प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि युवा सेनेचे सरचिटणिस वरूण सरदेसाई यांच्यात झालेल्या संभाषणाची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. यानंतर वाझेचे गॉडफादर कोण हेही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणातला शिवसेनेचा हा नेता कोण?
अटक होण्याआधी सकाळी ११ वाजता हाच वाझे मुंबई उपनगरातल्या शिवसेनेच्या एका नेत्याला भेटला होता. हा नेता कोण? त्याच्याबरोबर वाझेने टेलिग्रामवर केलेले चॅटही एनआयएने तपासावे, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे इतर नेते वाझेची वकिली का करत होते, हेही स्पष्ट होईल, असेही राणे म्हणाले.
सचिन वाझेंच्या वकिलीमागे नेमके कारण कोणते?
राज्यासमोर किंबहुना देशासमोर सध्या हा एकच विषय गाजतोय. एखादा एपीआय जेव्हा इतके मोठे पाऊल उचलतो आणि त्याच्या संरक्षणासाठी किंबहुना त्याला वाचवण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे इतर नेते पुढे येतात. वाझे किती चांगला अधिकारी आहे हे दाखवण्यासाठी, त्याची कशी चूक नाही याची वकिली करण्यासाठी धडपडतात, याला काहीतरी कारणे असणार. मुख्यमंत्र्यांपासून या सर्वांना त्याचीच वकिली का करावी लागते? सर्व काही पणाला का लावावे लागते, हे समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
आयपीएलवेळी बुकींकडून सचिन वाझेंकडून १५० कोटींची खंडणी
मागच्या वर्षी आयपीएल क्रिकेटचा हंगाम झाला. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा झाली. आयपीएल स्पर्धा एका चांगल्या विचाराने चालू झाली. तरूणांना एक चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पण काही जणांनी याचा वेगळ्या कारणांसाठी वापर केला. मागच्या आयपीएल हंगामाआधी यावर अनधिकृतपणे बेटिंग करणाऱ्या मुंबईतल्या बुकींना, ते ज्या हॉटेलमधून चालवतात, ज्या फ्लॅटमधून चालवतात, त्यांना वाझेचा फोन जातो. तुम्ही जे काय करता, कुठून करता याची सगळी माहिती आम्हाला आहे. तुमच्यावर छापे मारू नये, तुम्हाला अटक होऊ नये, तुमची बदनामी होऊ नये असे वाटत असेल तर एकरकमी १५० कोटी रूपये पाठवा. नाही तर मुंबई पोलिसांनी छापे मारून बेटिंगचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले, असे चित्र रंगवले जाईल. तुमची बदनामी होईल, अशी धमकी दिली जाते. मग, सगळ्यांची इकडेतिकडे धावाधाव होते. मग मेन कलाकाराचा वाझेंना फोन जातो. तुम्ही रक्कम मागितली अशा तक्रारी आल्या आहेत बुकींकडून, या रकमेत आमचे किती? असे संभाषण केले जाते, असे राणे म्हणाले.
हा नेमका माणूस कोण?
हा नेमका माणूस कोण? ज्याला या मेहेरबान सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. जो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिसतो. ज्याचे फोन अधिकाऱ्यांना जातात. महापालिकेचे टेंडर निघते तेव्हा त्याच्यात याचे नाव तुम्हाला दिसणार. त्याचे नाव विधिमंडळात मी घेतले होते. या वरूण सरदेसाई याचे सचिन वाझेबरोबर झालेल्या संभाषणाची एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सचिन वाझेचा मास्टरमाईंड कोण?
दोघांमधले हे संभाषण महत्त्वाचे आहे. हा वरूण सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे? कोणाच्या आशिर्वादाने, कोणाच्या सांगण्यावरून याची अशी हिम्मत होते? वाझेचे सीडीआर, व्हॉट्स एप मेसेज तपासून पाहा. एक साधा एपीआय जगातल्या श्रीमंत माणसाच्या घराजवळ असा प्रकार करण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो. इतके डोके हा माणूस लावत नसणार. त्यामुळेच याचा तपास झाला पाहिजे. त्याशिवाय वाझेचा मास्टरमाईंड कोण, गॉडफादर कोण, मायबाप कोण, हे कळणार नाही. हा तपास झाल्यावरच या वाझेला मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते का पाठिशी घालत होते, याची उत्तरे सापडतील, असे ते म्हणाले.
व्हीआरएस घेतलेल्या सचिन वाझेंना पुन्हा का घेतले?
२००७ साली या वाझेने पोलीस दलातून व्हीआरएस घेतली होती. त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले. रिव्ह्यू कमिटीतले सदस्य कोण आहेत? चेअरमन कोण आहेत? ख्वाजा युनूस प्रकरणातले चारच अधिकारी कसे पुन्हा सेवेत घेतले जातात. हेच शक्तीमान आहेत? बाकी कोण मिळाले नाहीत? सध्याचे मुख्य सचिव कुंटे तेव्हा गृह खात्यात होते. कोविडच्या नावाखाली वाझेला घेण्यात आले. हा काय डब्ल्यूएचओचा सदस्य होता, ज्याला कोविड कसा रोखायचा हे माहित होते? मुख्य सचिवांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.
सचिन वाझेंचे टेलिग्रामवरील चॅटही तपासा
या स्पेशल ट्रीटमेंटमागे कोणती लिंक आहे का, याचा तपासही एनआयएने करायला हवा. ज्या दिवशी वाझेला अटक झाली त्यादिवशी सकाळी ११ वाजता वाझे पश्चिम उपनगरातल्या शिवसेनेच्या एका नेत्याला भेटला होता. त्याचे वाझेबरोबरचे टेलिग्रामवरचे संभाषणही तपासले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.
वरूण सरदेसाईंनी केला इन्कार
संध्याकाळी वरूण देसाई यांनी अनिल परब यांच्या साथीने एक पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला. याबाबत आपण राणे यांच्याविरूद्ध बदनामीचा फौजदारी दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.