परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता.
विधानसभेत या विषयावर गेले दोन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीने झालेला नाही, हे स्पष्ट केले. स्वतः सूर्यवंशी यांनी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थर्ड डिग्री किंवा तत्सम कोणत्याही प्रकारे बळाचा वापर केलेला नाही, हे सांगितले असून तसे व्हिडियो शूटिंगही उपलब्ध आहे. सूर्यवंशी यांचे स्वतःचे निवेदनही तसेच आहे. सूर्यवंशी यांना श्वसनाचा विकार होता. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी पोटात जळजळ झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू ओढवला, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केसे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.