Homeमाय व्हॉईसजिल्हा परिषदेतही महाविकास...

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे पानीपत!

नगरपरिषदेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीने पराभूत मनोवृत्तीत लढवल्याने अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला यश मिळाले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले, ज्यात महायुतीने (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) स्पष्ट विजय मिळवला. विरोधी महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस) मात्र पराभूत झाली. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी महायुतीने ५६२ जागा जिंकल्या, ज्यात भाजपला २३३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १६७ आणि शिंदेंच्या शिवसेनेला १६२ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला फक्त १२५ जागा मिळाल्या, ज्यात काँग्रेस ५६, उद्धवसेना ४३ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला २६ जागा. पंचायत समितीच्या १४६२ जागांमध्येही महायुतीने १०००हून अधिक जागा घेतल्या.

कोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजपने बाजी मारली आहे ती खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांच्या मेहनतीमुळे. विशेष म्हणजे नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणे यांनी शांत राहून आणि डॉ. निलेश राणे यांनी मैदानात उतरून भाजपला धडा शिकवल्यामुळे यावेळी राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी शहाणपणा दाखवला. खासदार नारायण राणे आणि शिवसेना आमदार डॉ. निलेश राणे यांच्याशी व्यवस्थित जागावाटप केल्याने सिंधुदूर्गात निर्विवाद भाजपची सत्ता आली. नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपच्या आहारी गेलेले नितेश राणे यावेळी मात्र ताळ्यावर आले. यावेळी मात्र नितेश राणे यांना राणे ब्रँड आठवला. सिंधुदुर्गातील विजय हा राणे ब्रँडचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपल्या नाराज वडिलांना खूश केले आहे.

रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या सेनेने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. 56पैकी एकेचाळीस जागांवर विजय मिळवून रत्नागिरीतील जनता उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या नव्हे तर शिंदेंच्या सेनेच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार त्यांचे बंधू किरण तथा भैय्या सामंत आणि खेड-दापोलीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आपले गट राखण्यात यशस्वी झाले. या तिघांमुळेच शिंदेंची सेना 41 जागांपर्यंत मजल मारू शकली. ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव गुहागरपुढे मजल मारू शकले नाहीत.

महाविकास

रायगडमध्ये भरतशेठ गोगावले आणि शिंदेंच्या सेनेच्या सर्व आमदारांनी सुनील तटकरे यांच्याशी दोन हात करत येथील निवडणुका लढवल्या होत्या. शिंदेंच्या सेनेने रायगडमध्ये 21 जागांवर मजल मारली आहे. तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त 16 जागा मिळवल्या आहेत. भाजपने शेकापमधील नेत्यांना यापूर्वीच आपलेसे केले होते. त्यामुळे त्यांची मजल 15पर्यंत गेली. शेतकरी कामगार पक्षाचे रायगडमधील वर्चस्व संपुष्टात आले आहे. भाई जयंत पाटील यांनी आता रायगडमध्ये शेकाप औषधालाही शिल्लक ठेवलेला नाही. यापूर्वी एकसंघ शिवसेनेने जयंत पाटील यांच्या शेकापशी दोन हात केले होते. आता शिंदेंच्या सेनेतील आमदारानी आणि भाजपने मिळून शेकापचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरानंतर मराठवाड्यात शिवसेनेने आपले पाय घट्ट केले होते. येथील संघटनाही मजबूत होती. परंतु शिवसेनेच्या फुटीनंतर मराठवाड्यातील हा सर्व असंतुष्ट वर्ग शिंदेंच्या सेनेने आपलासा केला आहे. त्यामुळे मराठवाड्यात शिंदेंच्या सेनेला भाजपच्या खालोखाल यश मिळाले. पुण्यात अजितदादांच्या मृत्यूमुळे सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. पुणे जिल्ह्यातील जनतेने अजितदादांच्या राष्ट्रवादीला भरभरून यश दिले. मात्र साताऱ्यात शंभूराजांना रोखण्यात शिवेंद्रराजे यशस्वी झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याची जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आणण्यात यश मिळवले. शिंदेंच्या सेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी फार मोठी हवा केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे मूळगाव सातारा जिल्ह्यात येत असल्याने आपण ही जिल्हा परिषद सहज निवडून आणू, असा शंभूराजे यांना विश्वास होता. परंतु शिवेंद्रराजे यांनी यांनी त्यांच्यावर मात केली.

सांगलीमध्ये अटीतटीची लढाई आहे. महाविकास आघाडीकडे 31 सदस्य आहेत तर महायुतीकडे 30 सदस्य आहेत. त्यामुळे अद्यापही ही जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात जाणार हे कुणीही सांगू शकत नाही. येथे जयंत पाटील यांनी आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे. कोल्हापूरमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर तरी विरोधकांचे डोकं ठिकाण्यावर येईल आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता सकारात्मक विचारही जनतेला रुचतो, हे त्यांना त्यांना उमजून येईल ही अपेक्षा!

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

शरद पवारांना महाग पडणार घाईघाईतले विलिनीकरण!

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील याबद्दल तीळमात्र शंका नाही. त्यांचाही जन्म धाराशिवमधील राजकीय घराण्यातच झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या...

एकनाथ शिंदेंनी उपसले उपद्रवमूल्याचे अस्त्र!

राजकारणात तुम्हाला वारंवार तुमची उपयुक्तता सिद्ध करावी लागते. ज्यावेळी तुमची उपयुक्तता संपते त्यावेळी तुम्हाला संपवण्यासाठी तुमचे विरोधक आणि मित्र म्हणून वागवणारे तुम्हाला संपवतात. उपयुक्तता संपली की उपद्रवमूल्य, हे हत्यार बाहेर काढावे लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गत अशीच झाली...

कोस्टल रोड कोणासाठी, हे ठरवणारे मुंबईतले मतदान सुरू!

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान आज होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या निवडणुकांचा निकाल हाती येईल. मुंबई ताब्यात घेण्यासाठी निकराची लढाई सुरू असून उद्धवसेना विरुद्ध महायुती...
Skip to content