महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका कृषी प्रदर्शनाच्या मेळाव्यात पंकजाताईंनी जोरदार भाषण ठोकले. हे भाषण ठोकताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन करण्याचाच प्रयत्न केला. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. मी कोणाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड म्हणते आणि बंडाला बंड म्हणते. आज ही गर्दी काय सांगते? गोपीनाथ मुंडेंनी भाजप स्थापन केला. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे हे कार्यकर्ते बघितले तर असे वाटते की या कार्यकर्त्यांचा एक नवा पक्ष उभा राहिल जो गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालेल. यावरच ताई थांबल्या नाहीत. पक्षाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींवरही त्यांनी तोंडसुख घेतले. महाकुंभात स्नान करण्यासाठी झुंबड लागली आहे. एकदा स्नान केले की पुन्हा पापं करायला मोकळे.. असे त्या म्हणाल्या. हे विधान करताना ताई हे विसरल्या की, महाकुंभातले पवित्र स्नान करणाऱ्यांमध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे.
पंकजा मुंडेंनी हे भाषण तर ठोकले आणि त्याला उपस्थितांनी दादही दिली. पण लगेचच त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. पंकजा मुंडे ओबीसी समाजाच्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही या समाजाचे नेतृत्त्व करतात. भुजबळ लगेचच बोलते झाले. कोणालाही पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे. पंकजा मुंडेंनी ठरवले तर त्याही पक्ष स्थापन करू शकतात. प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रत्येक पक्षाला अपेक्षित यश मिळतेच असे नाही. त्यांनी प्रयत्न करावेत. त्यांना यशही मिळावे. माझ्या त्यांना शुभेच्छा.. अशा आशयाचे विधान भुजबळांनी केले. शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊतही थांबले नाहीत. नेहमीप्रमाणे प्रत्येक विषयावर कॉमेंट करणारे राऊत म्हणाले की, पंकजाताई जर नवा पक्ष काढणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी तसा पक्ष काढावा आणि गोपीनाथ मुंडे यांचे विचार सर्वदूर पोहोचवावेत. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पंकजाताईंना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढाकार घ्यावा. पक्ष स्थापन झाल्यास आपण स्वतः त्यासाठी काम करू, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. विरोधकांच्या या सगळ्या टीकेनंतर पंकजा मुंडे पुन्हा माध्यमांसमोर आल्या आणि आपल्याला वेगळा पक्ष स्थापन करायचा नाही असे स्पष्ट केले. मी माझ्या भावना बोलून दाखवल्या. गोपीनाथ मुंडेंनी भाजपला उभे केले आणि आता त्याच पक्षाची मी आमदार आहे. मंत्रीही आहे.. मी असं कसे बोलेन असे सांगत त्यांनी सारवासारव केली.

पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षा फारच वरच्या स्तरावरच्या आहेत. त्यांना कायम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावे असे वाटते. 2014 साली देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळीही त्यांनी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच.. असे जाहीर भाष्य करत फडणवीसांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांतच ताई आपल्या परिवारासह परदेशी सुट्टीचा आनंद लुटत असताना महाराष्ट्रात चिक्की घोटाळ्याने उचल खाल्ली. या घोटाळ्याच्या चर्चांना इतके उधाण आले की त्यांना आपला परदेश दौरा आटोपता घेऊन पुन्हा मुंबई गाठावी लागली. पुढे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर जुळवून घेतले खरे, पण त्यांच्यातली मुख्यमंत्री होण्याची ईर्षा लपून राहिली नाही. याच सर्व प्रक्रियेत चिक्की घोटाळा मात्र दबला गेला आणि पंकजाताईंवरचं बालंट दूर झाले.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पुन्हा त्यांच्या परळी मतदारसंघातून उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांच्या विरोधात होते एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि पंकजाताईंचे चुलतबंधू धनंजय मुंडे. यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा व्यवस्थित पराभव केला आणि पंकजांचे राजकीय भवितव्य अंधारात ढकलले गेले. याबाबत असेही बोलले जाते की, धनंजय मुंडेंना ही जागा जिंकण्यासाठी फडणवीस यांनी पडद्याआडून मदत केली. पुढे पाच वर्षं पंकजा मुंडे तशा रिकाम्याच होत्या. या काळात त्यांना भाजपाच्या केंद्रीय संघटनेत स्थान देण्यात आले. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले. इतकेच नव्हे तर त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारीही झाल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पडद्याआडून पंगा घेणारे विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अशा चर्चा सुरू झाली की, आता पंकजाताई तावडेंप्रमाणे दिल्लीत जाऊन बस्तान बसवतील. परंतु त्यांनी तसे केले नाही. बालकथेत म्हटल्याप्रमाणे जसा एखाद्याचा जीव पोपटात असतो तसे पंकजाताईंचा राजकीय जीव महाराष्ट्रात होता. त्यांनी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका असतानाही महाराष्ट्रातच ठाण मांडून जनजागृती यात्रा काढल्या. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुती सरकारवर वेळोवेळी टीका केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर तसेच विधान परिषदेवर काही सदस्य निवडून गेले. काहींच्या नेमणुका झाल्या, पण प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव फक्त चर्चेत राहिले. ना त्यांची वर्णी लागली, ना त्यांना कोणीही विचारले.. मीडियाने बातम्या चालवल्या, घराघरात टीव्हीवर लोकांनी बघितल्या. परंतु पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचा कोणताही विषय प्रत्यक्षात उतरला नाही. पंकजा मुंडेंना त्यांची जागा समजून चुकली आणि त्यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनाकरीता दिल्लीतून सूत्रे हलवली. लोकसभा निवडणुकीतही त्यांना थेट दिल्लीत पाठवण्याचा कार्यक्रम करत भाजपच्या नेतृत्त्वाने त्यांच्या बहिणीची उमेदवारी कापून उमेदवारी दिली. मात्र त्यात त्या पराभूत झाल्या. फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वातावरणात ओबीसी घटकाला नाराज करू नये याकरताच त्यांना ही उमेदवारी दिली गेल्याचे बोलले जाते.

पंकजाताई खासदारही झाल्या नाहीत आणि आमदारही राहिल्या नाहीत. आपले राजकीय भवितव्य अंधारात जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपले पिताजी गोपीनाथ मुंडे यांना पुढे केले आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांशी सख्ख्य वाढवले. त्यामुळे अपरिहार्य स्थितीत भाजपाने त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली. पुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीत परळीची जागा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या पदरात पडणार हे निश्चित झाल्यानंतर पंकजाताईंनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि दोन्ही बहिणभाऊ एकत्र आले. धनंजय मुंडे यांच्यामागे करुणा शर्मा यांचे शुक्लकाष्ट होतेच. अशा स्थितीत त्यांनीही आपल्या भगिनीसोबत एकत्र येण्याकरीता हात पुढे केला. धनंजय निवडून आले. महायुती सत्तेत आली. अजितदादांच्या खास मर्जीतले नेते म्हणून धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणे स्वाभाविक होते आणि तसे झालेही. पुन्हा दिल्लीतल्या श्रेष्ठींच्या मदतीने मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई फडणवीस सरकारमध्ये पर्यावरणमंत्री झाल्या. 2014च्या कार्यकाळातले महिला आणि बाल विकास खाते मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. पण ते विफल ठरले. बीडचे पालकमंत्रीपद घेण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यातच बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्रीपद नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. याकरीता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली. पण अजितदादांनी स्वतःच बीडचे पालकत्व स्वीकारले आणि पंकजाताईंना जालनाच्या पालकमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी याबद्दलची खदखदही बोलून दाखवली. बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर आनंद वाटला असता. पण आता जालन्याची पालकमंत्री आहे. तिथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन, असे त्या म्हणाल्या.
या सर्व घडामोडींनंतरही पंकजाताईंच्या डोक्यातून मुख्यमंत्रीपद काही जात नाही. नाशिकच्या मेळाव्याचे निमित्त करत त्यांनी पुन्हा आपले स्वतंत्र नेतृत्त्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ताज्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा त्यांना कोणत्यातरी आरोपाचा सामना करावा लागू नये म्हणजे मिळवले. ताई, गावस्कर एकच. तो म्हणजे सुनील गावस्कर. त्याचा मुलगा रोहन वडिलांची जागा घेऊ शकला नाही. तेंडुलकर एकच. सचिन तेंडुलकर.. त्याचा मुलगा अर्जुन त्याची जागा घेऊ शकला नाही. बच्चन एकच.. अमिताभ. त्याची जागा अभिषेक घेऊ शकला नाही. राजकारणात म्हणाल तर बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबच होते. त्यांची सर उद्धवजींना नाही आणि उद्धवजींची सर आदित्यजींना नाहीच नाही. इंदिरा गांधींची सर नाहीतर राजीव गांधींना आली ना राहुल किंवा प्रियंका गांधींना.. गोपीनाथ मुंडे हे गोपीनाथजीच होते. त्यांची लेक म्हणून आपण राजकारणात किती काळ मिरवणार?

किरण लेख झकास. अभिनंदन !!
– अनिकेत जोशी
खरंय! मस्त लेख झालाय