या राज्यात कायद्या आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आपल्या आया-बहिणींना, माय-भगिनींना नग्न करून नाचवले जात आहे. हा नंगानाच थांबवला जात नसेल तर आम्हाला नाईलाजास्तव राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी लागेल. इतकेच नव्हे तर आज आम्ही तशी मागणीच करत आहोत, असे भारतीय जनता पार्टीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या तासात श्वेता महाले यांनी जळगावमधल्या आशादीप शासकीयवसतीगृहातल्या एका महिलेला नग्न करून तिला नाचवले गेल्याच्या घटनेविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची नोंद घेतली जाईल, असे थातुरमाथूर उत्तर दिले. त्यावर संतप्त झालेल्या मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या राज्यात एका महिलेल्या नग्न करून नाचवले जाते आणि तिची व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केले जाते आणि सरकार फक्त त्याची नोंद घेते. हे काय चालले आहे. इतकी संवेदनाहीन झाले आहे की काय हे सरकार, असा सवाल त्यांनी केला. या सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नाही. खरे तर निवडून आलेले सरकार बरखास्त व्हावे, अशी आमचीही इच्छा नाही. मात्र, नाईलाजाने आज आम्हाला ही मागणी करावी लागत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाची चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. या समितीत जिल्हाधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विरोधक शांत झाले.
याच काळात नवाब मलिक यांनी मुनगंटीवार सरकारला धमकी देत असल्याचे सांगत हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत सरकारने संवेदनशील पद्धतीने काम करावे यासाठीच मुनगंटीवार यांनी असे वक्तव्य केल्याचे सांगितले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य तपासून घेतले जाईल व त्यातला आक्षेपार्ह भाग काढला जाईल, असे स्पष्ट केले.