मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? काल सकाळी वर्तमानपत्रे आली आणि आश्चर्याचा धक्काच बसला की हो! ‘सामना’ वर्तमानपत्रात राज्य सरकारची चक्क पानभर जाहिरात आणि तीही पहिल्या पानावर!! अलीकडच्या काळात सरकारी जाहिराती सामनाला मिळत होत्या. नाही असं नाही. पण त्या आतील पानावर व अर्ध्यामुरड्या पानभर. मग जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहिला आणि त्यांचे गेल्या निवडणूक प्रचारातील एक वाक्य आठवले ‘उद्धव यांना मी केव्हाही फोन करू शकतो’.. (एक फोन की दूरी है..)

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्त देखरेखीखालील माहिती खात्याने ही जाहिरात दिलेली असल्याने आता समजा याची चौकशी करायची झाली तर नेमका ठपका कुणावर ठेवला जाईल याबाबत शंकाच आहे. असो. जाहिरातीतील हा प्रकल्प शिवसेना सत्तेत असताना मुंबई महापालिकेने अंमलात आणायला सुरुवात केली होती. हेही कारण असावे किंवा ‘मनभेद’ मिटानेकी कोशिश भी हो सकती है.. असे धूर्त कारणही एका भाजपायीने दिले. हे कारण ऐकून मला येणारे हसू मी दाबून ठेवले.. का ते मात्र समजत नाही!