एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा करपश्चात म्हणजेच निव्वळ नफा जाहीर केला आहे.
कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे ऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक अहवाल जाहीर केले असून ते प्रमुख आर्थिक निर्देशकांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवितात. कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक करपश्चात नफा 1,699 कोटी रुपये नोंदवला आहे. देशातली सर्वात मोठी केवळ हरित वित्तपुरवठा करणारी एनबीएफसी अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून इरेडाने केवळ 15 दिवसांत त्यांचे लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करून पुन्हा एकदा उद्योग मानके प्रस्थापित केली आहेत. या कामगिरीमुळे इरेडा केवळ 15 दिवसांत लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील पहिली कंपनी आणि पहिली सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (पीएसयू) ठरली आहे.
काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत इरेडाच्या संचालक मंडळाने कंपनीच्या 31 मार्च 2025ला संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी ऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली. आर्थिक वर्ष 2023-24च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25मध्ये करपश्चात नफा 1,699 कोटी (↑36%), करपूर्व नफा 2,104 कोटी (↑25%), परिचालनाद्वारे महसूल 6,742 कोटी (↑36%), निव्वळ मूल्य 10,266 कोटी (↑20%) आणि कर्ज खातेवही 76,282 कोटी (↑28%) इतकी आढळून आली आहे.
निकालांवर भाष्य करताना, इरेडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले की, इरेडाची महसूल, नफा आणि कर्ज खातेवहीतील सातत्यपूर्ण वाढ भारताच्या नवीकरणीय ऊर्जेसाठी वित्तपुरवठा करण्याचा आमचा धोरणात्मक दृष्टिकोन अधोरेखित करते. धोरणात्मक भागीदारीद्वारे भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाला सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.