भारतीय नौदलाने मध्य/उत्तर अरबी समुद्रात सागरी गस्त ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव वाढ केली आहे आणि सैन्याची कुमक वाढवली आहे. विनाशक क्षेपणास्त्रे आणि आणि लढाऊ जहाजांचा समावेश असलेले कृतीदल सागरी सुरक्षा कार्य करण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये लाल समुद्र, एडनचे आखात आणि मध्य/उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सागरी सुरक्षासंबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय सागरी किनार्यापासून अंदाजे 700 नॉटिकल मैल अंतरावर एमव्ही रुएन या व्यापारी जहाजावर झालेली चाचेगिरीची घटना आणि पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिम 220 नॉटिकल मैलांवर चेम प्लूटो (MV Chem Pluto) या व्यापारी जहाजावर अलीकडेच झालेला ड्रोन हल्ला भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) जवळील सागरी घटनांमध्ये बदल झाल्याचे सूचित करते.

या घटनांना प्रतिसाद म्हणून, संपूर्ण सागरी क्षेत्रात जागरुकता ठेवण्यासाठी लांब पल्ल्याची सागरी गस्ती विमाने आणि रिमोटली पायलेटेड एयरक्राफ्ट माध्यमातून हवाई देखरेख वाढवण्यात आली आहे. भारतीय एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्रात देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल तटरक्षक दलासोबत समन्वयाने कार्य करत आहे.

राष्ट्रीय सागरी संस्थांच्या समन्वयाने भारतीय नौदलाकडून एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय नौदल या प्रदेशातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.