कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली इमारतीत ही खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 7,418 चौरस फूट आहे. या व्यवहारासाठी 12 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि त्यासोबत अंदाजे साडेतीन लाख रुपये नोंदणीशुल्क भरले गेले आहे, असे समजते.
उदय कोटक यांनी सप्टेंबर 2023पर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. आजही त्यांचा बँकेत सुमारे 25% हिस्सा आहे. वरळी सी
फेसवरील या इमारतीत कोटक कुटुंबाने एकत्रित 12 अपार्टमेंट फ्लॅटस् खरेदी केले आहेत, ज्याची किंमत प्रति चौरस फूट 2.71 लाख रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक व्यवहार अधिकृतपणे 30 जानेवारी रोजी नोंदणीकृत झाले तर 5 फेब्रुवारी रोजी एक अतिरिक्त व्यवहार नोंदवण्यात आला.
कोटक यांनी शिव सागर इमारतीत खरेदी केलेले हे अपार्टमेंट फ्लॅट्स तळमजला, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत. या फ्लॅट्समधून अरबी समुद्र आणि मुंबई कोस्टल रोडचे दृश्य दिसते. अनेक प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती या परिसरात राहतात. कोटक यांनी खरेदी केलेल्या या 12 फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 173 ते 1,396 चौरस फूट आहे. ही जागा एकूण 7,418 चौरस फूट आहे. 2018मध्ये, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने आता बंद पडलेल्या वाइन कंपनी इंडेज विंटनर्सचे कार्यकारी संचालक रणजित चौगुले यांच्याकडून वरळी सी फेस येथे एक प्रशस्त बंगला 385 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 12 नवीन फ्लॅट्स या बंगल्याशेजारील इमारतीत आहेत.