Friday, July 12, 2024
Homeपब्लिक फिगररायगडप्रमाणेच होणार शिवनेरीचाही...

रायगडप्रमाणेच होणार शिवनेरीचाही विकास!

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध 20 पर्यटनस्थळे विकसित होत आहेत. त्यात किल्ले रायगडप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप-वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाचे पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्त्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. त्यांनी अठरापगड जातीचे, धर्मांचे लोक एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण घेतला तर शिवजयंती साजरी करताना त्यांना खरे अभिवादन ठरेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधान यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डुचकेवाडी, खेतेपठारमार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे 15 कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन

इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक  – देवेंद्र फडणवीस

राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सुलभ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. ही प्रक्रिया सुलभ झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले जागतिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी 83 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!