Friday, November 22, 2024
Homeडेली पल्समकरसंक्रांतीचे महत्त्व आणि...

मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि शास्त्र!

आज मकरसंक्राती! मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाणघेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व, या दिवशी करायचे धार्मिक विधी याविषयीचे शास्त्रीय विवेचन सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.

१. तिथी: हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. बहुतांश वेळा मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी असतो. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो.

२. इतिहास: संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

३. संक्रांतीविषयी पंचांगात असलेली माहिती: पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा इत्यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते. संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्याचा नाश होतो.

४. महत्त्व: या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्याचे उत्तरायण चालू होते. कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनात मरण आलेली व्यक्ती उत्तरायणात मरण आलेल्या व्यक्तीपेक्षा दक्षिण लोकात (यमलोकात) जाण्याची शक्यता जास्त असते.

. मकरसंक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व: भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देताना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

आ. तीळगुळाचे महत्त्व: तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

इ. मकरसंक्रांतीचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व: मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणार्‍या जिवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. मकरसंक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करावी.

ई. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व: या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. ‘जीवनात सम्यक् क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.

उ. मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व: धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.

५. प्राकृतिक उत्सव: हा प्राकृतिक उत्सव आहे, प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकरसंक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.

६. शरशय्येवर उत्तरायणाची वाट पाहात संकल्प बळाने ५८ दिवस पडून राहणारे भीष्माचार्य: उत्तरायण पर्वाची वाट पहाणार्‍या भीष्म पितामहांनी उत्तरायण चालू झाल्यानंतरच देहत्याग करणे पसंत केले होते. जगातील कोणत्याही योद्ध्याने शरशय्येवर अठ्ठावन्न दिवस काय अठ्ठावन्न घंटेही संकल्प बळाने जगून दाखवले नाही. ते काम भारताच्या भीष्म पितामहांनी करून दाखवले.

७. जीवनाकडे साक्षीभावाने पाहण्यास शिकवणारा सूर्याचा उत्सव: सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्कसंक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. कोणत्याही ग्रहमालेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे, म्हणजे ‘खाली जाणे’ आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे, म्हणजे ‘वर जाणे’. कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जाणे, म्हणजे वरून खाली जाणे अन् मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जाणे, म्हणजे खालून वर जाणे. मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणार्‍या चढउतारांकडे, सुख-दुःखांकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पाहयला हवे, असाच संदेश मिळतो. 

८. सूर्यदेवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण: सूर्यदेवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) चालू केली. त्यावेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले; म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली. रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात.

 ९. सण साजरा करण्याची पद्धतः

अ. मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते. 

आ. दान-

१. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

२. दानाच्या वस्तू: नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात. सुवासिनी हळदी–कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.

३. वाण देण्याचे महत्त्व: ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

 

४. वाण कोणते द्यावे?

अ. असात्त्विक वाण देण्यामुळे होणारी हानी: प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाणघेवाण संबंध (हिशेब) निर्माण होतो.

आ. सात्त्विक वाण देण्याचे लाभ: सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

इ. सुगड: संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.

ई. बोरन्हाण: मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला काळे झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.

प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदीकुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

१०. निषेधः

अ. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे आणि लैंगिक भावना उद्दीपीत होणार्‍या कृती करणे टाळावे. 

आ. पतंग उडवू नका!: सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असताना मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे ‘रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाईल आणि साधना अन् धर्मकार्य यासाठी वापरला, तर स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Continue reading

उद्या परशुराम जयंती!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने अथवा शस्त्राने हरवील. भगवान परशुरामांच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र...

नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे!

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय देवीच्या 9 रूपांविषयी आज आपण या लेखातून जाणून...
Skip to content