चेन्नई येथे राधाकृष्ण मेयर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या १४व्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय हॉकी संघाने जोरदार कमबॅक करताना तब्बल ९ वर्षांनंतर आपला पदकाचा दुष्काळ संपवला. कांस्यपदकाच्या लढतीत माजी विजेत्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघ २-० गोलांनी पिछाडीवर पडला होता. त्यामुळे भारत आता सामना गमावणार असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु शेवटच्या ११ मिनिटांत भारतीय संघाने आपला खेळ कमालीचा उंचावत, दबाव झुगारुन देत झटपट ४ गोल करुन अर्जेटिनावर बाजी उलटवण्यात यश मिळवले. त्यामुळे स्टेडियममध्ये गर्दी करणाऱ्या हजारो हॉकीचाहत्यांना एका ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. सामन्यातील ४५व्या मिनिटाला अंकित पालने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन भारताचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या ७ मिनटांनी मनमित सिंहने पेनल्टी कॉर्नरवर चपळाई दाखवत अनमोलच्या स्टिकला लागून आलेला चेंडू झटपट गोलक्षेत्रात ढकलून भारताला बरोबरी साधून दिली. आणखी ५ मिनिटांनी शारदानंद तिवारीने मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचा अचूक फायदा घेत भारताला आघाडी मिळवून दिली. सामना संपायला दोन मिनिटे बाकी असताना अनमोल इक्काने पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल करुन भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्याने गेल्या दशकात ऑस्ट्रेलियात झालेल्या प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील बलाढ्य जर्मनीविरुध्द भारत या सामन्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. तेव्हादेखील भारत सामना संपायला थोडा वेळ बाकी असताना बराच पिछाडीवर होता. परंतु धनराज पिल्ले आणि महमद शहिद या दोघांनी काही शानदार मैदानी गोल केल्यामुळे भारताने ती थरारक लढत जिंकली होती. २००१ आणि २०१६मध्ये भारताने या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. पण त्यानंतर भारताची गेली ९ वर्षे या स्पर्धेतील पदकाची पाटी कोरीच होती. गेल्या दोन सलग दोन स्पर्धांत कांस्यपदकाच्या लढतीत भारत अनुक्रमे फ्रान्स आणि स्पेन या संघाकडून पराभूत झाला होता. यंदा मात्र ती पराभवाची मालिका तोडण्यात रोहितचा भारतीय संघ अखेर यशस्वी झाला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच कांस्यपदक होते. त्यामुळे त्या पदकाचे मोल जास्त आहे. कारण याअगोदर भारताने दोनवेळा जेतेपद पटकावले होते. त्यानंतर बरीच वर्षे पदक भारताला हुलकावणी देत होते. या शानदार विजयाबाबत भारतीय हॉकी संघ नक्कीच कौतुकास पात्र आहे. भारताने हा विजय संपादन करताना आपला लढाऊ बाणा दाखवून दिला. त्याअगोदर उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला गतविजेत्या बलाढ्य जर्मनी संघाकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तो पराभव विसरुन भारतीय संघाने अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत केलेल्या जबरदस्त खेळाला तोड नव्हती. भारताचा अर्जेंटिनाविरुद्धचा हा विजय जणूकाही स्वप्नवत वाटणाऱ्या विजयासारखाच होता.

उपांत्यपूर्व फेरीच्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीतदेखील भारताने असाच सुरेख खेळ करुन त्यांना नमवून आपले उपांत्य फेरीचे तिकिट पक्के केले होते. या सामन्यातदेखील पिछाडीवर पडूनदेखील भारतीय संघाने २-२ गोलांची बरोबरी साधून लढत पेनल्टी शूटआऊटमध्ये नेली. सामना संपायला थोडा वेळ बाकी असताना भारताने बरोबरी साधली. मग भारतीय गोलरक्षक प्रिंसदिप सिंहने दोन गोल वाचवून भारताला थरारक विजय मिळवून दिला. नियमित वेळेत कर्णधार रोहित आणि शारदानंद तिवारीने गोल करुन भारतीय संघाला तारले होते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय संघाचा फारसा कस लागला नाही. दुबळ्या चिली, ओमान, स्वित्झर्लंड या संघाना भारताने सहज नमवले. पहिल्या टप्प्यात गोलांचा धडाका लावत भारताने तब्बल २९ गोलांची नोंद केली. भारताची खरी परीक्षा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यापासून सुरु झाली. भारतीय संघाने या कांस्यपदकाची आगळी भेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या पी. जे. श्रीजेश यांना दिली. गतवर्षी ऑलिंपिक स्पर्धेत सलग दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताचे हॉकी संघाचे माजी कप्तान आणि जागतिक हॉकीत एक अव्वल गोलरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीजेश यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम दिला. मग भारतीय हॉकी महासंघाने त्यांच्याकडे ज्युनियर भारतीय हॉकी संघाची जबाबदारी दिली. या संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. भारतीय हॉकी महासंघाने त्यांच्यावर टाकलेल्या मोठ्या जबाबदारीला श्रीजेश यांनी योग्य न्याय देत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्यांना कधी विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदक प्राप्त करण्याचा मान मिळाला नाही. पण निदान या कांस्यपदकामुळे तेदेखील नक्कीच सुखावले असतील. एकदंर भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल असल्याची गाव्ही या ज्युनिअर हॉकीपटूंनी दिली आहे. फक्त या स्पर्धेत झालेल्या चुंकापासून भारतीय संघ बोध घेईल एवढी अपेक्षा करुया.
गतविजेत्या जर्मनी संघाने यंदादेखील आपला दबदबा कायम राखताना जेतेपद राखण्यात यश मिळवले. १९७९पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. तेव्हापासून जर्मनी संघाने या स्पर्धेवर आपली हुकूमत निर्माण केली आहे. हे त्यांचे विक्रमी आठवे जेतेपद होते. दोन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांच्यासारखी सात्यतपूर्ण कामगिरी इतर कुठल्याच संघाला करता आला नाही. यंदाची स्पर्धा जिंकताना त्यांना पहिल्याद्यांच या स्पर्धेची फायनल गाठणाऱ्या स्पेनने जोरदार लढत दिली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने ३-२ गोलांनी स्पेनचा पराभव केला. संपूर्ण लढतीत १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावला गेला. त्यात जर्मनीची सरशी झाली. जर्मनीच्या या विजयाचा शिल्पकार होता गोलरक्षक जेस्पर डिटेझर. त्याने तब्बल ५ पेनल्टी कॉर्नर वाचवले. चिनी भिंतीप्रमाणे त्याने भक्कम बचाव करुन स्पेनचे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले. त्यामुळे पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले.

याअगोदर दोन वेळा स्पेनने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंतची त्यांची ही सर्वोतम कामगिरी होती. उपांत्य फेरीत भारताला आरामात पराभूत करणाऱ्या जर्मनी संघाला उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनेदेखील चांगली झुंज दिली. हा सामनादेखील पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मन संघाने जिंकता. पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला गोलरक्षक जेस्पर धावून आला. त्याच्या भक्कम गोलरक्षणामुळेच जर्मनीने निसटता विजय मिळवून आपला उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. धारदार आक्रमण आणि जोरदार बचाव याची उत्तम सांगड घालून जर्मनी संघ प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यात वाकबगार आहे. याचीच प्रचिती स्पर्धेत आली. “वन टच” युरोपियन शैलीने खेळणाऱ्या जर्मनी संघाला नमवणे हे त्यांच्याविरुद्धच्या संघांना नेहमीच आव्हान असते. हे चित्र आजदेखील बघायला मिळते. तेथील क्लब हॉकी संस्कृतीचा भक्कम पाया त्यांच्या यशाचे मोठे गमक आहे. आज हॉकी विश्वातील सर्वोत्तम व्यवसायिक हाॅकी लिग जर्मन लिग म्हणून ओळखली जाते. १६ वर्षानंतर तेथील खेळाडूंना प्रशिक्षक पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यांच्या खेळण्याचा शैलीत फार बदल करत नाहीत. खेळाडू, मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफ यांचे एक घट्ट नाते तयार झालेले असते. खास करुन ज्युनिअर खेळांडूवर जर्मन हाॅकी महासंघ जास्त भर देतो. त्यामुळे त्यांची दुसरी फळी चांगली तयार होते. आताच्या ज्युनिअर संघातील अर्धे खेळाडू पुढील वर्षी त्यांचा सिनीयर संघात खेळताना दिसले तर नवल वाटायला नको.

