उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी मिळविण्यात अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतही आपल्या मुंबईतल्या परंपरागत सांताक्रूझ कलिना मतदारसंघातून भाग्य अजमविण्याची शक्यता आहे.
याकरीता कृपाशंकर सिंह यांनी तयारीही चालविली आहे. शनिवारी त्यांच्या तसेच काका बाप्टिस्ट उद्यानातल्या मॉर्निंग वॉकर्स यांच्या हस्ते काका बाप्टिस्ट उद्यान कालिना सांताक्रूझ पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उद्यानामध्ये १०० विविध देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांनी जौनपूरमधून भाजपाकडून निवडणूक लढवली होती.
रवींद्र वायकरांच्याही हस्ते झाले वृक्षारोपण
शनिवारीच लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजेच अवघ्या ४८ मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनीही वृक्षारोपण केले. मुंबईतल्या त्यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या जोगेश्वरी पूर्व येथील शहीद अशोक कामटे मनोरंजन मैदानात मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या मदतीने ५०० झाडे लावण्यात आली.