नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली असून मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज का पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीने आजपर्यंत उमेदवारांची पळवापळवी केली. त्यानंतर आता मतदार पळवीपळवीचा अनोखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले तर ते स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे जर याबाबत आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही, 3 तारखेपर्यंत जर कायदेशीर मार्गाने बदल केले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू असेही त्यांनी सांगितले.
सोसायटी आणि चाळीतील नावे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे मतदार पसार करणे सुरू आहे. दुसरा प्रकार म्हणजे अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवायला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही. म्हणजे हा कामचुकार तर अनेक ठिकाणी मतदारयादीतील घोळ पाहता याद्याच टूकार म्हणजे एकप्रकारे मतदारांच्या अधिकारालाच नकार दिला असल्याचे चित्र आहे. याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
काय घडलेय नवी मुंबईत..
111 प्रभागात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नांवे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रभागरचनेनुसार ज्या प्रभागात सोसायट्या / चाळी येतात त्या सोसायट्या व चाळीमधील मतदारांची नावे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. उदा. कोपरखैरणे, प्रभाग क्र. ३९मध्ये प्रभागरचनेनुसार येत असलेल्या सोसायट्या व चाळींमधील नावे प्रभाग क्र. ४१ व प्रभाग क्र. ३८मधील मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जी नावे प्रभाग क्र. ४१ व ३८मधील प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी अनेक नागरिक प्रभाग क्र. ३९मध्ये वास्तव्यास असल्याचे पुरावे हरकतीद्वारे विभाग कार्यालयामध्ये सादर केले आहेत. प्रभागरचनेनुसार प्रभागात येत असलेली एकाच हेडखालील नांवे दोन-तीन प्रभागात स्थलांतरीत करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

ज्या व्यक्ती त्या प्रभागात वास्तव्यास आहेत त्यांची नावे दुसऱ्या प्रभागातील मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट का करण्यात आली आहेत, कोणत्या नियमानुसार व निकषानुसार ती दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत, ती कोणत्या अधिकारी / कर्मचारी यांनी टाकली आहेत आणि ती कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आली आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेलार यांनी केली.
ऐरोली, प्रभाग क्र. १५मधील मतदारांची नावे प्रभाग क्र. १६ व १८मध्ये स्थलांतरीत झालेली आहेत तसेच इतर प्रभागातील नावे प्रभाग क्रमांक १५च्या मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन दिले तर ते स्वीकारले जात नाहीत. ऐरोली प्रभाग क्र. २१मधील मतदारांची नावे दिघा प्रभाग क्र. ५मधील मतदारयाद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. याबाबत हरकत सादर करण्यास गेलेल्या त्याठिकाणीदेखील अधिकारी / कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत त्यांना जाब विचारला असता उशिराने त्या स्वीकारल्या जात आहेत. हे सर्व प्रकार कोणत्या नियमाला धरुन केले जात आहेत? घणसोली प्रभाग क्रमांक २७ व प्रभाग क्र. २८ मध्येदेखील मोठ्या प्रमाणावर नावांची हेराफेरी करण्यात आली आहे. प्रभागात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. आपल्या लोकांच्यामार्फत यादीमध्ये नमूद असलेल्या पत्त्यावर स्थळपाहणी केली असता सदरचे नागरिक त्याठिकाणी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रभागरचनेनुसार, प्रभाग क्र. ७३मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे जाणीवपूर्वक चुकीच्या हेतूने प्रभाग क्र. ८०मधील प्रारुप मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सानपाडा प्रभाग क्र. ७९मधील मतदारयादीमध्ये अशाचप्रकारे तुर्भे, वाशी, नेरुळ, जुईनगर इत्यादी प्रभागातील मतदारांची नावे या प्रभागातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे गेली असल्यास काही ठिकाणी अधिकारी / कर्मचारी हरकती स्वीकारण्यास जाणीवपूर्वक उशीर व टाळाटाळ करीत आहेत. नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत त्याअनुषंगाने त्याची चौकशी करुन कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक नागरिक हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे शेलार यांनी सांगितले.
हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक, चुकीच्या पद्धतीने, नियमांचे उल्लंघन करुन, अधिकारी-कर्मचारी यांच्या संगनमताने आर्थिक फायद्याकरिता तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडून करण्यात आला आहेत. जे मतदार त्या प्रभागात राहत आहेत त्यांची नावे पूर्ववत ठिकाणच्या मतदारयांद्यामध्ये समाविष्ट करण्याची गरज आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. ४४मधील मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे समाविष्ट असल्याची बाब १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना स्थलांतरीत मतदारांचे यादी भागात नमूद पत्त्यावर स्थळपाहणी करुन नावे वगळणीकरीता पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने स्थळपाहणी केली असता अनेक मतदार याठिकाणी वास्तव्यास नसल्याचे समोर आले व त्याबाबत नियमानुसार पंचनामे करुन मतदारयादीतील दुबार, स्थलांतरीत नावांची वगळणी करण्याकरिता एकूण ९०४ व्यक्तींच्या स्थलांतरीत मतदारांच्या पंचनाम्याची यादी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांना, मतदार नोंदणी अधिकारी, १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघ यांनी दि. ३/२/२०२१ रोजी पत्र सादर केले आहे. नमूद नावे नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२१करिता प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट आहेत. जर दुबार, स्थलांतरीत नावे नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्यास बोगस मतदान होणार आहे. त्याकरिता ती मतदारयादीमधून वगळण्यात यावीत असेही ते म्हणाले.