धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ परांजपे यांनी १९३८ साली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक शाळा उभारली होती. ही शाळा ऐतिहासिकदृष्टीने तर महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या शाळेला त्यांनी आपल्या गुरूंचे नाव दिले होते. ‘गोपाळ कृष्ण गोखले मराठी शाळा मुर्डी’ हे गुरू म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू. ही इमारत १९३८च्या दरम्यान बांधली. त्यामध्ये तळमजल्यावर पहिली ते चौथी प्राथमिक शाळा व पहिल्या मजल्यावर वाचनालय सुरू केले. वाचनालयाला आपल्या वडिलांचे ‘पु. के. परांजपे वाचनालय’ असे नाव दिले. केवळ इतकेच नव्हे तर ही शाळा म्हणजे महाराष्ट्रातील पहिली अशी शाळा होती की, तेथे त्यावेळी सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जात होते. दुर्दैवाने ३ जून २०२० रोजी चक्रीवादळाच्या तडाख्यात शाळा व वाचनालयाची इमारत उद्ध्वस्त झाली. त्यामधील शैक्षणिक साहित्य तसेच ग्रंथसंपदेचे अपरिमित नुकसान झाले. पण त्याचे त्यावेळीही ना राजकारण्यांना सोयरसुतक होते. ना प्रशासनाला.. ना जिल्हाधिकाऱ्यांना.. ना दापोली परिसरातील समाजधुरिणांना.. ना राज्य सरकारला.. ना राज्याच्या शिक्षण खात्याला. इतकेच कशाला? वृत्तपत्रादी प्रसारमाध्यमांनाही या शाळेचे फार सोयर नव्हते.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/murdi-school-6-1024x768.jpg)
सदर शाळेचे नूतनीकरण सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. सी. एस. आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंड यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून पूर्ण केले. या इमारतीच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. त्यांनी त्यासाठी रु. ४५ लाख इतके अर्थसहाय्य करून हे लोकहितार्थ कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करुन दिले. अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शाळेच्या नूतनीकरणाचाही गाजावाजा सरकारला करावासा वाटला नाही. खरे म्हणजे अशा शाळेचा नूतनीकरणाचा सर्व खर्च हा सरकारने उचलावयास काहीच हरकत नव्हती. पण तसे घडले नाही. या नूतनीकरणाला सुमारे ३ वर्षे होतील. यातही अधिक दुःख वाटते ते पर्यटनाचा गाजावाजा करणाऱ्या मंत्री व पर्यटन विभागाचे. पर्यटन व्यावसायिकांचेही. आंजर्ल्याच्या कड्यावरील गणपतीचा उल्लेख करून वा सागर किनाऱ्याचा गाजावाजा करीत पर्यटनाचा कथित विकास झाल्याचा आव आणणाऱ्यांना आणि पर्यटनाबद्दल फार आत्मियता असल्याचे भासविणाऱ्या पर्यटकांनाही या शाळेचे महत्त्व न सांगता ते गुप्त का ठेवले जाते, असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/murdi-school-2-1024x768.jpg)
वास्तविक निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणातील विविध गावांमध्ये अपरिमित नुकसान झाले. यामध्येच झालेल्या एका घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले-मुर्डी या गावातील या एका महत्त्वपूर्ण अशा जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले होते. ही जिल्हा परिषदेची शाळा असून ऐतिहासिक महत्त्वाची असूनही त्याचा खर्च पेलविण्याइतकी ताकद महाराष्ट्र सरकारकडे असू नये, याचे राहून राहून आश्चर्य वाटते. या शाळेच्या नूतनीकरणामुळे आजही त्या शाळेसमोरून जाताना अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. जुन्या काळातील ती माणसेही आठवतात. मुर्डी हे श्री. ना. पेंडसे, रँग्लर परांजपे, याचे जोडगाव. खरे म्हणजे आंजर्ल्याचा हा उपभागच आहे. माझ्याही वडिलांचे आजोळ असल्याने लहानपणापासून अनेकदा त्या मुर्डीत जाणे होते. त्या मुर्डीचे महत्त्व तेव्हापासून मला वाटे. खाडीचे पाणी मोठ्या भरतीच्यावेळी आंजर्ला गावाला मुर्डीपासून वेगळेही करते. दापोलीहून मुर्डीचा शॉर्टकट याच मुर्जडी गावातून जातो. या शाळेच्या निर्मितीसाठी मुर्डीच्याच त्या नामांकित व्यक्तीचे नाव डोळ्यासमोर येते. तो काळ आठवतो आणि आपल्या गावाला न विसरणारी, आपल्या माणसांना न विसरणारी व शिक्षणासारख्या महत्त्वाच्या घटकाला महत्त्व देणारी ती माणसे, तो काळ आणि त्याची जाणीव ठेवणारी त्या माणसांबरोबर जुळलेलीही अन्य मोठी माणसेही आठवतात.
![मुर्डी](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/murdi-school-3-1024x768.jpg)
वर म्हटल्याप्रमाणे भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी १९३८ साली ही इमारत बांधून चौथीपर्यंतची शाळा आणि वाचनालय सुरू केले. २२ डिसेंबर १९३८ रोजी या शैक्षणिक इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला होता. या नूतनीकृत वास्तुमध्ये बाहेरच ही माहिती लिहिली आहे. गोपाळ कृष्ण गोखले जि. प. शाळा मुर्डी नं. १ आणि पु. के. परांजपे वाचनालय मुर्डीच्या जिर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा अंजली व सदानंद दत्तात्रय बापट (प्रमोटर अॅन्ड जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, पुणे) या उभयतांच्या शुभहस्ते गुरुवार दि. २१/०४/२०२२ रोजी संपन्न झाला होता. ही सारी माहिती देणारे दगडावरील सुवर्णाक्षरांचे काम हेदेखील त्या कामाचे सोन्याचे मोल सांगणारे आहे. कोणी ना कोणी या कामासाठी गावातील लोकांनी प्रयत्न करून ते सारे घडवून आणलेही असेल. पण यानिमित्ताने प्रश्न पडतो, तो इतके वर्ष उभी असलेली ही शाळा वादळाच्या तडाख्यात धक्का खाऊनही जोमाने उभी राहिली आहे, त्यामागे असलेल्या तळमळीचा. ही तळमळ त्यासाठी पैसे खर्च करणाऱ्यांची आहेच. पण त्याहीपेक्षा त्यांनाही असे पैसे खर्च करावे, असे वाटले, त्या वाटण्यामागील भावनेचीही आहे. याचे कारण ज्या रँग्लर परांजपे यांनी आपल्या गुरुंच्या नावाने ही शाळा सुरू केली त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आणि रँग्लर परांजपे यांच्या आयुष्यातील तळमळीने काम करण्याच्या, सामाजिक जाणीवेतून आयुष्य जगण्याच्या त्यांच्या ध्येयाचा प्रश्न मला मोठा वाटतो. याच त्यांच्या जीवनाच्या आणि ध्येयपूर्ततेच्या जगण्याने ही शाळा उभी राहिली होती. त्यासाठी असणारी त्यांची विचारसरणी जोपासणारे आज किती राजकीय नेते, पक्ष, संस्था, संघटना आणि माणसंही आहेत हादेखील त्यामुळे चिंतेचा वाटणारा विषय आहे. सध्याच्या चंगळवादी सामाजिक मानसिकतेमधून आम्ही बाहेर पडणार का?
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/murdi-school-1-1024x768.jpg)
गावच नव्हे तर आपण राहत असलेल्या परिसराबद्दलही, शहराबद्दलही कितींना आत्मीयता वाटते अशी चिंता यानिमित्ताने जाणवली. भारत सेवक समाजाचे सर्वेसर्वा, महात्मा गांधी, बॅ. जीना यांचे राजकीय गुरू असलेल्या ना. गोखले यांनी गरीबीतून शिक्षण घेत आपले आयुष्य उभे केले. अवघ्या ५० वर्षांच्या काळातही त्यांचे कर्तृत्त्व बहरलेले होते. रँग्लर परांजपे यांनीही शिक्षणासाठी मुर्डी सोडल्यानंतर अन्य ठिकाणी शिक्षण घेतले. बौद्धिकतेबद्दल पाश्चात्यांनाही असणारा अहंगंड आपल्या बौद्धिकतेने नष्ट करण्याचे त्यांनी केलेले काम नक्कीच आजही अभिमानास्पद आहे. शिक्षणाविषयी त्यांचे असणारे प्रेम आणि आत्मीयता हादेखील तितकाच मोठा विषय आहे. एक थोर समाजसुधारक म्हणूनही गोखल्यांचे नाव प्रसिद्ध आहे. भारत सेवक समाजाच्या कार्याबरोबर अस्पृश्यता व जातिव्यवस्था यांचे निर्मूलन व्हावे, म्हणून ते नेहमी प्रयत्नशील होते. स्त्रीस्वातंत्र्याचा तसेच त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आणि तत्संबंधीचे आपले विचार वृत्तपत्रकार या नात्याने सुधारक, सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रांतून स्पष्ट मांडले. सर्व स्तरांतील लोकांना शिक्षण घेणे सुलभ जावे, म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत असावे, असे ते म्हणत. अशा या गुरुतुल्य असलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांना मिळालेले रँग्लर परांजपे यांच्यासारखे शिष्य आणि गोखले यांच्यासारखेच गुरुवर्यही आज हवे आहेत!