योग हे भारतातील प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे शास्त्र आहे. आज जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या नवनव्या रूपांचा सामना करत आहे, अशावेळी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाभ्यास एक प्रभावी माध्यम ठरले आहे. याच अनुषंगाने, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, प्रकाशन विभाग संचालनालयाने २६ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या योग सचित्र, या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे सातव्या योगदिनाचे औचित्य साधत, पुनर्प्रकाशन केले आहे.
हे सचित्र पुस्तक योगतज्ज्ञ धर्मवीर सिंग महिदा यांनी हिंदी भाषेतून लिहिले असून त्यात योगाचे आठ सोपान- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यातही योगासनांवर विशेष भर देण्यात आला आहे. योगासनांची सचित्र आणि सविस्तर माहिती त्यात देण्यात आली आहे. नव्यानेच योगाभ्यास शिकत असलेल्या लोकांना, समजेल तसेच व्यवसायिकांनाही मदत होईल, अशा सोप्या पद्धतीने विविध आसनांची प्रत्येक पायरी आणि त्याचे तंत्र यात समजावून सांगण्यात आले आहे.
या पुस्तकाचे लेखक, अनेक दशकांपासून योगशिक्षण-प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या अनुभवांच्या आधारे त्यांनी या पुस्तकात, योगासनांविषयी सर्वसमावेशक माहिती देत, सर्वसामान्य लोक त्याकडे आकर्षित होतील अशी पुस्तकाची रचना केली आहे. सुरुवातीला सोपे व्यायामप्रकार, नंतर कठीण आसने पुस्तकात आहेत. तसेच, योगाभ्यासाचा साप्ताहिक अभ्यासक्रम कसा असावा, दैनंदिन अभ्यासात कोणती आसने असावीत, याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, महिदा यांनी आसने करण्यासाठी घरीच सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचा अभिनव पद्धतीने वापर करत त्यानुसार योगाभ्यासाची रचना केली आहे. यात खुर्ची, टेबल, ब्लॅंकेट, उशी, पलंग आणि भिंतींचा वापर करून, ज्येष्ठ नागरिक आणि नवशिक्या योगाभ्यासींना करता येतील अशी आसने सांगितली आहेत. विविध आसनांच्या माध्यमातून लेखकाने, वाचकांना योगाचा आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धती म्हणून वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे.