इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IGF) हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे, जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023 (IIGF-2023) चे आयोजन प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमातून आज नवी दिल्लीतील प्रगती मैदान स्थित भारत मंडपम येथे होत आहे.

भारतासाठी एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक सायबर स्पेस उभारणे, भारताच्या विकासात्मक उद्दिष्टांसाठी नवोन्मेषाला चालना देणे, डिजिटल दरी दूर करणे आणि जागतिक डिजिटल प्रशासन आणि सहकार्यासाठी नेतृत्त्व यावरील भारताचा डिजिटल अजेंडा निश्चित करणे आदी मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचा हा एक प्रयत्न आहे. 2021 आणि 2022 मध्ये आयआयजीएफच्या पहिल्या दोन आवृत्त्या यशस्वीपणे आयोजित केल्यानंतर, आयआयजीएफची तिसरी आवृत्ती “मूव्हिंग फॉरवर्ड – कॅलिब्रेटिंग इंडियाज डिजिटल अजेंडा” या व्यापक संकल्पनेअंतर्गत आयोजित केली जात आहे.

सकाळी होणाऱ्या उदघाटन सत्राला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहणार आहेत.

इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (UN IGF) शी संबंधित उपक्रम आहे. इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो.

इंटरनेट संधी अधिकाधिक प्रमाणात कशा वाढवायच्या आणि त्यातील संभाव्य धोके आणि आव्हानांना कसे सामोरे जायचे याबद्दल आयजीएफ सर्वांना अवगत करते. संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची भारतीय आवृत्ती इंडिया जीएफ किंवा आयआयजीएफ https://www.indiaigf.in. ची स्थापना 2021मध्ये करण्यात आली आणि त्याला सरकार, नागरी संस्था, उद्योग, तांत्रिक समुदाय, विचारवंत, उद्योग संघ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध 14-सदस्यीय हितधारक समितीचा पाठिंबा आहे.