कोविडच्या काळातली चिंताजनक परिस्थिती अद्याप पूर्णपणे बदललेली नाही. त्याचप्रमाणे भू-राजकीय तणाव, उच्च चलनवाढ आणि कर्जाची वाढती पातळी ही आव्हाने असून लवचिकता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्त्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला ते नुकतेच संबोधित करत होते.

व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्त्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली गेली.

पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना, डिसेंबर 2021मध्ये इन्फिनिटी फोरमच्या पहिल्या आवृत्तीच्या आयोजनादरम्यान जागतिक आर्थिक परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे प्रभावित झालेल्या साथीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या जगाचे स्मरण केले.
भारताची विकासकथा ही सरकारच्या धोरण, सुशासन आणि नागरिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर आधारित आहे, यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताचा विकास दर 7.7 टक्के होता. सप्टेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नमूद केल्याप्रमाणे, 2023मध्ये जागतिक विकास दरात भारताचे योगदान 16 टक्के असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारतातील लाल फितीशाही कमी झाल्यामुळे गुंतवणुकीच्या चांगल्या संधी निर्माण झाल्याच्या जागतिक आर्थिक मंचाच्या निरीक्षणावर त्यांनी प्रकाश टाकला. भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला आहे. भारताची दिवसागणिक मजबूत होत असलेली अर्थव्यवस्था आणि गेल्या 10 वर्षांतील परिवर्तनात्मक सुधारणांचे हे फलित आहे. जेव्हा उर्वरित जग वित्तीय आणि आर्थिक मदतीवर केंद्रित होते तेव्हा दीर्घकालीन वाढ आणि आर्थिक क्षमता विस्तारावर भारताने लक्ष केंद्रित केल्यामुळे हे घडू शकले असे त्यांनी सांगितले.

जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मता वाढवण्याच्या उद्दिष्टावर जोर देऊन, पंतप्रधानांनी अनेक क्षेत्रांमधील लवचिक अशा थेट परकीय गुंतवणूक धोरणाची उपलब्धी, अनुपालन ओझे कमी करणे आणि आज 3 मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्याचा उल्लेख केला. GIFT IFSCA हा भारतीय आणि जागतिक वित्तीय बाजारांना एकत्रित करण्यासाठी केल्या जात असलेल्या मोठ्या सुधारणांचा एक भाग आहे. GIFT Cityची कल्पना चैतन्यपूर्ण परिसंस्था म्हणून केली गेली आहे जी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे चित्र पुन्हा परिभाषित करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की, आज आयएफएससीए अंतर्गत 80 निधी व्यवस्थापन संस्थांनी नोंदणी केली असून 24 अब्ज डॉलर्स इतका निधी स्थापन केला आहे. त्याशिवाय, दोन आघाडीच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना गिफ्ट आयएफएससी येथे 2024 साली आपले अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यांनी, मे 2022 मधे आयएफएससीएद्वारा, विमान भाड्याने देण्याच्या आराखड्याच्या विषयालाही स्पर्श केला.

गिफ्ट सिटी कडून मिळणारी उत्पादने आणि सेवा, आज जगाला आणि हितसंबंधीयांना असलेल्या आव्हानांवर मात करण्यास उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी यावेळी हवामान बदलाच्या समस्येकडेही लक्ष वेधले आणि त्यासंदर्भात, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक म्हणून, भारताने उपस्थित केलेल्या चिंता अधोरेखित केल्या. अलीकडेच झालेल्या कॉप 28 मधे भारताचे व्यक्त केलेल्या कटिबद्धतेची त्यांनी माहिती दिली. भारत तसेच जगाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी स्वस्त दरात पुरेसा निधी पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. शाश्वत निधीची गरज आपण समजून घ्यायला हवी, तरच, जागतिक वृद्धी आणि स्थैर्य प्रस्थापित करता येईल. काही अंदाजानुसार, भारताला यासाठी किमान 10 ट्रिलियन डॉलर इतक्या रकमेची गरज पडेल, असं पंतप्रधान म्हणाले. 2070 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, यापैकी काही रक्कम जागतिक स्त्रोताकडून मिळण्याची शक्यता आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

हरित बाँड्स, शाश्वत बाँड्स आणि शाश्वतत-संलग्न बॉन्ड्ससारख्या आर्थिक उत्पादनांचा विकास केल्याने संपूर्ण जगाचा मार्ग सुकर होईल, असे मोदी म्हणाले. कॉप 28मध्ये भारतातर्फे वसुंधरा स्नेही उपक्रम म्हणून ‘जागतिक हरित कर्ज उपक्रमाचा प्रस्ताव आणि या संकल्पनेची माहितीही त्यांनी दिली. हरित कर्जासाठी बाजारपेठेची यंत्रणा विकसित करण्याबाबत आपल्या कल्पना मांडण्याचे आवाहन मोदींनी उद्योग प्रमुखांना केले.
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणार्या फिनटेक बाजारपेठांपैकी एक आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की फिनटेकमधील भारताची ताकद गिफ्ट आयएफएससीच्या दृष्टीकोनाशी अनुरूप आहे. परिणामी, हे केंद्र फिन टेक केंद्र म्हणून वेगाने उदयाला येत आहे. गिफ्ट सिटीमध्ये जागतिक फिनटेक केंद्राचे महाद्वार आणि जगासाठी फिनटेक प्रयोगशाळा बनण्याची क्षमता आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गुंतवणूकदारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गिफ्ट आय एफ एस सी च्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा व्यावसायिकांची कार्यक्षमता वाढवण्यास सक्षम करणारे एक व्यासपीठ ठरले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आर्थिक आणि तंत्रज्ञान जगतातील नव्या उर्जावान विचारांना गिफ्ट सिटी आकर्षित करते आहे, असे मोदी म्हणले. आज आयएफएससी मध्ये 58 कार्यरत संस्था, आंतरराष्ट्रीय सराफा विनिमयासह 3 वायदेबाजार, 9 परदेशी बँकांसह एकूण 25 बँका, 29 विमा संस्था, 2 परदेशी विद्यापीठे, 50पेक्षा अधिक व्यावसायिक सेवा प्रदाते ज्यात सल्लागार संस्था, कायदा संस्था आणि सीए कंपन्या, यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
