टपाल क्षेत्रात आफ्रिकी देश आणि भारत यांच्या प्रशासनातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ‘भारत-आफ्रिका पोस्टल लीडर्स मीट‘चे भारतात नुकतेच आयोजन करण्यात आले. 21 जूनला आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे आज समापन होत आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या “दक्षिण ते दक्षिण आणि त्रिकोणीय सहकार्य” कार्यक्रमांतर्गत हा एक उपक्रम आहे, जो भारत आणि अमेरिकेच्या टपाल सेवा विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट’ तसेच भारत-आफ्रिका मंच आणि 2023मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनचा जी 20मध्ये समावेश करण्याच्या भारताच्या इतर दूरदर्शी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन महत्त्वपूर्ण आहे. या संमेलनासाठी, ग्लोबल साउथमधील 22 आफ्रिकन देशांच्या संघटनांनी 42 टपाल प्रशासन प्रमुख आणि इतर वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे.
‘अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून क्षमता वाढवणे’ ही या संमेलनाची मुख्य संकल्पना आहे. या अभ्यास दौऱ्यातून भारताच्या विस्तृत टपाल कार्यालयाच्या जाळ्याद्वारे सेवा वितरणाच्या यशस्वी प्रारूपाचे दर्शन घडते.
नवी दिल्लीत काल झालेल्या कार्यक्रमात सहभागी प्रतिनिधींना संबोधित करताना, दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी विशेषत्वाने ग्लोबल साउथ आणि आफ्रिकेप्रती भारताच्या वचनबद्धतेचा उल्लेख केला. प्रभावी तंत्रज्ञान सक्षमीकरणासह, विशेषत: सीमापार ई-कॉमर्स आणि आर्थिक समावेशन या क्षेत्रांमध्ये, जागतिक स्तरावर टपाल विभागाच्या आव्हानांवर एकत्रित उपाय शोधण्यासाठी भारतीय टपाल विभाग आफ्रिकेतील टपाल विभागाबरोबर काम करेल.