सोशल मीडियावर गेलो रे गेलो की, आदित्य धर दिग्दर्शित “धुरंदर”मधील अक्षय खन्नावरचे Fa 9 la गाण्यावर सामान्य माणसापासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांचे नाच नाच रिल दिसतेय. खरंतर Fa 9 la हा काय शब्द आहे हेच समजत नाही. तो म्हणे अरेबिक भाषेतील शब्द आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला जगभरातील कोणत्याही भाषेबद्दल फार आक्षेप दिसत नाही आणि ट्यून आवडली की कोणीही कुठेही कसेही नाचू शकतो. आपण नाचायचं आणि आपल्या नृत्याचे काही सेकंदाचे रिल पटकन पोस्ट करण्याचे आजचं युग आहे. याला मोह म्हणा अथवा क्रेझ. आजचं सगळेच जगणं सोशल मीडियाभोवती आहे. ‘यखी दूस दू इंदी फसला… यखी तफ्फवूज़ तफ्फवूज़ वल्लाह ख़ोश रक़्सा’ हे “धुरंदर”चे अरेबिक गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे आणि त्यावरच्या अक्षय खन्नाच्या स्टेप्सही अनेकांना आवडल्या. अख्खं पिक्चर त्याने आपलसं केलं आहे.
आता तुम्हालाही माहित्येय, संगीत व नृत्य यांना कसलीही सीमा नसतेच. पण तरीही तुम्हाला ‘जमालू जमालू’चा अर्थ माहित्येय? दोनच वर्षांपूर्वी आजच्या ग्लोबल युगातील युवा पिढीला ‘ॲनिमल’चे हे विचित्र मुखडा नि अंतरा असलेले गाणे भारी आवडलं आणि आता “धुरंदर”चे अरेबिक बोल वेड लावणारे ठरलेत. मल्टीप्लेक्सच्या भव्यदिव्य दिमाखदार पडद्यावर हे नृत्य येताच पब्लिक थिएटर डोक्यावर घेऊन अक्षय खन्नाला उत्स्फूर्त दाद देते. लग्नात, वाढदिवसाच्या पार्टीत आणि कुठे कुठे या गाण्यावर गच्ची/क्लब/पबमध्ये नाचो.. चा आनंद घेतला जातोय. हिस्टेरिया झाल्यागत हे गाणे हिट झालंय. आता जगभरातील अनेक भाषेतील असे मुखडे आणि नृत्य स्टेप्स आपल्या चित्रपटात आले तर आश्चर्य नको. यशाला फाॅलो करणं हे स्वाभाविक आहे. फक्त ते पिक्चरमध्ये फिट्ट बसू देत. बरं रसिकांनी एकदा का एकाद्या गाण्याला पसंती दिली रे दिली की, त्या वाढत्या लोकप्रियतेला हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर ‘दुनिया की कोई भी ताकद रोक नहीं सकती’. ‘जमालू जमालू’… कोणी म्हणतात ‘जमालो जमालो’…. कोणी काहीही म्हटलं तरी गाणे भारी हिट ठरले. “धुरंदर”च गाणं फक्त ऐकण्यावर राहिलंय.
निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनीही यावर मजेशीर रिल करून धमाल उडविलीय. अनेकांच्या मोबाईलचा रिंगटोन, काॅलरट्यून हे गाणे आहे. म्हटले ना, चालणारी गोष्ट अनेक वाटा काढत फिरते. आता गाणं म्हणून त्यात नेमके काय आहे याचं उत्तर नाही. अनेकांनी गुगलवर जाऊन या गाण्याच्या जन्माचा शोध घेतला. हा गुण नक्कीच चांगला. गाण्याचे शब्द समजले नाहीत तरी चालेल पण मूळ समजले पाहिजे. आपल्याकडचा मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणजे एकप्रकारचे सेलिब्रेशन/सोहळा/ मनसोक्त/ मनमुराद आनंदच असतो जणू… कधी कथेचा आशय कायम ठेवून तर कधी पटकथेत चक्क मोकळीक घेऊन एकाद्या गाण्याचा काही तरी अजब/गजब मुखडा असा ठेवतात की त्याचा अर्थ शोधला तरच सापडतो, अन्यथा त्यासह ते गाणे चक्क लोकप्रिय ठरते. संगीत ताल धरणारे असावे इतकेच. मग भाषा कदाचित काहीही चालेल.

‘केरिदा केरिदो ‘ म्हणजे नेमके काय? हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? त्याचा अर्थ काय? वगैरे वगैरे. पण ‘गर्लफ्रेन्ड’ या मराठी चित्रपटात याच मुखड्यावरुन युथफूल/जोशफुल गाणे दिसले. इतकेच नव्हे तर गाण्यात अधूनमधून असे काही विचित्र शब्द वापरत गाणे कॅची केलेय, त्याला एक गती आणली. मज्जा येते हो… बस्स. इतकाच गाण्याला जन्म देण्यामागे सिनेमावाल्यांचा आणि मग हे गाणे टाईमपास म्हणून ऐकणारांचा हेतू आहे. पडद्यावर हे गाणे अमेय वाघ आणि सई ताह्मणकर या जोडीने साकारलं. हा खरं तर स्पॅनिश शब्द. (ग्लोबल युगाचा परिणाम) केरिदा म्हणजे प्रिये आणि केरीदो म्हणजे प्रिय असा त्याचा अर्थ होतो. आजच्या डिजिटल पिढीला अशा अनेक प्रादेशिक आणि विदेशी शब्दांची कल्पना आहे. आजच्या ग्लोबल युगातील शहरी जीवनात अनेक भाषांतील असे अनेक शब्द एकमेकांत मिसळून जात एक नवीन काॅम्बिनेशन जन्माला येण्याचे प्रमाण वाढतयं. दुकानांच्या नावापासून गाण्याच्या मुखड्यापर्यंत हाच फ्लो आहे. आजच्या युवा पिढीला असे काही ‘मिक्स कल्चर’ भारी आवडते. यु ट्यूबपासून क्लब/पबपर्यंत अशा रॅपचिक गाण्यांना लाईक्स मिळतात. नवंनवं ते हवंहवं अशी ही मानसिकता.
साठच्या दशकापासूनच हळूहळू हे ‘अजब मुखडा गाणं’ प्रकार सुरु आहे. प्रत्येक काळात असे गाण्याचे मुखडे जन्माला आले, कधी ते पाश्चिमात्य कल्चरच्या प्रभावातून आले, तर कधी एखाद्या प्रसंगातून आले. ‘आशा’ या चित्रपटातील किशोरकुमारने गायकीचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतलेल्या ‘इना मिना डिका’ या गाण्यातील रॅम्प हे याॅडलिंग त्याचेच वैशिष्ट्य. तेव्हा परंपरावाद्यांना भारीच धक्का बसला. हे होतच असते. देव आनंदने ‘हरे राम हरे कृष्ण’ ( १९७२)मध्ये हिप्पी संस्कृती दाखवताना ‘दम मारो दम’चा जणू नारा दिला. तोही सांस्कृतिक धक्काच. याच टप्प्यावर हिंदी चित्रपट आणि त्याचे संगीत कूस बदलत होते. पाश्चात्य संस्कृतीचा एकूणच प्रभाव वाढत गेला. या सगळ्यात गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन, गायिका आशा भोसले आणि नायिका झीनत अमान या काॅम्बिनेशनचे ‘दम मारो दम’ प्रचंड वादग्रस्त व लोकप्रिय ठरले. याचे कारण म्हणजे त्यात नाविन्य होते. आजही हे गाणे ताजे, टवटवीत, तरुण वाटते. ‘दम मारो दम’ हा मुखडा खूप सहज गुणगुणला जातोय. त्या काळात मात्र त्याचेही कुतूहल होते. अशातच ‘मुत्तुकोडी कवाडी हडा’ (दो फूल) गाण्याने जबरदस्त लोकप्रियता मिळवली. मेहमूदच्या ‘डबल रोल’पैकी एक साऊथ इंडियन व्यक्तिरेखा असल्याने समुद्रकिनारच्या नारळाच्या झाडांच्या सहवासात हे गाणे मस्त खुलले. अगदी थेट साऊथ तडका असला तरी हिंदी चित्रपटाच्या गाण्यात त्याचा सही वापर हा जमून आलेला फंडा होता. सिनेमाच्या मसालेदार प्रकृतीशी ते सगळे जुळून आले. शम्मी कपूर दिग्दर्शित ‘मनोरंजन’ (१९७४)साठी पुन्हा एकदा आनंद बक्षी/आर. डी. बर्मन/आशा भोसले/किशोरकुमार/संजीवकुमार/ झीनत अमान यांनी ‘गोयाके चुनांचे’ असे अनोळखी मुखड्याचे मादक गाणे देऊन धमाल उडवली. कुतूहल निर्माण केले. बराच काळ तरी ‘गोयाके चुनांचे’ म्हणजे नेमके काय हे खरंच माहित नव्हते आणि मग हा कोंकणी शब्द आहे असे मानतच हे गाणे लोकप्रिय राहिले. यशाची हीच तर गंमत असते.

यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल ‘ (१९७७)मधील सचिन पिळगावकर आणि पूनम धिल्लान यांच्यावरचे गाबुजी गाबुजी गम… हेही गाणे असेच विचित्र शब्दाने लक्षवेधक आणि त्याच गुणांवर ते लोकप्रिय. हीच अशा गाण्यांची खासियत. ती हिट होतात. असे ‘भलतेच शब्द’ सुचतात कसे हा तसा मोठा प्रश्नच आहे म्हणा. गाणे हिट झाल्यावर ते प्रश्नही बाजूला पडतात. अशा चमत्कारीक मुखड्यात कधी ‘ओये ओये’ (त्रिदेव) अशी अतिशय उत्फूर्त आरोळी होती, कधी ‘हरी ओम हरी’ (अरमान) डिस्को डान्स गीताचा झटका होता, ‘चोली के पीछे क्या है’ ( खलनायक)चा श्लील की अश्लील अशा वादाचा जबरा तडका होता. कधी ‘क्या बोलती तू… आती क्या खंडाला’ (गुलाम) अशी प्रेमाची हाक/साथ होती. सुरुवातीस हेही गाणे थोडं विचित्र वाटलं. हिट झाल्यावर पिक्चरमध्ये ते कधी येतेय असं झालं. ‘ढिंग चिका’ (रेडी), ‘उ ला ला’ (डर्टी पिक्चर) हे दक्षिणेकडून आलेले मुखडे आहेत. कधी ते रिमेकसह येतात तर कधी दक्षिणेकडील थीमनुसार येतात. कलेच्या क्षेत्रात असं इधरउधर होतच असते. मिलावट होती रहती है.
अशी ‘आयात’ स्वाभाविक मानली जाते. त्याला कोणी कोणी उचलेगिरी म्हणतात ते ऐकतोय कोण? सुभाष घई निर्मित आणि दिग्दर्शित ‘सौदागर” चे ‘इलू इलू’ अशाच वेगळ्या शब्दाने सुपरहिट झाले. इलू का मतलब आय लव्ह यू.. असे गीतकार आनंद बक्षींनी लिहिले आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिले. पण आय लव्ह यूचा शाॅर्ट फाॅर्म इलू न होता आयलू असे व्हायला हवे. पण तसे न करता इलू केल्यानेच गंमत आली आणि गाणे भारी हिट झाले. विवेक मुशरन आणि मनिषा कोईराला या प्रेमी युगुलावरचे हे गाणे मग इतरही व्यक्तिरेखा म्हणजे दिलीपकुमार, राजकुमार वगैरे गाऊ लागतात. मसालेदार मनोरंजक चित्रपटाला सगळे नियम जणू माफ असतात. त्यांचे उद्दिष्ट एकच पब्लिकला “पैसा वसूल” मनोरंजन देणे. यात शब्दांची मोडतोड/जोडतोड चालते. ‘धुरऺधर’पर्यंत काळ बराच वेगाने पुढे सरकलाय. आता गाण्याचे रिक्रेएट अथवा रिमिक्स अवतार फारच रुजलाय. तसेच आता इतर भाषेतील शब्दही इधरउधर होण्याची संस्कृती रुजत चाललीय. म्हटलं ना, कोणत्या गाण्याचा मुखडा कधी भारी आवडला जाईल हे सांगता येत नाही म्हणून… फक्त मनोरंजन व्हायला हवे. ते तर अशा विचित्र मुखडा आणि चालीने होतच असते. जुन्या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत, ऐकावीशी, पाहावीशी, गुणगुणत राहवी अशी असली तरी काळ बराच पुढे सरकला आहे हेही खरेच!

