‘फार्स’ ठरणार असल्याची माहिती काल सुमारे दोन-अडीच तास ठाणे महापालिका मुख्यालयात फेरफटका मारला असता हाती आली. तक्रारदार मुलुंड येथील बांधकाम व्यावसायिक, भाजपचे मुलुंडमधले एका ज्येष्ठ माजी नगरेसवकाचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजते.
तक्रारीत असे म्हटले होते की, नौपाडा येथील एका छोट्या भूखंडावर एक छोटे ‘हाऊस’ असून त्याच्या आजूबाजूला ड्रेस मटेरियल विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवल्यास वा ते अनधिकृत ठरवल्यास तो भूखंड पुनर्विकास करण्याजोगा होईल. अन्यथा त्याचा तसा फायदा नाही. हे अतिक्रमण हटवून द्यावे किंवा नियमित करावे ज्यायोगे भूखंडाचा पुनर्विकास चांगला होईल, अशी मागणी हॊती. तक्रारदाराच्या या दोन मांगण्यापैकी कुठलीही मान्य करण्यासाठी ‘बोली’ ठरली. प्रथम पाटोळे यांना भूखंड नेमका कुठल्या ठिकाणी आहे याची कल्पना नसावी म्हणून बोली १० लाख रुपयात डन केली गेली. मध्ये काही दिवस गेले. एका सकाळी तक्रारदाराने त्यांना फोन केला. तोपर्यंत पाटोळे यांनी भूखंडाची कुंडली पाहून ठेवलेली होती. फोन घेताचक्षणी ते खेकसले ‘ती जागा नौपाड्याची आहे हे तुम्ही मला का सांगितले नाहीत? ते काम इतक्या कमी पैशात मुळीच होणार नाही. तक्रारदार घाबरला. हातचे काम जाऊ नये म्हणून त्याने हळूहळू बोली वाढवण्यास सुरुवात केली. हो ना करता करता बोली ३५ लाखांपर्यंत गेली. कसेबसे ३५ लाख मान्य झाले. तरीही पाटोळेची हाव काही कमी होत नव्हती.
३५ लाख रुपये मान्य होऊनही गाडी काही पुढे सरकत नव्हती. आता तर पाटोळे तक्रादारास टाळू लागला होता. परंतु त्याला कामही हवे होते. शेवटी तोही राजकीय नेत्याचाच नातेवाईक असल्याने त्याने शक्कल लढवली. तो थेट मंत्रालयात गेला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रभावाखालून निसटण्याच्या प्रयत्नात असलेला व मुख्यमंत्री देवाभाऊंच्या गुड बुकमध्ये असणारा एका प्रभावशाली मंत्री तक्रारदाराच्या गळास लागला. तक्रारदारही कोकणातलाच असल्याने पुढेमागे मदतीस येईल, अशा ठाम विश्वासाने या मंत्र्याने हे काम हाती घेतले. झाले.

तक्रारदाराने हुश्श म्हटले. पण पाटोळे हाही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्याने एकदम आकडा ३५ वरून ५० लाख रुपयांवर नेवून ठेवला. आता मात्र तक्रारदार हदरलाच! तरीही नेटाने तो त्या प्रभावशाली मंत्र्याला भेटला. डोळ्यात आसू आणले (खरेखुरे, बाम लावून नाही). प्रभावशाली मंत्रीही हडबडला! या पाटोळेला धडा शिकवला पाहिजे या हेतूने त्यांनी दोन टेलिफोन केले. डाळ शिजायला लागली होती. मंत्र्याने तक्रारदारास लाचलुचपतविरोधी पोलिसांना लेखी तक्रार करण्यास सांगितले. तक्रारदारास पुन्हा हुरूप आला.
तक्रारदाराने पोलिसांना पत्र लिहिले तसेच पाटोळेला रक्कम कुठे आणू विचारण्यासाठी फोन केला. तोवर पोलिसांनी महापालिका मुख्यालय व रक्कम घेऊन जाणारी व्हॅन धाडीसाठी सुसज्ज केली. सर्वच फोन ऐकण्याची सुविधा सर्व संबंधितांकडे सज्ज केली. त्यादिवशी महापालिका मुख्यालयात पालिकेचा वर्धापनदिन साजरा केला जात होता. संताप आणणारी गोष्ट म्हणजे या वर्धापनदिनी पाटोळेने भाषणही केले. भाषणाच्या आधी त्याने तक्रारदारास ३० लाख रुपये घेऊन मुलुंड येथील एलबीएस मार्गावरील संतोषी माता मंदिराजवळ यायला सांगितले. बिचारा तक्रारदार तेथे पोहोचला व फोनची वाट पाहू लागला. काही वेळातच उलट फोन आला. तुम्ही पैसे घेऊन महापालिका मुख्यालयातच या असं सांगण्यात आलं. मुख्यालयात पैसे देतानाघेताना अखेर पाटोळे रंगेहाथ पकडला गेला.
उपायुक्त पाटोळेला रंगेहाथ पकडून तब्बल पाच दिवस झाले असतानाही त्याच्याकडे छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या ५० लाख रुपयांव्यतिरिक्त अजून किती रक्कम मिळाली, त्याच्या घरात काय सापडले, त्याची इतर संपत्ती काय, त्याच्या पत्नीच्या नावे किती संपत्ती आहे, वगैरे तपशील पोलिसांनी काहीच दिला नाही. म्हणून साहजिकच संशयाची पाल चुकचुकली! झाले.. मी थेट मुख्यालयातच पोहोचलो. अधिकृतरित्या काहीच समजले नसते. तेथील काही अधिकाऱ्यांशी ऑफ द रेकॉर्ड बोललो. तरीही काही हाती लागेना. माझी शंका मात्र मी त्यांच्याशी बोलून दाखवली. शंका अशी होती की एखादी धाड पडल्यावर पोलीस आरोपीच्या घराचीही झडती घेतात व संपत्तीचा तपशील देतात. यावेळी तसे का केले गेले नाही? पण कोणी बोलायला तयार नव्हते. अखेर एक-दोन अधिकाऱ्यांनी समझोता झाला असेल, असे सूचित केले. रात्री उशिरा काही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एसीबीच्या धाडीनंतर सर्व तपशील दिला जातो. यावेळी घराची झडती का घेण्यात आली नाही ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मॅडम व लाचलुचपतविरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक याच व्यक्ती सांगू शकतील असे सांगण्यात आले. रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार पाटोळे जामीन घेऊन बाहेर आल्यावर काही दिवसांतच नोकरीवर रुजू होईल, असा अंदाज आहे. “Corruption is a cancer, a cancer that eats away at a citizen’s faith in democracy, diminishing the institutions for innovation and creativity”. पण हल्ली हे विचारात कोण घेतो?