महाराष्ट्र शासन आता लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कँनल) जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया
महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयीसुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.