मुंबईतील अभिनव कला क्रीडा अकॅडमी, अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव, एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्पर्धा आयोजक, क्रीडा संघटक, समाजसेवक अंकुश रामचंद्र मोरे यांच्या एकसष्टीनिमित्त तिसऱ्या जिल्हास्तरीय ‘महामुंबई कबड्डी लीग’ (एमएमकेएल) या स्पर्धेचे आयोजन येत्या २६ एप्रिल ते ३ मे २०२५ या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेत उपनगरातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. या दर्जेदार स्पर्धेला अर्थातच मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची मान्यता आहे. सध्या कबड्डी या खेळाला एका आगळे वेगळे वलय प्राप्त झाले आहे. अस्सल देशी आणि मराठी मातीतील या खेळाला, तो व्यावसायिक स्तरावर खेळला जाऊ लागल्याने प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आहे. याला अर्थात प्रो-कबड्डी कारणीभूत आहे. हे लक्षात घेता हा खेळ आजच्या युवा पिढीला साद घालत आहे, हे आपण अनुभवत आहोत. या स्पर्धेमध्ये सीनियर गट (मुले-मुली) व सब-ज्युनियर गट (मुले-मुली) अशा एकूण ४२ संघांचा समावेश असणार आहे. ‘स्पोर्टबूट’ चॅनलमार्फत स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांनी दिली. आधिक माहितीसाठी ९८१९९०४२०९ यावर संर्पक साधावा.
असा असेल महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३चा कार्यक्रम
- महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३ व सुपर सीनियर (सब-ज्युनियर-सीनियर महिला/पुरुष) राज्यस्तरीय कबड्डी लीग (४० ते ५० वयोगट आणि ५०च्या पुढे वयोगट) (महिला व पुरुष) स्पर्धा २०२५
- कालावधी: २६ एप्रिल ते ३ मे २०२५
- वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत
- स्थळ: मीनाताई ठाकरे स्मृती क्रीडांगण (महानगर पालिका मैदान) न्यू म्हाडा कॉलनी, दिंडोशी, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५.