आपल्याला शरीराच्या घड्याळानुसार झोप लागते किंवा आपण जागे असतो असे विज्ञान मानते. शरीरात असे एकच घड्याळ नसून अशी अब्जावधीहूनही अधिक घड्याळे आपल्या शरीरात असतात. त्यापैकी मध्यवर्ती घड्याळ मेंदूत असते आणि बाकीची आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत एक याप्रमाणे असतात. ही सगळी घड्याळे सूर्याच्या अथवा कृत्रिम प्रकाशासोबत काम करतात आणि त्यातून आपले आरोग्य सांभाळले जाते.
प्रकाशाला सामोरे जाणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यातील किती वेळ आपण या प्रकाशाच्या समोर असतो हेही महत्त्वाचे असते. यामधूनच रोज सकाळी केवळ झोपेतून उठण्याचाच नव्हे तर सकाळच्या प्रातर्विधीचा संदेशही दिला जात असतो याचे नवल वाटत असतानाच आपण हेही पाहिले पाहिजे की यातच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठीही संदेश असतो. काम असेल तर त्याची बोच आपल्याला सतात जाणवते याचे कारण हे घड्याळ असते. हा प्रकाशचा आपल्या शरीराचे तापमान तसेच रक्तदाब आणि शरीरात होणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांनाही नियंत्रित करीत असतो.
घड्याळ समजले आणि त्याचे कामही समजले. पण आपल्या शरीराला ही माहिती कशी मिळते आणि त्याच्याशी प्रकाशाचा कोणता संबंध असतो हेही समजून घ्यायला हवे. शरीराच्या घड्याळाचे मुख्य काम म्हणजे शारीराचे घड्याळ वक्तशीर लावून ठेवणे हे असते. यालाच इंग्रजीत ‘सिर्काडियन क्लॉक’ असे म्हणतात. याचे काम एखाद्या स्वयंचलित लंबकासारखे असते. त्यामुळेच त्याची टिक टिक ऐकू येत नाही. कारण या प्रक्रियेत जनुके आणि प्रथिने हे एकमेकाना नियंत्रित करीत असतात. ही प्रक्रिया हार्मोन्स आणि मज्जातंतूंच्या माध्यमातून अवयवांना संदेश देत असतात. आणि याचा ताल जवळजवळ २४ तासांचा असतो.
मेंदूतील मध्यवर्ती आणि प्रत्येक पेशीतील अशी अगणित घड्याळे एकसाथ काम करून शरीराची दिवसभराची कामे कशी होतील हे बघतात. पण हे घड्याळदेखील अचूक नसते. त्याचा ताल सरासरी २४ तास ३० मिनिटे असा असतो. त्यामुळेच रोज सकाळी मध्यवर्ती घड्याळ पुन्हा जुळवावे लागते. हे घड्याळ सरळपणे आपल्या डोळ्यातील प्रकाश संवेदक पेशींच्या आधारे चालते. आणि दिवस उगवल्याचे सूचित करते. याच्याच सोबत जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा पुन्हा एकदा शारीराचे घड्याळ लावले जाते. पण ते मेंदू वगळून केवळ यकृत, मूत्रपिंड आणि आतडी यांच्यापुरते मर्यादित असते.
जागेपणीचा विचार केल्यानंतर आता झोपेकडे वळू या.. झोपेच्या बाबतीत मेलाटोनिन नावाचे मेंदूचे हार्मोन आपल्या मध्यवर्ती घड्याळाशी जोडलेले असते आणि त्याच्या प्रभावाने आपल्याला दिवसभरात ठाराविक वेळी झोप आली आहे असे वाटते. जेव्हा बाहेर प्रकाश असतो तेव्हा मेलाटोनिनची निर्मिती बंद केली गेली असते आणि आपण जागे असतो. झोपेची वेळ झाली की हे हार्मोन तयार केले जाते आणि ते झिरपते तेव्हा आपल्या झोप येऊ लागते. आपले जनुकेदेखील आपली झोप नियंत्रित करीत असतात. आपण झोपायला जातो तेव्हा जर आजूबाजूला प्रकाश असेल तर झोप लागत नाही आणि त्यामधून विपरीत परिणाम होऊ शकतात. हृदयाचे ठोके कमी होणे, नैराश्य इत्यादी विकार यामधून निर्माण होतात असे मानले जाते.
चुकीच्या वेळी प्रकाशामुळे शरीराचे घड्याळ विचलित होते. रात्रीची पाळी करणाऱ्यांची झोप नैसर्गिक नसते आणि ते त्यांच्या आजाराचे कारण ठरू शकते. शरीराच्या घड्याळाचा विचार करताना पोटाचा विचार करायलाच हवा. यातही ‘सिर्काडियन क्लॉक’ महत्त्वाचे असतेच. कारण आतड्यातील स्नायू अन्न पचल्यानंतर तयार होणारे टाकाऊ पदार्थ खाली सरकवण्यासाठी दिवसच अधिक कामाचे असतात. आपले लक्ष केंद्रित करण्यासाठीही शरीराच्या घड्याळाचा उपयोग होत असतो. आपल्या मेंदूचे काम दिवसाच्या काही वेळी म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत तल्लख असते तर सायंकाळी आणि रात्री ते संथ होते. असे आहे हे शरीराचे घड्याळ..