हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या लाखो चाहत्यांना दिवाळीनंतर लगेचच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आगळी संधी दिली. बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी सहज पराभव करून भारताने प्रथमच या मानाच्या चषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळवले. या विजयाबरोबर भारताने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या आपल्या पराभवाची परतफेड लगेचच करुन टाकली. तसेच भारतीय महिला संघाने आपला जग्गजेतेपदाचा दुष्काळ संपवला. २००५ आणि २०१७च्या या स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर इंग्लंडकडून भारतीय संघ त्यावेळी अंतिम फेरीत पराभूत झाला होता. अखेर त्या पराभवाच्या कटू आठवणी पुसल्या गेल्या. याअगोदर पुरूषांच्या क्रिकेटमध्ये कपिल देव, महेंद्रसिंग धोनीने हा चषक उंचावला होता. गतवर्षी भारताने टी-२०, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यात आशिया चषक जिंकला होता. आता भारतीय महिला संघाने त्यावर कडी केली.
अंतिम सामन्यात द.आफ्रिकेची कर्णधार लौराने नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. हाच तिचा निर्णय त्यांना चांगला महागात पडला. उपांत्य फेरीच्या सामन्यात याच डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ३३९ या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मैदानात पडणाऱ्या दवाचा आपल्याला फायदा होईल, तसेच सामन्यापूर्वी पाऊस पडल्याने खेळपट्टी थोडी ओली असेल त्याचा फायदा आपल्या वेगवान गोलंदाजांना मिळेल असा लौराचा अंदाज होता. पण तो पूर्णपणे चुकला. त्यामुळे पहिल्यांदा अंतिम फेरी गाठून जेतेपद मिळवण्याचे आफ्रिका संघाचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताने विजयासाठी त्यांच्यासमोर ठेवलेले २९९ धावांचे मोठे लक्ष्य पार करणे सोपे नव्हते. मानधना ४५, शफाली वर्मा ८७, दिप्ती शर्मा ५८, रिचा घोष ३४ धावा यांच्या सुरेख खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या काढता आली. मानधना, शेफालीने भारताला दमदार शतकी सलामी करुन दिली. दिप्ती, रिचाची सहाव्या विकेटसाठी केलेली ४७ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेने २ बाद ११४ धावा अशी आश्वासक सुरूवात केली होती. पण शफालीने लुस, कॅपला झटपट बाद करुन आफ्रिकेला मोठे धक्वे दिले. मग त्यानंतर दिप्ती शर्माने चार बळी घेऊन त्यांची फलंदाजी मोडीत काढली. कप्तान लौराने झुंजार शतकी खेळी केली. पण अखेर तिचाही अडसर दिप्तीने दूर करुन भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले.

या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतीत सलग दोन शतके काढणारी लौरा केवळ दुसरी कर्णधार ठरली. याअगोदर असा पराक्रम ऑस्ट्रेलियन कप्तान हिलीने गेल्या २०२२च्या या स्पर्धेत केला होता. कप्तान लौराला मध्यल्या फळीतील फलंदाजांची साथ मिळाली नाही. ती मिळाली असती तर कदाचित विजयाचे पारडे त्यांचा बाजूने झुकले असते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी घेणारी दिप्ती पहिली अष्टपैलू खेळाडू ठरली. तसेच ८७ धावा आणि २ बळी अंतिम सामन्यात घेणारी शफाली वर्मादेखील प्रथम खेळाडू ठरली. शफाली खरं म्हणजे निवडलेल्या भारतीय संघात नव्हती. पण फॉर्मात असलेली सलामीवीर प्रतिका रावल न्युझीलंडविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाली. त्यामुळे पुढील सामन्यातून ती बाद झाली. तिच्याऐवजी शफाली वर्माला संघात घेण्यात आले. शफालीने मिळालेल्या संधीचे सोने केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती फार चमक दाखवू शकली नाही. पण अंतिम सामन्यात तिच्या अष्टपैलू खेळाने भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली. अंतिम लढतीमध्ये अष्टपैलू खेळ करणाऱ्या दिप्ती शर्मा आणि शफाली वर्मा या दोघीजणी भारतीय विजयाच्या शिल्पकार होत्या. भारतीय कप्तान हरमनप्रीत कौर एक, दोन सामन्यांचा अपवाद वगळता फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकली नाही. पण तिने आपल्या नेतृत्त्वाची चांगली चमक दाखवली. या स्पर्धेत भारतीय संघात सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीची अभाव जाणवत होता. काही हातातोंडाशी आलेले विजय भारताने हाराकिरी केल्यामुळे गमावले. त्यामुळे एक वेळ तर सलग तीन सामन्यात पराभवाची नामुष्की भारतीय संघावर आली. तेव्हा भारत उपांत्य फेरी गाठणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण नंतरच्या सामन्यात भारताने आपला खेळ चांगला उंचावला आणि जेतेपदाकडे कूच सुरु केली. भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली ती मुख्य प्रशिक्षक असलेल्या मुंबईकर रणजी संघाचे माजी कर्णधार अमोल मुजुमदार यांनी. १९९०च्या दशकात स्थानिक स्पर्धांत अमोलने धावांचा पाऊस पाडला होता. पण दुर्देवाने त्यांना शेवटपर्यंत भारतीय संघात संधी मिळाली नाही. आता निदान त्याची थोडी भरपाई मुजुमदार यांना या ऐतिहासिक जेतेपदामुळे मिळाली असे म्हणावे लागेल.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सनसनाटी विजयाची नोंद करताना माजी विजेत्या इंग्लंडचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. इंग्लंड कर्णधार ब्रंटने नाणेफेक जिंकून प्रथम दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय इंग्लंडसाठी चांगलाच महागात पडला. दक्षिण आफ्रिकेची कप्तान लौराने केलेल्या १६९ धावांच्या तुफानी शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद ३१९ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेतील लौराचे हे पहिलेच शतक होते. तिला तमिमने ४५ कॅपने ४२ टायनने ३३ नाबाद धावा काढून चांगली साथ दिली. इंग्लंडतर्फे सोफीने ४ तर बेलने २ बळी घेतले. ३२० धावांचा यशस्वी पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातीला ३ बाद १ धावा अशी बिकट अवस्था झाली. अॅमी, हॅपी, नाईट या तिघीजणी भोपळा न फोडताच माघारी परतल्या. ब्रंट, अॅलिसने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघी बाद झाल्यानंतर इंग्लंडचे आव्हानदेखील संपुष्टात आले. या विजयाबरोबर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टप्प्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत यजमान भारताने सर्वाधिक विक्रमी सातवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ५ गडी ९ चेंडू राखून सनसनाटी पराभव करून तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २०१७च्या या स्पर्धेत कणधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद १७१ धावांच्या जबरदस्त शतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. आता त्याच विजयाची पुनरावृत्ती आठ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर नवी मुंबईमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये करुन दाखवली. यावेळी कप्तान हरमनप्रीत कौरची भूमिका मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जने बजावून भारतीय संघाच्या अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. जेमिमाने नाबाद १२२ धावांची आपल्या कारकिर्दीतील एक अविश्वसनीय खेळी करुन भारतीय संघाची नौका किनाऱ्याला लावली. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत स्पर्धेत धावांची बरसात सातत्याने होत नसल्यामुळे जेमिमाला अंतिम संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर न्युझीलंडविरुद्धच्या भारतीय संघासाठी “करो वा मरो” या लढतीत तिला संघात परत स्थान देण्यात आले. जेमिमाने त्या सामन्यात नाबाद ७६ धावांची खेळी करुन भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने भारताची एक बाजू भक्कमपणे लावुन धरली आणि ऑस्ट्रेलियाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. या खेळीत तिला तीन जीवदाने मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा जेमिमाने घेतला. म्हणतात ना दैवाची साथ नेहमी लढाऊ योद्धाला मिळते. जेमिमाबाबत ते तंतोतंत खर ठरले.
आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ करताना सलामीच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी आरामात पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आपल्या पारंपरीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला ८८ धावांनी सहज नमविले. तिसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने मात्र भारतावर ३ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. चौथ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताचा थरारक लढतीत ६ चेंडू आणि ३ गडी राखून पराभव केला. पाचव्या सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडकडूनदेखील भारताला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. कारण नसताना भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे अवघ्या ४ धावांनी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे न्युझीलंडविरुद्ध होणारा सहावा सामना भारतासाठी “करो वा मरो” असाच होता. या सामन्यात विजय मिळवला तरच भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे तिकिट पक्के होते. या सामन्यात ५३ धावांनी शानदार विजय मिळवत भारताने आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. न्युझीलंड कप्तान सोफी डेविनने नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. तिचा हा निर्णय न्युझीलंडच्या पराभवाला कारण ठरला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताला सहज विजय मिळाला. या पराभवामुळे न्युझीलंडचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. शेवटचा भारत, बांगलादेश सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघाना १-१ गुण मिळाले. भारत, श्रीलंकेचे समान प्रत्येकी ७ गुण झाले. पण सरस धावगतीच्या जोरावर भारताने चौथा क्रमांक मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाची या स्पर्धैत सुरूवात पराभवाने झाली. त्यांना पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडकडून मोठी हार खावी लागली. दुसऱ्या सामन्यात मात्र द. आफ्रिकेने न्युझीलंडचा ६ गडी राखून सहज पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताला ३ गडी राखून आरामात नमविले. आपला सलग तिसरा विजय मिळवताना त्यांनी दुबळ्या बांगलादेशचादेखील ३ गडी राखून पराभव केला. पाचव्या सामन्यात आफ्रिकेने यजमान श्रीलंकेचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. आपली विजयी दौड कायम ठेवताना आफ्रिकेने कमकुवत पाकिस्तानचा १५० धावांनी धुव्वा उडवला. शेवटच्या ७व्या सामन्यात आफ्रिकेची विजयी दौड गतविजेत्या ताकदवान ऑस्ट्रेलियाने रोखली. परंतु या पराभवाचा आफ्रिकेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर फारसा परिणाम होणारा नव्हता. त्यांनी अगोदरच सहा सामन्यात दहा गुण मिळवून गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवून आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले होते.
पावसाचा मोठा फटका श्रीलंकेतील सामन्यांना बसला. तिथे पावसामुळे ४ सामने होऊ शकले नाहीत. या स्पर्धेत पाकिस्तान हा एकमेव संघ होता, ज्याला एकही सामना जिंकता आला नाही. भारतीय संघाचा अपवाद वगळता आशिया खंडातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या यजमान श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश संघांची कामगिरी खराब झाली. श्रीलंका, बांगलादेशने अवघा एक विजय मिळवला तर पाकिस्तानला तेदेखील शक्य झाले नाही. अपेक्षेप्रमाणे विश्वातील अव्वल चार बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया, भारत, द.आफ्रिका, इंग्लंडने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पहिल्या टप्प्यात अपराजित राहणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ होता. इतर संघाना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत भारतात झालेल्या सामन्यांना क्रिकेटरसिकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. श्रीलंकेत मात्र त्यामानाने तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात तेथील बऱ्याच सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. हे ऐतिहासिक विजेतेपद भारतीय महिला क्रिकेटला नवी संजीवनी देईल. भावी काळात पुरुष संघापमाणे भारतीय महिला संघदेखील आपला मोठा दबदबा निर्माण करेल यात शंका नाही. भारतीय महिला क्रिकेटसाठी आता खऱ्या अर्थाने चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे!

