Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे...

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे धायकुतीला?

मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडीचा पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच झाला. या पहिल्याच मेळाव्यात सर्वात पहिले भाषण झाले ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीवर खरपूस टीका केली. या टीकेबरोबरच त्यांनी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीच्या आधी जाहीर करावा अशी मागणी केली. तुम्ही कोणताही उमेदवार जाहीर करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ.. इथल्या इथे मी पाठिंबा जाहीर करतो असे ठाकरे म्हणाले. मात्र ठाकरेंच्या म्हणण्याकडे ना शरद पवारांनी लक्ष दिले ना पटोले व पृथ्वीराजबाबांनी..

या मेळाव्याच्या चार दिवस आधीच उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह नवी दिल्लीच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच शरद पवार आणि इतर काही नेत्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरेंसोबत त्यांचे सहकारी नेते संजय राऊतही होते. या दौऱ्यानंतर किंबहुना या दौऱ्याआधी राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला गेला पाहिजे, अशी विधाने करत होते. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर या विधानाला जरा जोर आला. आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असावेत असे वाटते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या मनात दुसरा उमेदवार असेल तर तो जाहीर करावा, अशी जाहीर भूमिका राऊत यांनी मांडली. राऊत यांच्या भूमिकेवरही आघाडीतल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या नेत्यांनी मौन पाळले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच या विषयाला हात घातला.

उद्धव

या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर आमची युती होती. तीस वर्षं या काळात आम्ही नेहमी ठरवायचो की ज्याचे उमेदवार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री राहील. त्यामुळे आम्ही त्यांचे पाडायचो, ते आमचे पाडायचे आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचो. महाविकास आघाडीत तसे होऊ नये. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला तर हा विषय येणार नाही आणि सर्व एकदिलाने काम करतील, एकजूट मजबूत राहील.

उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा वैधानिक सल्ला दिला असला, अनमोल असा उपदेश केला असला तरी यावेळी मात्र त्यांनी प्रत्यक्षात काय केले हे ते सोयीस्करपणे विसरले. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर केले होते. महायुतीच्या प्रत्येक मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तेव्हाचे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह जाहीरपणे सांगत होते की, फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील. उद्धव ठाकरे त्यावेळी मान डोलवत होते. पण, प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मोट बांधली. या प्रयत्नात ते मुख्यमंत्री झाले आणि आता त्यांना त्या खुर्चीची चटक लागली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

उद्धव

2019च्या, मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर शरद पवार यांनी डाव साधला. पुत्रप्रेमाने आंधळे झालेले उद्धव ठाकरे काहीही करायला तयार होतील हे हेरून त्यांनी उद्धव ठाकरेंना आपल्या जाळ्यात अलगद ओढले होते. कारणही तसेच होते. त्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे कायम स्टेजवर असायच्या आणि त्यांच्यासमोर हेच संजय राऊत, आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री होतील.. आदित्य ठाकरे यांचे विमान आता वरळीतून उडणार ते थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार… अशा आशयाचे वक्तव्य करत होते. ऐकायला तर ते छान वाटत होतं. परंतु त्याच्यामुळे रश्मी ठाकरेंची इच्छा भयंकर चाळवली. त्यामुळेच काही करून आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीच्या खुर्चीत बसवायचे, असे ठाकरे परिवाराने म्हणजेच उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी मनोमन ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले.

परिणाम तसाच झाला. शरद पवार यांनी ठाकरे पती-पत्नीचे हेच पुत्रप्रेम रोखले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन उद्धवजींना दिले. त्यामुळेच मग भाजपाबरोबर कोणतीही चर्चा न करण्याची भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत.. अशी भूमिका मांडली. बंद दाराआड अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडला.. मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे आहे.. अशा गप्पा मारत उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा चंग बांधला. पण पवार हे कसलेले गडी.. त्यांना ते होऊ द्यायचे नव्हते. आपल्या पक्षाचे बहुमत असताना केवळ अजितदादांना मुख्यमंत्री करावे लागू नये आणि आपल्या मुलीसमोर म्हणजेच सुप्रिया सुळेंसमोर घरातलेच आव्हान उभे राहू नये याकरीता ज्या शरद पवारांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्याचे ठरवले आणि त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली, ते शरद पवार आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील, यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला असेल तरी राजकीय अभ्यासक ठेवणार नाही.

उद्धव

पवार यांनी एकीकडे उद्धव ठाकरेंना आदित्य मुख्यमंत्री होतील याची खात्री दिली, तर दुसरीकडे काँग्रेसला हे मान्य करायचे नाही अशी गळही घातली. परिणाम असा झाला की राजभवनावर हेच आदित्य ठाकरे सरकार बनवण्याचे पत्र घेऊन गेटवर उभे राहिले आणि दोन तास ताटकळल्यानंतरही काँग्रेसकडून पाठिंब्याचा फॅक्स येत नाही म्हणून माघारी फिरले.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आदी नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळात काम करणे शक्यच नव्हते. त्यामुळेच काँग्रेसने हात वर केले आणि नाईलाजाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालून घ्यावी लागली. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे हा बाळासाहेबांना दिलेल्या शब्द पाळताना उद्धव ठाकरे नावाचे शिवसैनिक मुख्यमंत्री झाले.

ज्या बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितले होते की, शिवसेनेची जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा मी माझे दुकान बंद करीन आणि आज त्यावेळच्या शिवसेनेच्या प्रमुखांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. पण, एकदा सत्तापद, अधिकारपद उपभोगले की खुर्चीची उब कायम लक्षात राहते. मग, त्यादिशेने पावले आपोआपच पडतात. मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या नादात मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. यासाठीच त्यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात स्वतःच हा विषय काढला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर उद्धव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यास महाविकास आघाडीत कोणाला आक्षेप आहे का, असे जाहीरच विचारले. राऊत यांनी तर आपल्या आघाडीतल्या सहकाऱ्यांनाच आव्हान देत उद्धवजी नकोत तर कोण हे जाहीर करा, असे विधान केले. आता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ झाले आहेत की, ते काँग्रेस व राष्ट्रवादी (शप)च्या नेतृत्त्वाला विनंती करत आहेत की, चार भिंतीत तरी मला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा कळू द्या. म्हणजे पुन्हा बोलायला मोकळे की, बंद दाराआड यांनीही आपल्याला तेच आश्वासन दिले होते जे अमित शाह यांनी!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

एकनाथ शिंदेंचा भाजपाने केला ‘करेक्ट कार्यक्रम’?

नाकापेक्षा मोती जड.. चाय से किटली गरम.. अशा काही म्हणी माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यातलीच एक म्हण काल शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवली असावी. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही इथपासून उपमुख्यमंत्रीपद...

विनोद तावडेंचे प्रयत्न फेल, फडणवीसच मुख्यमंत्री! पंकजाही बाहेर!!

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता दिली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

एकनाथ शिंदेंचे सरेंडर? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि मिळालेल्या पाशवी बहुमतानंतरही महायुतीला तब्बल आठ दिवस सरकार बनवता आले नाही ते केवळ मावळते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच! मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीपुढे सपशेल...
Skip to content