Homeमाय व्हॉईसवाचाळ पडळकरांची जीभ...

वाचाळ पडळकरांची जीभ सारखी घसरते तरी कशी?

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वाचाळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगलीतील वक्तव्यावरून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शरद पवार यांंच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ नेहमीप्रमाणे घसरली. पडळकर यांनी थेट जयंत पाटील यांचे दिवंगत पिता राजाराम पाटील यांचा उल्लेख करत एकदम खालच्या पातळीवर टीका केली. गोपीचंद पडळकर यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावेळीही पडळकर यांना विरोधी पक्षांनी धारेवर धरले होते. परंतु ज्या भाजपचे ते प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाने याकडे काणाडोळा केला होता. त्यामुळेच पडळकर यांची एवढ्या खालच्या पातळीवर टीका करण्यापर्यंत मजल गेली.

पडळकर यांचा इतिहास अशाच प्रकारचा आहे. यापूर्वी विधानभवनात पडळकर यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला विधानभवनाच्या आतच पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे पडसाद राज्यभर उमटले होते. वेळोवेळी भाजपने पडळकर यांचे छुपे समर्थन केल्याने ही वेळ ओढवली आहे. यावेळी सर्व बाजूने टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली. शरद पवार यांच्यावर एकेरी टीका केल्यानंतर भाजप नेते गप्प बसले. त्याचवेळी पडळकर यांना कडक शब्दांत समज दिली असती तर ही वेळ आली नसती. विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनीही सभागृहात जे शब्द वापरले त्याची लाज भाजपच्या उपस्थित मंत्र्यांनाही वाटली. भाजपच्या एका मंत्र्याने अनिल परब यांना भेटून सांगितले की, अशी अशी मंडळी आमच्या पक्षात सामील झाल्याने आमच्या पक्षाचीच नव्हे तर सुसंस्कृत नेत्यांचीही बदनामी होते.

पडळकर

शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा प्रवास केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे, हेसुद्धा वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे आमदार असताना नितेश राणे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती. पण आता कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही ते अशीच बालिश वक्तव्य करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर, उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्याही पातळीवर जाऊन ते टीका करत असतात. त्यांची अशी वक्तव्यं पाहता ते कॅबिनेट मंत्री आहेत की नाक्यावरचे पुढारी आहेत याबद्दल शंका वाटते. त्यांनाही मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर ते जरा थंड झाले आहेत. परंतु अधूनमधून त्यांची वळवळ सुरू असते. विशेष म्हणजे मूळ भाजपमध्ये असलेल्या नेत्यांकडून एकही अपशब्द उच्चारला जात नाही. परंतु बाहेरून भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांची जी खूप वेळा घसरते. यामध्ये गोपीचंद पडळकर पहिल्या नंबरवर आहेत.

सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी पडळकर यांना जवळ केले. त्यांनी वंचितच्या तिकिटावर बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली. पुढे ते भाजपमध्ये सामील झाले. ते धनगर समाजाचे असल्याने या समाजाची मते आपल्याला मिळावीत यासाठी भाजपने त्यांना सुरुवातीला विधान परिषदेवर घेतले. त्यानंतर 2024च्या निवडणुकीत ते जत मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. परंतु वारंवार त्यांची जीभ घसरतच असते. चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्यांचे पती सरकारी सेवेत डॉक्टर आहेत. त्यांच्यावर लाचलूुचपत प्रतिबंधक खात्याची धाडही पडली होती. त्यानंतर त्या सत्ताधारी भाजपमध्ये सामील झाल्या. खूप वर्षे वाट पाहिल्यानंतर त्यांना वर्षभरापूर्वी विधानपरिषद सदस्य म्हणून लॉटरी लागली. परंतु विधानपरिषदेत अनिल परब यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची जीभ घसरली.

पडळकर

प्रत्येक वेळेला तंबी देऊन या वाचाळ पुढाऱ्यांना आवरण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्त्वाकडून होतो. परंतु त्यांचा वाचाळपणा काही बंद होत नाही. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा फटका फक्त सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बसू शकतो. याची कल्पना असतानाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर समज दिल्यानंतरही पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. मात्र यावेळी एकाही भाजप नेत्याने त्यावर भाष्य केले नाही. एवढ्या खालच्या पातळीचे वक्तव्य महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते. राजकारणात महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत राज्य समजले जाते. येथे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष मुद्द्यावर टीका करतात. परंतु वैयक्तिक शिवीगाळ किंवा टीका कधीही झाल्याचे मला तरी आठवत नाही. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कुठल्याही पक्षाकडून होत नाही. काही मंडळी वैयक्तिक स्वार्थासाठी हे प्रकार हल्लीहल्ली करू लागले आहेत. परंतु त्यांनाही राज्यातील जनता धडा शिकवेल याविषयी तीळमात्र शंका नाही.

संपर्कः 9820355612

Continue reading

भाजपकडून होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी!

आगामी महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यास भारतीय जनता पक्षाने (भाजप) सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हा आणि या जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत असताना आतापासूनच भाजपने महायुती म्हणून न लढता स्वतंत्र...

पालिका निवडणुकीतली बदलती समीकरणे आणि होणारी गोळाबेरीज!

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी मोर्चे, आघाडी या पातळीवर बांधणी सुरू केली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोण कोणाशी...

ठाकरे ब्रँडला धूळ चारत शशांक राव निघाले ‘डार्क हॉर्स’!

बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी ताब्यात घेण्यासाठी तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी महायुती सरकारचे भक्कम...
Skip to content