भारताचा बुजूर्ग फिरकी गोलंदाज ३८ वर्षीय आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात अचानक तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात सारे आलबेल नसल्याची चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये सुरु आहे. १४ वर्षे भारतीय क्रिकेटची आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने सेवा करणाऱ्या अश्विनच्या या धक्कादायक निवृत्तीमुळे भारतीय संघाला मोठाच हादरा बसला. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक भारतीय आजी-माजी खेळाडू अचंबित झाले. त्याने अशी निवृत्ती घ्यायला नको होती. तसेच बीसीसीआयने या दिग्गज खेळाडूला सन्मानपूर्वक निरोप द्यायला हवा होता, अशीच टिप्पणी या आजी-माजी खेळाडूंनी केली.
काही वर्षांपूर्वी टि.व्ही.वर गाजलेल्या सी.आय.डी. मालिकेत एसीपी पद्युम्न नेहमी एक डायलॉग म्हणत असत, “दया कुछ तो गडबड है..” त्या डायलॉगची आठवण अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीमुळे प्रकर्षाने झाली. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत २ सामने बाकी असताना अश्विनने तिसरी कसोटी संपताच निवृत्ती जाहीर करून लगेचच भारताचा रस्ता धरला. वास्तविक मालिकेत २ सामने बाकी असताना त्याच्यासारख्या अनुभवी गोलंदाजाची भारतीय संघाला गरज असताना त्याने असा अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला हा मोठाच प्रश्न आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या वडिलांनी याबाबत भाष्य करताना त्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचे सूचित केले. भारतात आल्यानंतर त्यावर सारवासारव करताना अश्विन म्हणाला की, ‘माझे वडिल प्रथमच प्रसिद्धीमाध्यमांना सामोरे गेले. प्रसिद्धीमाध्यमांशी कसा संवाद साधायचा ह्याची त्यांना फारशी माहिती नाही. त्यामुळे भावनेच्या भरात ते बोलून गेले. पण ते गांभिर्याने घेऊ नका.’ शेवटी म्हणतात ना मुलाचे दुःख वडिल जाणतात. त्यामुळे भारतीय संघातील सध्याचे वातावरण उत्साहवर्धक दिसत नसल्याचे चित्र समोर येते.
२०१४च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने मालिकेच्यामध्येच अशीच निवृत्ती जाहीर करुन भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजवली होती. आता १० वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती अश्विनने केली आहे. तब्बल १४ वर्षे भारतीय संघातर्फे खेळणाऱ्या अश्विनने तीनही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळून ७६५ बळी घेतले. कसोटीत अनिल कुबळेनंतर सर्वाधिक बळी घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज आहे. तेव्हा अशा अनुभवी खेळाडूला जर अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर मामला नक्कीच गंभीर आहे असे म्हणावे लागेल. राहुल द्रविड यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाची मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीर यांनी स्वीकारल्यानंतर भारतीय संघातील वातावरण फारसे उत्साहवर्धक नसल्याची चर्चा आहे. संघात खेळाडूंचे गट पडल्याचीदेखील कुजबूज सुरु आहे. आयपीएलमध्ये कोलकाता संघातर्फे खेळणाऱ्या खेळाडूंना झुकते माप दिले जात असल्याचे म्हटले जात आहे.
अश्विन आणि जडेजा या दोघांची फिरकी जोडी अलिकडच्या काळात भारतासाठी खूप यशस्वी ठरली होती. या दोघांनी एकूण ८५६ बळी घेतले होते. दोघांची मित्र म्हणून चांगली गट्टी जमली होती. तिसऱ्या कसोटीनंतर जडेजाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अश्विनने घेतलेल्या अचानक निवृत्तीमुळे आपल्यालाही धक्का बसल्याचे सांगितले. निवृत्तीबाबत शेवटपर्यंत त्याची नक्की काय भूमिका आहे? ऑस्ट्रेलियन दौऱ्यात बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि काही सदस्यदेखील गेले आहेत. निवड समितीच्या अध्यक्षांशी अश्विनचे काही बोलणे झाले का? याबाबत कुठेच काही वृत्त आले नाही. तसेच अध्यक्षांची प्रतिक्रियादेखील आली नाही. वास्तविक भारताच्या या महान फिरकी गोलंदाजाला सन्मानपूर्वक निरोप दिला असता तर भारतीय संघातील राजकारण बाहेर आले नसते.
भारताच्या या चॅम्पियन फिरकी गोलंदाजाने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाला तोड नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांची मोठी परंपरा आहे. ती जपण्यात अश्विनने आपल्यापरीने मोठा हातभार लावला असे म्हटले तर वावगे ठरू नये. “अश्विन अण्णा” या टोपणनावाने क्रिकेट विश्वात ओळखला जाणारा अश्विनची एक हुशार गोलंदाज म्हणून ओळख होती. इंजिनियरिंगची पदवी घेतली असल्यामुळे आपल्या गोलंदाजीत सातत्याने बदल करुन आणि नवेनवे प्रयोग राबवल्यामुळेच तो एव्हढे मोठे यश मिळवू शकला. आर्म बॉल, कॅरम बॉल याचा खुबीने वापर करून त्याने अनेक फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतभूमित त्याची गोलंदाजी खेळणे म्हणजे प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठे आव्हान असायचे. भारतात ६५ कसोटीत ३८३ बळी घेऊन एक स्वतःचा वेगळा दबदबा अश्विनने निर्माण केला होता. आपला फिटनेस राखण्यात तो माहिर होता. त्यामुळे १३ वर्षांत भारतात झालेल्या कुठल्याच कसोटी मालिकेला तो मुकला नाही.
सुरुवातीला फलंदाज व्हायचे का गोलंदाज, अशा द्विधा मनःस्थितीत तो सापडला होता. परंतु चांगली उंची आणि देहयष्टी असल्यामुळे अखेर त्याने गोलंदाज होण्याचाच निर्णय घेतला, जो भारतासाठी चांगलाच फलदायी ठरला. इंग्लंडविरुद्ध त्याने ५३ सामन्यात सर्वाधिक १५० बळी घेतले. चांगल्या गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाज म्हणून अश्विनने आपला ठसा उमटवला होता. २०११नंतर अश्विनची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. ३ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा आणि ५००पेक्षा जास्त बळी घेणारा तो भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे. सुनील सुब्रमण्यम याने सुरुवातीच्या काळात अश्विनला घडवण्यात मोठी भूमिका बजावली. आयपीएलमध्ये चेन्नई, पुणे, पंजाब, राजस्थान संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत चेन्नई संघाने त्याला १५ कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात पुन्हा दाखल करुन घेतले आहे. त्याची आकडेवारीच तो किती मोठा गोलंदाज होता हे दर्शवते.
१३० कोटींचा अश्विन धनी आहे. त्याला गाड्यांचा छंद असून ६ कोटींची “रोल्स रॉइस, १६ कोटींची ऑडी त्याच्याकडे आहे. २०२१मध्ये चेन्नईत त्याने १० कोटींचा बंगला खरेदी केला. मूव्ह, मंत्रया, बॉम्बे शेविंग क्रीम, कोकोकोला, कोलगेट, ओपो, झुमका, मन्ना हेल्ट, एअरस्टोक्रेट बॅग्ज या बड्या ब्रॅण्डशी तो जोडला गेला आहे. “जेन नेक्स्ट” ही अश्विनची स्वतःची क्रिकेट अकादमी आहे. तसेच त्याची स्वतःची मीडिया कंपनीदेखील आहे. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेट संघात फिरकी गोलंदाजाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याची उणीव भारतीय संघाला नक्कीच जाणवेल यात शंका नाही. भारतीय क्रिकेटसाठी दिलेले त्याचे योगदान मात्र कोणताच भारतीय क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही.