Wednesday, March 12, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजबुमराह की जय...

बुमराह की जय हो!

भारताचा अनुभवी, वेगवान गोलंदाज ३१ वर्षीय जसप्रित बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करुन त्याच्या अतुलनीय कामगिरीची योग्य दखल घेत त्याचा उचित गौरव केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. ५ जानेवारी २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीने सर्व क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु मैदानात सातत्याने अप्रतिम मारा करुन त्याने क्रिकेटविश्वातील तमाम फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याची गोलंदाजी खेळणे हे आजच्या क्रिकेटविश्वातील फलंदाजांसमोर मोठे आव्हान म्हणून उभे राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत तो कुठला चेंडू टाकणार याचा अंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजाला येतच नाही. मग बुमराहने लावलेल्या अलगद जाळ्यात प्रतिस्पर्धी फलंदाज आपसूक सापडले जातात. भारतीय वेगवान गोलंदाजीचा तो आता प्रमुख आधारस्तंभ झालेला आहे. गेली ७ वर्षे आपल्या जादुई, तुफानी गोलंदाजीने तो भारतीय संघाची खूप मोठी सेवा करत आहे.

गतवर्षी भारतात कसोटी मालिकेत न्युझीलंडकडून यजमान भारताला पहिल्यांदाज “व्हाइट वॉश” मिळाला होता. तर त्यानंतर झालेल्या महत्त्वपूर्ण ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेत भारतीय संघ ३-१ असा पराभूत झाला होता. असे असतानादेखील तो या दोन्ही मालिकेत एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला. वास्तविक गतवर्षी कसोटी सामन्यात फलंदाजांचे जास्त वर्चस्व राहिले. तरीदेखील बुमराहने प्रभावी मारा करून क्रिकेट जगताचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे त्याची गणना सद्याच्या घडीला आधुनिक क्रिकेट जगतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून होत आहे. त्याचीच दखल आयसीसीने घेतली असावी. बुमराहने गोलंदाजीत कमालीचे सातत्य दाखविले. अनेक विक्रमदेखील त्याने साजरे केले. कसोटी क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराच्या शर्यतीत ट्रॅव्हिस हेड, जो रूट, हॅरी ब्रुक यांना सहज मागे टाकून बुमराहने हा मानाचा पुरस्कार पटकवला. हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. या अगोदर भारताच्या राहूल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन, विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सलग दोन वेळा हा पुरस्कार मिळवणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने सलग २०१७-१८चा हा पुरस्कार मिळवला आहे.

हा पुरस्कार मिळवणारा बुमराह पहिला भारताचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. ५ जानेवारी २०१८मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्याची गोलंदाजी करण्याची विचित्र शैली बघून तो फार काळ खेळू शकणार नाही असेच सर्वांना वाटत होते. या शैलीमुळे त्याच्या खांद्याला आणि पाठीला दुखापतीचा त्रास जाणवेल असेही वैद्यकीय सल्लागार सांगत होते. परंतु या साऱ्यावर मात करत आपल्या भेदक गोलंदाजीचा हिसका त्याने क्रिकेटविश्वाला दाखवला. वेगवान गोलंदाजाकडे लागणारी सर्व आयुधे बुमराहच्या भात्यात आहेत. त्याचा खुबीने वापर करण्यात तो पटाईत आहे. जुन्या आणि नव्या चेंडूवर उत्कृष्ट मारा करण्यात त्याची खासियत आहे. त्याचे यॉर्करचे चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजाची दांडी गुल करतात तर इनस्वींग चेंडू डावखुऱ्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणतात. अचूक दिशा आणि टप्प्यावर सुरेख मारा करण्यात बुमराहची स्वारी पटाईत आहे. चेंडू स्विंग आणि सिम करण्यातदेखील तो वाकबगार आहे. २०२३मध्ये पाठदुखीने त्याला हैराण केले. मार्च महिन्यात त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो वर्षभर मैदानापासून दूरच होता. २०२४मध्ये त्याने जोरदार कमबॅक केले. आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी त्याने २०२४मध्ये केली. १३ कसोटीत तब्बल ७१ बळी घेतले. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याने सर्वाधिक ९०८ गुणांची कमाई केली. अमेरिकेत झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला पन्हा एकदा जेतेपद मिळवून देण्यात बुमराहची भूमिका मोठी होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले होते. त्यालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानदेखील मिळाला होता.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याने ३२ बळी घेऊन भारतातर्फे नवा विक्रम साजरा केला. ऑस्ट्रेलियन आजी-माजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षक विदेशी खेळाडूंचे फारसे कौतुक करत नाहीत. परंतु बुमराह मात्र या दौऱ्यात अपवाद ठरला. ऑस्ट्रेलियात आलेला तो सर्वोत्तम विदेशी गोलंदाज असल्याची चर्चा त्यावेळी सुरु झाली. शेवटच्या कसोटीत शेवटच्या दिवशी पाठदुखीमुळे बुमराह गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला. तो नसल्यामुळे हा शेवटचा सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. देश-विदेशातील सर्वच खेळपट्ट्यांवर बुमराहने आपल्या जादुई गोलंदाजीची छाप पाडली आहे. आजकाल वेगवान गोलंदाज टी-२०, वनडे सामन्यावर जास्त भर देतात. पारंपरिक ५ दिवसांच्या कसोटी सामन्यांना मात्र ते बगल देतात. परंतु बुमराह मात्र त्याला अपवाद आहे. तो तीनही प्रकारच्या सामन्यांना शंभर टक्के महत्त्व देतो. मग चेंडू लाल असो किंवा पांढरा. सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला बुमराह चांगला कर्णधार म्हणूनदेखील प्रकाशात येऊ शकतो. हे ऑस्ट्रेलियन दौऱ्यात बघायला मिळाले होते.

६ डिसेंबर ९३मध्ये अहमदाबाद, गुजरात येथे त्याचा जन्म झाला. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वसिम अक्रम, वकार युनुस यांची तुफानी गोलंदाजी बघून तो क्रिकेटच्या प्रेमात पडला. मग त्यांच्यासारखीच कामगिरी करण्याचा चंग त्याने मनाशी बांधला. तो ५ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. मग आई आणि बहिणीनेच त्याला वाढविले. निर्माण हायस्कुलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. त्याच शाळेत त्याची आई उपमुख्याध्यापिका होती. शाळेच्या संघातून त्याने क्रिकेटचा श्रीगणेशा केला. २०१०मध्ये १९ वर्षांखालील गुजरात संघाच्या निवड चाचणीसाठी तो दाखल झाला. त्याच्या गोलंदाजीच्या विचित्र शैलीमुळे त्याला मुख्य संघात निवडण्यात आले नव्हते. राखीव खेळाडूंत मात्र त्याची निवड केली गेली होती. पहिले तीन सामने झाल्यानंतर चौथ्या सामन्यात अखेर बुमराहला संधी देण्यात आली. या संधीचे त्याने सोने केले. आपल्या पहिल्याच सामन्यात ७ बळी घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१२-१३च्या मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत त्याने गुजराततर्फे पदार्पण केले. त्याने आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली. पंजाबविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १४ धावात ३ बळी घेऊन गुजरातचा विजय पक्का केला. त्यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला.

१८ मार्च २०१३ रोजी गुजरात मुंबई सामन्याच्या वेळी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक जॉन राइट यांनी बुमराहची कामगिरी बघून आयपीएलसाठी मुंबई संघासाठी त्याला करारबद्ध केले. तेव्हापासून आजतागायत तो आयपीएलमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. २०१३मध्ये विदर्भविरुद्ध त्याने रणजी सामन्यात पदार्पण केले. २०१५-१६च्या मोसमात विजय हजारे स्पर्धेत पहिल्या दोन लढतींनंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत पंचांनी आक्षेप घेतला. त्यांनी त्याबाबत गुजरात संघाकडे तक्रारदेखील केली. परंतु गुजरात संघाने त्याविरुद्ध बुमराहच्या पाठीशी उभे राहून त्याची गोलंदाजीची शैली वैध आहे हे सिद्ध केले. मग अंतिम सामन्यात दिल्लीविरुद्ध त्याने ५ बळी घेऊन हजारे करंडक आपल्या संघाला मिळवून दिला. एवढे यश संपादन करुनदेखील बुमराहचे पाय जमिनीवरच आहेत. मैदानातदेखील तो कधी चिडलेला अथवा रागावलेला दिसत नाही. मैदानावर नेहमीच मजा-मस्ती त्याची चालू असते. शांत राहून फलंदाजांच्या चुका तो नेहमीच हेरत असतो. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने तर काही वर्षापूर्वी गमतीत बुमराहला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहिर करा असे म्हटले होते. त्यात खरोखरच तथ्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आजच्या युवा गोलंदाजांनी बुमराहचा आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही. येणाऱ्या भावी काळात आणखी पुरस्कारांची मोठी भर बुमराहच्या झोळीत पडेल अशी आशा करुया.

Continue reading

मल्लखांब गर्ल: निधी राणे

गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध मल्लखांब स्पर्धांत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा चमकदार ठसा मुंबई उपनगरची राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणेने उमटवला आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन नुकताच तिला २०२३-२०२४चा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि क्रीडा व युवक सेवा...

‘गाईल्स ढाल’ शालेय क्रिकेट स्पर्धेत डॉ. आंबेडकर विद्यालयाची कमाल

मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स ढाल स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने प्रथमच जेतेपदाला गवसणी घालून स्पर्धेत काहीशी खळबळ माजवली. कारण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आंबेडकर विद्यालय जेतेपदाच्या शर्यतीत नव्हते. यापूर्वी आंबेडकर...

कोण होणार “चॅम्पियन”?

तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या "चॅम्पियन्स" चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार "चॅम्पियन" याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. क्रिकेट जगतात मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे शेवटचे आयोजन २०१७मध्ये इंग्लंड-वेल्स...
Skip to content